प्रसंग आहे सन १९९८ वर्षाच्या उन्हाळ्यातील, कितीतरी प्रसंग अनुभवायला येतात. पण काही प्रसंग मात्र कायमचे आठवणीत राहतात.जंगलात भटकंतीला गेलो असताना, निसर्गाने मुक्तपणे उधळलेले सौंदर्य न्याहाळत होतो. मला दूरवर एक मोठा वृक्ष दिसला,त्याच्या जवळ गेलो तर तो त्या परिसरातील सर्वात उंच वृक्ष होता.ग्रामीण भाषेत त्याला सातपुडीचा वृक्ष म्हणतात ( बुंध्याचा भाग सात पापुद्र्यांनी बनलेला असतो) . त्या मोठ्या वृक्षाखाली काही छोटी झुडपेही होती. निरीक्षण करीत असताना अकस्मात एक भयावह दृश्य दिसले.कापड फाडून फेकावे तसे एका हरिणाचे रक्ताने माखलेले कातडे फांदीवर लोंबकळत होते. दृश्य पाहून मी मात्र भांबावून गेलो, काय करावे ते सुचेना ! हे सर्व काम भुकेलेल्या वाघाचे होते,सावजावर येथेच्छ ताव मारल्यावर उरलेला भाग त्याने झाडावर टांगून ठेवला होता. आणि कुठल्यातरी ओढ्याच्या काठाने विश्रांती घेत असावा. प्रसंगी वाघोबांची स्वारी तिकडे येण्याची शक्यता होती. टांगून ठेवलेल्या शिकारीजवळ मी दिसताच वाघोबांना राग यायचा, आणि काही समजायच्या आत माझेही कातडे बाजूच्या झाडावर लोंबकळू लागायचे.या विचाराने मी गर्भगळीतच झालो आणि तिथे थांबून त्याचा शोध घेण्याऐवजी भीतीने भराभर चालायला लागलोमाझी पावले यंत्रवत झपाझप चालत होती, मात्र बघितलेल्या चित्राने मनात काहूर माजलेले होते. हरीणावरील अनपेक्षित हल्ल्याचा प्रसंग कसा असेल ? काळाने घात केला तेव्हा त्या हरिणाची स्थिती कशी असावी ? मनात वेगवेगळे विचार येत होते. काही विशिष्ट आनंदाने अथवा नेहमीच्या सवयीप्रमाणे ते हरीण मुक्त विहार करीत असावे,त्याचवेळी काळाने आघात केला असावा. व्याघ्ररूपी काळपुरुषाच्या हल्ल्याने क्षणात हरिणाला यमसदनाला पाठविले असेल. आघात झाला तेव्हा तिच्या डोळ्यात जी आसवे तरारली असतील ती, नजरेसमोर येऊ लागली. आसवांच्या धारांनी भरलेल्या डोळ्यांनी ती मुक्ततेची याचना करीत असताना, वाघाच्या डोळ्यात मात्र क्रूरतेचे अधिक भयानकच दर्शन होत असेल.
ती कोणा पाळसाची माता असेल, तर तिच्या मनात इच्छा असूनहीआपल्या बाळांना अखेरच्या क्षणी पाहण्याचे नशिबी नव्हते. भुकेलेल्या पाळसाला दुध पाजणे तर दूरच राहिले ! कोणा राजबिंड्या मृगाची प्रणयिनी असेल तर, अखेरच्या क्षणी आपल्या प्रियवराजवळ पडून प्राण त्यागण्याचे मनात असतानाही, दुर्दैवी हरिणाच्या नशिबी आले नाही.प्रणयक्रीडांची कल्पना करणे म्हणजे तिच्या कल्पनेच्या पलीकडील क्षण होता.पण इकडे वाघ महाशयांना रक्त आणि मांसावर ताव मारण्यात क्षणोक्षणी अधिकाधिक आनंद मिळत असावा, क्रूरतेने मिळवलेल्या अन्नाचा पोट भरेपर्यंत येथेच्छ आस्वाद घेणे त्याला आद्य कर्तव्य असल्याचा भास होत असावा. तो बिचारा तरी काय करणार निसर्गाने त्याला इतका लाचार बनविले की, अहिंसा पाळायला गेला तर जीवंत राहणेही कठीण. मग असे का व्हावे ? एकाला मारल्याशिवाय दुसरा जीवंत राहू शकत नाही ! हा निसर्गाचा संतुलन राखण्याचा नियम आहे का ? असे सत्य मानले तरी हे असंतुलनच नाही का ? ज्याचा स्नेही गेला त्याचे काय ? हरणाच्या मृत्यूमुळे, त्याच्या नवजात पाळसाचे काय झाले असेल ? आपल्या जिवलगाच्या विरहाने त्या मृगाचे काय झाले असेल ? स्वतः निर्माण केलेले सौंदर्य निसर्गच मिटविते काय ? अशा शेकडो प्रश्नांनी माझ्या मनात थैमान घातले. आजही तो प्रसंग आठवला की, मन अस्वस्थ होते. प्रश्नावर प्रतिप्रश्न निर्माण होऊन हृदयाल पिळ घातला जाते.हृदयाचे तुकडे करून टाकणाऱ्या प्रसंगांनी किती हरीणांचे दररोज मुडदे पडले जात असतील ? हा प्रश्नच मला अतर्क्य वाटतो …….
Leave a Reply