माझ्या लहानपणीची दिवाळी खुप छान असायची. माझा लहानपण म्हणजे मला समजू लागल्यापासून समज येईपर्यंतचं वय. नेमकं सांगायचं म्हणजे ६८-६९ सालापासून ते ८०-८५सालापर्यंतचा काळ. मी तेंव्हा अंधेरी पूर्वेच्या पंपहाऊस येथील एका बैठ्या चाळीत राहायचो. तेंव्हा चाळीच असायच्या आणि दुसरा वर्ग थेट बंगला. बलाक, फ्लॅट अद्याप जन्मले नव्हते. आणि चाळीला चाळच म्हणत, ‘स्लम’ हा तुच्छतादर्शक शब्द अवतरला नव्हता. माझ्या समोरही अशीच एक बैठी चाळ होती. समोरासमोरच्या दोन्ही चाळीतील मिळून १६ खोल्यांत तिन गुजराती बिऱ्हाडं सोडली, तर बहुतेक सर्व मालवणी आणि मालवणी माणूस म्हणजे मुर्तीमंत उत्साह. चाळीतील खोली म्हणजे, एकून दिडशे चौ-फुटाच्यावर लांबी, रुंदी नसलेल्या खोलीत बसवलेले दोन लहान खण. लांबी-रुंदी-उंची नसुनही तिला खोली म्हणायचे, कारण तिच्यात राहाणारी गरीब माणसं मनाने खोल होती. आतासारखा फ्लॅट उथळपणा तेंव्हा कुणाच्यातच नव्हता. चाळीतील अशा खोलीत राहाणारांना आत आंघोळीसाठी मोरी आणि वर कौलं. निसर्गाच्या हाकेला ओ देण्यासाठी थेट निसर्गातच जायला लागायचं. तेंव्हा आजुबाजूला खरा आणि बक्कळ निसर्ग होता आणि प्रदुषण हा संधीसाधू शब्द तेंव्हा कुणालाच माहित नव्हता. तेंव्हाच्या सरकारलाही बरीच कामं असावीत बहुदा. त्यामुळे आपापली पोटं कोण कुठं साफ करून प्रदुषण करतंय, यावर सरकारचं लऱ्क्षही नसायचं. आता सरकार आणि प्रदुषण, असं दोघही गंभिर झाल्याने निसर्गाच्या सानिध्यात करायच्या गोष्टी घरात करायला लागतात.
आमच्या चाळीतले बाबालोक कामाला कुठेतरी प्रायव्हेट कंपनीत किंवा मग एसआयसी किंवा पोष्टात. प्रायव्हेटमधे सरकारी नोकरीपेक्षा थोडासा पगार जास्त असे, वर बोनसही मिळे. सरकारात तेंव्हा फक्त पगारावरच समाधान मानायला लागे. त्यामुळे आतासारखी सरकारी नोकरी करण्याकडे कोणाचा फारसा कल नसायचा. सरकारी नोकरीतून देशसेवा वैगेरे करता येत असल्याचा साक्षात्कार साधारण ८४-८५ सालापासून सुरू झाला आणि आता तर सरकारी नोकरीतून देशसेवा करायला मिळावी म्हणून लोक काहीही तयार आहेत. असो, घरात कमावते फक्त बाबा आणि आया घरी. तेंव्हा आयांनी नोकरी करण्याची प्रथा आजच्यासारखी सर्रास झाली नव्हती. मुलं कमीतकमी चार असायचीच. रात्री जेवणं झाली, की मग दोन चाळीतल्या मधल्या गल्लीत बायका पोरांचा गप्पांचा फड रंगायचा. गप्पांचा ग्रुप वयेमानानुसार ठरायचा. पुरुषांचे पत्ते सुरू व्हायचे. दुसरी करमणूक काहीच नसायची.
अशा या चाळीतल्या वातावरणात दसरा संपला की मग कुठूनतरी रंगांचा वास यायला सुरुवात व्हायची. चाळीतल्या कुणीतरी घरात रंगकाम करायला घेतलेलं असायचं. रंगाचा तो विशिष्ट वास माझ्यासाठी दिवाळी नजिक आल्याची वर्दी देणारा दूत बनूनच यायचा. आजही, माझ्या वयाच्या ५२व्या वर्षात, कुठेही रंगाचा वास आला, कि मला चटकन दिवाळीच आठवते, इतकं रंग आणि दिवाळी यांचं नातं माझ्या मनात पक्कं ठसलं आहे. आता तिन रुमांच्या एकाच फ्लॅटमधील एका रुमच्या बंद दरवाज्याआड काय चाललंय, ते त्याच फ्ल्याटातल्या दुसऱ्या रुममधे कळत नाही, तर शेजारच्या फ्लॅटातलं काय डोंबलं (हा उच्चार मी ‘डोंबलं’ असाच करतो.) कळणार? प्रदुषण प्रमाणे प्रायव्हसी हा दुसरा अतिरेकी ही आधुनिक काळाची देण. कालाय तस्मै नम:. आताही टिव्हीवर नेरोलॅक किंवा एशीयन पेंट्सच्या जाहिराती दिसायला लागल्या, की माझ्या मनात दिवाळी सुरू होते. रंग आणि दिवाळीचं नातं तेच लहानपणातलं असलं, तरी ते काळासोबत ते रंगांचा गंध ते रंगांचं चित्र एवढं बदललंय. हे ही कालाय तस्मै नम:..
दसऱ्याला सुटलेले रंगकामाचा वास विरतोय न विरतोय, तोच कोजागिरीपासून पुढे घराघरांतून जात्यांची घरघर ऐकायला यायची. आधी जात्यावर दळल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पिठांचा दरवळ आणि नंतर तळल्या जाणाऱ्या फराळाच्या पदार्थांचा घमघमाट चाळीत घुमायला लागायचा आणि ‘पहिली आंघोळ’ आता अगदी तोंडावर आल्याचं कळायचं. तेंव्हा आजच्यासारखा आपण आपल्या घरापुरता फराळ करण्याची पद्धत नव्हती. ‘रेडीमेड’ असा शब्दही तेंव्हा जन्मलेला नव्हता. चाळीतल्या सर्व स्त्रीया रात्री एकमेकींच्या घरी जाऊन लाडू, करंज्या, चकल्या, शेव, शंकरपाळ्या, चिवडा वैगेरे पदार्थ करीत. कोणाच्या घरी कोणता पदार्थ करायला कधी जायचं, याचा दिवस, नाही रात्र ठरलेली असायची. हा कार्यक्रम हमखास कोजागिरीनंतरच्या दोन-चार दिवसांनी सुरू व्हायचा ते पहिल्या आंघोळीच्या दोन दिवस अगोदर संपवायचा. पहिल्या आंघोळीपूर्वीचे ते आठ-दहा दिवस तर चाळीतलं वातावरण भारलेलं आणि खमंग वासाने भरलेलं असायचं.
इकडे आमची कंदील तयार करायची धांदल उडालेली असायची. चाळीतील सर्व १६ बिऱ्हाडांसाठी एकाच प्रकारचे कंदील करायचं काम आमच्याकडे असायचं. आम्ही तिन-चारजण मुलं कागद, गोंद खरेदी करून दिवाळीच्या दोन दिवस अगोदर कंदीलाचं काम आटोपून टाकायचो. कंदील प्रत्येक खोलीच्या बाहेर लागून प्रकाशमान झाले, की आम्हाला कृतकृत्य वाटायचं. मग टेलर आणि वेळ यांचा नवरा-बायकोचा संबंध तेंव्हाही माहित असल्याने, टेलरकडे शिवायला दिलेले कपडे देण्याचा तगादा त्याच्या मागे लावायचा. रेडीमेड हा शब्द फराळासारखाच कपड्यांनाही तेंव्हा लागू झाला नव्हता. तेंव्हा वर्षातून एकदाच नवे कपडे मिळायचे, ते ही दिवाळीतूनच. कापडखरेदी रंगकामासोबतच झालेली असायची. कापड मळखाऊ आणि टिकावू असणं एवढाच निकष असायचा, म्याचिंग-बिचिंगची भानगड नसायची. कपडेही ‘बॅंन्ड’वाल्यांलारखे एकाच प्रकारचे. आता ‘ब्रॅन्ड’मधे किंमत सोडली तरी वेगळं काय असतं..! रंगाप्रमाणेच आजही नविन कपड्यांचा तो कोरा गंधं आणि त्यांची सरमिसळ झाल्याने टेलरच्या दुकानात येणारा एक विशिष्ट वास मला हमखास लहानपणीच्या दिवाळीची आठवण करून देतो. आज कपड्यांचा सुकाळ झाला असला, तरी दिवाळीच्या निमित्ताने कपडे खरेदी करायची हौस अद्याप टिकून आहे. या कपड्यांची मजा आणि त्यांचा तो गंध काही औरच..!
मग ती रात्र उजाडायची. पहिल्या आंघोळीच्या आदल्या दिवसाची रात्र. प्रत्येक मजेच्या दिवसाचा हा जो आदला दिवस असतो ना, तोच खुप मजेचा असतो. उद्या मजा ही कल्पनाच मोठी मजेची असते. रविवारपेक्षा शनिवरीच रविवारचं सुख रविवारपेक्षा जास्त अनुभवता येतं, तसंच..! प्रत्यक्ष सुखापेक्षा सुखाची कल्पनाच जास्त सुखदायी असते, तसंच दिवाळीच्या आदल्या रात्री वाटायचं. रात्री रांगेळीच्या ठिपक्यांचा कागद, रांगोळीची पुस्तकं, रंगांच्या डब्या शोधून ठेवलेली असायची. रात्री रांगोळीची जागा लाल गेरूने सारवून ठेवायची आणि उद्या पहाटे लवकर उठायचं म्हणून लवकर झोपून जायचं.
मग आतुरतेने वर्षभर वाट पाहात असलेली ती पहिल्या आंघोळीची पहाट अवतरायची. वाजण्याइतपत थंडी पडलेली असायची. तेंव्हाची पहाट, पहाटे ५ वाजताच व्हायची. परिसरातून दिवाळीच्या स्वागतासाठी फटाक्यांच्या जोरदार सलामी सुरु झालेल्या असायच्या, त्या आवाजाने जाग यायचीच. आजुबाजूच्या खोल्यांतून चालू झालेली मालवणी गडबड, दोन सुत जाड पत्र्यांच्या भिंतीतून स्पष्ट ऐकायला यायची. उठलो की आई आंघोळीकरता मोरीत ढकलायची. थंडीतलया पहाटेच उठून आंघोळीच्या पूर्वी ते थंडगार उटणं अंगाला लावताना अंगावर अगदी काटा यायचा पण पुढची मज्जा दिसत असल्याने तो जाणवायचा नाही. उटणं लावून झालं की मस्त कढत पाण्याचे दोन तांबे अंगावर एतून घ्यायचे आणि अंगाला सुवासिक साबण लावायचा. सुवासिक हा शब्दही नंतरचा, आम्ही त्याला वासाचा साबण म्हणायचो. कारण एरवी वर्षभर ‘लाईफ बाॅय’ नांवाचा एक वासहीन ठोकळा साबण म्हणून वापरलेला असायचा. कपड्यांप्रमाणे या गंधहीन साबणाचा निकषही मळखाऊ आणि टिकावू एवढाच असायचा. त्यामुळे लाईफ बाॅयच्या व्यतिरिक्त कोणताही साबण, आमच्यासाठी वासाचाच असायचा.
पहिली आंघोळ झाली, की मी रांगोळी काढायला बसायचो. मला रांगोळी काढायची अतोनात हौस होती तेंव्हा. हे काम इतर घरातल्या बायका करायच्या तर आमच्याकडे मी. माझी रांगोळी तेंव्हाच्या माझ्या वयाच्या मानाने चांगलीही यायची. एका वर्षी मी काढलेली झाडावर बसलेल्या मोराची चित्ररांगोळी माझ्याच मनात इतकी पक्की बसलीय, की मला कुठेही मोराचं चित्र पाहिलं, की मला ती रांगोळीच आठवते. रांगोळी काढून होईपर्यंत दोस्त कंपनी जमा झालेली असायची आणि मग फटाके फोडणं या मुख्य कार्यक्रमाकडे वळायचं. जेवढा औरंगजेब गाण्यात मशहूर होता, तेवढाच मी खाण्यात असल्याने, फराळ हा खाण्यासाठी नसून फक्त वास घेण्यापुरताच असतो हा माझा समज आजही कायम आहे. त्यामुळे फराळाला फाटा देऊन, नवे कपडे घालून फटाके फोडणं हा मुख्य कार्यक्रम सुरु व्हायचा.
फटाक्यांत फुलबाजे, लवंगी, केपा, आणि अगदीच कोणा दोस्ताच्या हौशी बाबांनी घेऊन दिलेले ‘ताजमहाल’ बाॅम्बची लडी. लक्ष्मीबाॅम्ब आमच्यापेक्षा माठ्या मुलांचा प्रांत होता. ‘लक्ष्मी’ आणि ‘ताजमहाल’ ही वाजवायच्या फटाक्यांची नांवं आहेत एवढंच माहित होतं तेंव्हा, हे ‘स्फोटक’ ऐवज आहेत हे आत्ता आत्ता कळतंय. असो. केपा किंवा टिकल्या फोडण्यासाठी हातोडी असायची. पिस्तुलांची हौस परवडण्यासारखी नव्हती. जमिनचक्र, पाऊस वैगेरे ठराविकच, म्हणजे अर्धा डझनच, मिळायचे म्हणून ते जपून वापरायचे. इतके जपून की त्यातले काही पुढे दिवाळी संपल्यानंतरही शिल्लक राहायचे. अर्थात प्रत्यक्ष फोडण्यापेक्षा ते शिल्लक राहीले ह्याचा आनंदही काही कमी नसायचा. शिल्लक राहाण्यासारखंच वापरायचं याची शिकवण तेंव्हा अशी नकळत मिळायची. ही सवय मग पुढे सर्वच बाबतीत लागली. लवंगी, ताजमहाल फोडतानाही पूर्ण माळ लावायची नाही, तर त्या माळेतला एक एक लहान फटाका सुटा करून अगरबत्तीने शिलगावून करून एक एक करून फोडयचा. अख्खी माळ फोडण्यापेक्षा ती सुटी करून एक एक करून आणि ते सर्व मित्रांनी मिळून फटाके फोडण्यात मजा असते हे तेंव्हाच कळल होतं. पहाटे पाच ते साधारणत: सात-साडेसातपर्यंतचे दोन-अडीच तास, परिसरात वाजणाऱ्या फटाक्यांच्या आवाजाने दणाणून गेलेला असायचा. पुढे पहाटे लवकर उठणं झालेलं असल्याने सकाळी १०-११ च्या दरम्यान पेंग येऊ लागायची. उत्साह तर असायचा पण डोळे आपोआप मिटले जायचे आणि ‘पहिल्या आंघोळी’च्या सुखात झापून जायचं.
आता सर्वच बदललं. सुखाच्या, आनंदाच्या कल्पनाही बदलल्या. काळाबरोबर हे सारं बदलणारच, पण त्या लहानपणात अनुभवलेल्या दिवाळीचं सुखं आताच्या अनुभवतांना, नकळतच ‘आमच्या वेळची’ दिवाळी काही औरच आणि जास्त राजस होती असं वाटतं. आम्ही लहान असताना आमच्या आईवडीलांनाही तसंच वाटत असणार यात शंका नाही. पुढे जाणारी प्रत्येक पिढी आपल्या मागच्या दिवसांत रमलेली असतेच. असं रमलेलं असताना आपण जगतोय मात्र आताच्या काळात, हे विसरून चालणार नाही. जुन्या आठवणी कायम ठेवून नविन काळात स्वत:ला रुजवणं आवश्यक आहे..
असं असुनही काही गोष्टी स्विकारला अजून मन होत नाही. उदा. फटाक्यांचा आवाज. फटाक्यांचा दणदणाट नाही, तो धुराचा संमिश्र वास नाही, तर दिवाळी कसली, असा तेंव्हा माझा समज होता आणि आजही आहे. मला तर आजची पहिली आंघोळ, पहिली आंघोळ वाटलीच नाही. यंदा फटाका फोडल्याचा दणदणीत मरो, पुसटसाही आवाज ऐकलेला नाही. दिवाळीसारखी सणांची राणी येणार आणि तिला आपण फटाक्यांच्या तोफांच सलामी देणार नाही, तर मग वर स्वर्गात बसून, दिवाळीला खाली पृथ्वीवर पाठवणाऱ्या देवांना, ती पृथ्वीवर पोचल्याचं कळणार कसं? आता तर फटक्यांवर कोर्टाने बंदी घातलीय. कोर्ट पूर्वीही होती, पण पूर्वीच्या कोर्टालाही तेंव्हा न्यायदानाचंच काम असल्याने, ते लोकांच्या आनंदात आतासारखं नाक किंवा तत्सम अवयव खुपसतही नसे. काळा आणि पांढरा असे दोनच रंग माहित असणाऱ्या कोर्ट आणि सरकारादी कौतुकांना, दिवाळीची बहुविध रंगांची, गंधांची आणि आवाजाची दुनिया काय कळणार..!
लहानपणीची मी अनुभवलेला दिवाळीचा जादुई काळ माझ्या वयाच्या प्रत्येकाने अनुभवला असावा. आताच्या ‘प्रदुषण’, ‘प्रायव्हसी’ इतक्याच ‘परिक्षा’ या भयंकर शब्दानं तेंव्हा आमचं बालपण हिरावून घेतलं नव्हतं. अभ्यास हा शाळेतच करायचा असतो हा अनुभवसिद्ध समज होता. तेंव्हाच्या शाळेत ज्ञानाच्या व्याख्येत बसेल असं काहीतरी गवसायचं आणि त्याचं प्रात्यक्षिक समाजात पाहायला, अनुभवायलाही मिळायचं. चार आकडी पगार ही श्रीमंतीची कल्पना असलेल्या त्या दिवसांत, गरीबी हा काॅमन फॅक्टर असल्याने, सर्वांच्या आनंदाची व्याख्याही कमी-अधीक फरकाने सारखीच असायची. सर्व माणसं समान पातळीवर असायची. थोडक्या गोष्टीत काय गंमत असते, हे आता सर्वच उतू जाणाऱ्या परिस्थित जन्मलेल्या आताच्या पिढीला नाही कळायचं.
असो. कालाय तस्मै नम: म्हणत आहे त्या परिस्थितीला सामोरं जायचं आणि जे जसं समोर आलंय, ते तसंच आनंदाने उपभोगायचं. ही शिकवणही बालपणीचीच..!!
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा..!!
-नितीन साळुंखे
९३२१८११०९१
Leave a Reply