भूक लागली की दोन घास तरी खावेच लागतात. घरी असलात तर नीटनेटके जेवण घेतले जाते. बाहेर कुठे असलात तर एखाद्या उपहारगृहात डोसा किंवा त्याच्यासारखा एखादा पदार्थ खाल्ला जातो. पशुपक्षी, जलचर आणि किडेकीटक तर नेहमी खातच असतात.
सजीवांचे शरीर हे एक स्वयंचलीत यंत्र आहे. त्यामुळे त्याला, आपले नैसर्गिक व्यवहार करण्यासाठी उर्जेची गरज असते. निसर्गाने, ही उर्जा मिळण्यासाठी, परिपूर्ण अशी योजना फार कल्पकतेने केली आहे असे दिसून येते आणि तीही कोट्यावधी वर्षांपूर्वी. प्रत्येक सजीवाचा आहार हेच निसर्गाने शोधलेले आणि अत्यंत यशस्वीरित्या वापरलेले उर्जासाधन आहे. घेतलेल्याआहाराचे योग्यरित्या पचन व्हावे आणि योग्य ते घटक, सजीवाच्या प्रत्येक अवयवाला मिळावेत या साठी, निसर्गाने, प्रत्येक सजीवाच्या मेंदूत आनुवंशिक आज्ञावल्या भरून ठेवल्या आहेत. या आज्ञावल्या जनक पिढ्याकडून अपत्य पिढ्यात संक्रमित व्हाव्यात यासाठीही खास आनुवंशिक आज्ञावल्या विकसित केल्या असाव्यात.
प्रत्येक सजीवाला आपला आहार कोणता हे बरोबर समजते. कारण पूर्वानुभव. एखादी अनोळखी भाजी, फळ किंवा कंद दिसला तर तो तुम्ही खात नाही. पण कुणीतरी ती भाजी, फळ किंवा कंद खाण्याजोगा आहे असे सांगितले तर तुम्ही तो आहार घेता. पशुपक्षी यांनाही आपल्या अन्नाची जाण असते. मानवाने घेतलेला आहार सरळ पोटात जातो तर पशुपक्ष्यांनी घेतलेला आहार तात्पुरता एका पोटात साठविता येतो, नंतर तो सावकाश पचविण्यासाठी खर्याखुर्या पोटात पाठविला जातो. गायीम्हशींना तर चार पोटे असतात.
सजीवांचे पोट हा एक अफलातून अवयव आहे. हा अवयव मांसाचाच बनलेला असला तरी त्यात दुसर्या सजीवाचे मांस पचते पण स्वत:च्या पोटाचे मांस मात्र संरक्षित असते. कारण सजीवाच्या पोटाच्या आतील बाजूस, कातडीसारखे एक संरक्षक अस्तर असते. मानवी आहार पचण्यासाठी हैड्रोक्लोरिक आम्लाची गरज असते. हे अकार्बनी आम्ल निर्माण होण्याची आणि ते पोटात मिसळण्याची योजना निसर्गाने केली आहे. त्यासाठी लागणारी आनुवंशिक जनुकीय आज्ञावलीही जुळविली आहे. त्यामुळे पोटात आलेले, दुसर्या सजीवाचे मांस पचते पण स्वत:च्या पोटाचे मांस मात्र सुरक्षित राहते. पोटाचे स्नायू, पोटात असलेले अन्न घुसळण्यासाठी सारखी हालचाल करीत असतात. संरक्षक अस्तर आणि हैड्रोक्लोरिक आम्ल, आपण घेतलेल्या आहारातूनच तयार केले जाते.
वनस्पती, पशुपक्ष्यांप्रमाणे, आपले अन्न मिळविण्यासाठी हिंडूफिरू शकत नाहीत. म्हणून एका जागीच उभे राहून त्या आपले अन्न तयार करू शकतात. आणि वनस्पती हेच कित्येक सजीवांचे अन्न असल्यामुळे, अन्नसाखळीतली पहिली पायरी म्हणून वनस्पती ओळखल्या जातात. आपल्याला सर्वप्रकारची धान्ये, कडधान्ये, भाज्या, तेले, फळे वगैरे अन्नपदार्थ वनस्पतींपासूनच मिळतात. त्यामुळे जीवनावश्यक असणारी कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, खनिजे, जीवनसत्वे हे घटक मिळतात. गायीम्हशींच्या दुधापासूनही स्निग्धमय पदार्थ मिळतात. उपयोगी प्राण्यांचे मुख्य अन्न वनस्पतीच आहेत.
प्रकाशसंश्लेषण, ही पृथ्वीवरील सजीवांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची क्रिया आहे. वनस्पतींच्या हिरव्या पानात, हरितद्रव्य म्हणजे क्लोरोफिल हा पदार्थ असतो. कार्बनडाय ऑक्साईड, पाणी आणि सूर्यप्रकाश हे तीन घटक एकत्र असले म्हणजे हरितद्रव्याच्या सहाय्याने, ग्लुकोज या कर्बोदकाचे रेणू तयार होतात आणि ऑक्सीजन मोकळा होतो. वनस्पतींचा जीवनपट कसा असतो याविषयीची माहिती वनस्पतीशास्त्रावरील पुस्तकात पहावी. निसर्गात ही क्रिया गेली लाखो वर्षे घडते आहे म्हणूनच पृथ्वीवर सजीवसृष्टी, टिकली आहे.
हरितद्रव्याच्या एका रेणूत, कार्बनचे ५५ अणू, हैड्रोजनचे ७२ अणू, ऑक्सीजनचे ५ अणू, नायट्रोजनचे ४ अणू आणि मॅग्नेशियमचा एकच, फक्त एकच, अणू असतो. लेखाच्या सुरूवातीलाच हरितद्रव्याच्या रेणूचे रेखाचित्र दिले आहे. मॅग्नेशियमच्या या एका अणूने, या पृथ्वीवरच नाही तर या अख्ख्या विश्वात एव्हढा महत्वपूर्ण चमत्कार केला आहे की, निसर्गाचे करावे तेव्हढे कौतुक थोडेच आहे. पृथ्वीवर जर मॅग्नेशियमचे अस्तित्व नसते तर पृथ्वीवर आणि पर्यायाने या अख्ख्या विश्वात सजीवसृष्टी, कदाचित, निर्माण झाली नसती. निसर्गाने सौरउर्जेचा वापर किती कौशल्याने केला आहे हे मानवाने शिकण्यासारखे आहे.
सजीवांची पचनसंस्था म्हणजे एक, अन्नशुध्दीकरण कारखानाच आहे. सजीवांनी खाल्लेल्या अन्नातून, वेगवेगळे घटक अलग करून, ते रक्तात मिसळवून, योग्य त्या अवयवाकडे पोचविण्याचे काम, सजीवांची पचनसंस्था करीत असते. डोळ्यांच्या रेटिनावर, प्रकाशाला संवेदनशील असणार्या संयुगाचा थर असतो. हे विशिष्ट संयुग तेथपर्यंत पोचले नाही तर आपण आंधळे होऊ. याचप्रमाणे रक्तातील घटकांना म्हणजे लाल रक्तपेशी, पांढर्या रक्तपेशी वगैरेंना हवा असलेला कच्चा माल पोचला नाही तर अनेक रोग होऊ शकतात. शरीराच्या, त्वचा, केस, नखे, दात, वीर्य, शुक्राणू, बीजांड वगैरेंना त्याचे मूळ घटक मिळणे आवश्यक असते आणि ते त्यांना मिळतातही. पण या सर्वांना सजीवाने घ्यावयाच्या आहाराची गरज आहे.
शरीरातील कारखाने किती प्रचंड आहेत आणि त्यातील उत्पादने किती शुध्द असतात हे, रक्तातील घटकांच्या उत्पादनावरून स्पष्ट व्हावे. तांबड्या रक्तपेशी, तांबड्या अस्थिरसातील मूलपेशींमुळे तयार होतात. या पेशी तयार होण्याचा वेग २० ते ३० लाख पेशी प्रतिसेकंद इतका प्रचंड असतो. दिवसाकाठी २०० अब्ज तांबड्या रक्तपेशी, १०० अब्ज पांढर्या रक्तपेशी आणि ४०० अब्ज प्लेटलेट्स तयार होतात. एका लाल रक्तपेशीत, हेमोग्लोबिनचे सुमारे २७ कोटी रेणू असतात. हेमोग्लोबिनच्या एका रेणूत कार्बनचे ३४ अणू, हैड्रोजनचे ३२ अणू, ऑक्सीजनचे ४ अणू, नैट्रोजनचे ४ अणू आणि लोखंडाचा फक्त १ म्हणजे १ च अणू असतो. एव्हढे रक्त निर्माण होते तरी त्याचा रक्तगट, व्यक्तीच्या जन्मापासून मरणापर्यंत तोच असतो, त्यात कधीही चूक होत नाही.
सजीवांच्या शरीरात, दररोज, लाखो जीवरसायने तयार होत असतात. त्यांना लागणारा कच्चा माल म्हणजे विशिष्ट घटक, सजीवांनी घेतलेल्या आहारातूनच मिळतात. हे घटक अलग काढून, त्यांच्यापासून आवश्यक ते जीवरसायन तयार करण्याची यंत्रणा शरीरातच असते. हे विशिष्ट घटक अन्नातून मिळाले नाहीत तर या रसायनांत त्रुटी निर्माण होतात किंवा ही रसायने तयार होतच नाहीत. त्यामुळे शरीरात दोष निर्माण होतात. आईच्या गर्भाशयात, गर्भ वाढत असतांना, आवश्यक ते घटक, आईने घेतलेल्या आहारातून मिळाले नाहीत तर गर्भाची वाढ नीट होत नाही, व्यंगे निर्माण होतात.
सजीवांचा मेंदू आणि आनुवंशिक आज्ञावल्या.
कोणताही परिणाम दिसण्यासाठी किंवा कोणतीतरी घटना घडायला कोणते तरी कारण असावे लागते. तसेच त्या घटना घडण्यासाठी किंवा ते परिणाम दिसण्यासाठी कोणत्यातरी उर्जेचा थोडातरी सहभाग असावा लागतो. सजीवांच्या हालचाली, सजीवांच्या शरीरातील घडामोडी आणि सजीवांचे व्यवहार या सर्वांवर त्यांच्या मेंदूचे नियंत्रण असते. हे नियंत्रण ठेवण्यात तो मेंदू कसा यशस्वी होतो ही फार महत्वाची बाब आहे.
सजीवांच्या मेंदूला संगणकाची उपमा अगदी फिट बसते. संगणकाच्या हार्ड डिस्कमध्ये, जे सॉफ्टवेअर भरले असते म्हणजे, ज्या आज्ञावल्या भरल्या असतात त्यानुसारच तो संगणक काम करीत असतो. सजीवांच्या मेंदूचेही असेच असते. शरीरावर मेंदूचे नियंत्रण असण्यासाठी, निसर्गाने त्यांत निरनिराळ्या आज्ञावल्या भरून ठेवल्या आहेत. या आज्ञावल्या, निसर्गाने, केव्हा आणि कशा विकसित केल्या, कोणत्या भाषेत त्या मेंदूत भरून ठेवल्या, त्या जनक पिढीतून अपत्या पिढीत संक्रमित होण्यासाठी आणखी कोणती आज्ञावली विकसित केली, हे सर्व जाणून घेणे, मानवी मेंदूच्या मर्यादे पलिकडले आहे असे वाटते.
आहार भक्षण…एक यज्ञकर्म.
आपल्या पूर्वजांनी आणि रुशीमुनींनी आहाराचे महत्व बरोबर ओळखले. अन्न आणि जेवण यांना त्यांनी आदराची वागणूक दिली. अन्न हे पूर्णब्रम्ह समजले. त्याची नासाडी करू नये, ते फेकून देऊ नये, आपल्या जवळ जास्त अन्न असेल तर ते भुकेलेल्यांना दान करावे वगैरे शिकवण दिली.
पवित्र वातावरणात आणि पवित्र भावनेने जेवण घेतल्यास त्याची पचनक्रिया नीटतर्हेने होते हेही त्यांनी बरोबर हेरले. जेवतांना रागावणे, अन्नपदार्थांत दोष काढून नापसंती दर्शविणे वगैरे प्रकार टाळावेत आणि आनंदी वातावरणात समाधानाने जेवण घ्यावे म्हणजे त्याचे पचन व्यवस्थित होते. भूक लागली नसतांना बळजबरीने जेवल्यासही पचन नीट होत नाही.
गजानन वामनाचार्य
रविवार ६ मे २०१२.
आपण घेतलेल्या आहाराचे कशा प्रकारे पचन व्हावे आणि त्या आहारातील जीवनघटक शरीरातल्या विविध घटकांना कशा प्रकारे मिळावेत हे काम जनुकसूत्रांमधल्या आज्ञावल्यांनुसार ठरतं हे पटणारं नाही. अनेकदा एखाद्याचे आई वडील कृश शरीरयष्टीचे असले तरी पोरगा मात्र दंडबैठका काढून पैलवान बनलेला दिसतो. ह्याउलट आई वडील दोघेही मजबूत बांध्याचे असले तरी पोरगं मात्र अवजतन झालेलं असू शकतं. Nature vs Nurture ह्या वादामधे हे सिद्ध झालं आहे की नेचरपेक्षा नर्चर हेच जास्त प्रभावी असतं…