काही अतिरेकी भक्तलोक देव, देवी किंवा महाराजांचे उगाचच धमकीवाले मेसेज पाठवतात. नुसते पाठवत असतील पाठवू देत बिचारे! त्याचे काही नाही. पण त्यांनी पाठवलेल्या मेसेजची लिंक तोडायची नसते. मेसेज पुढे पाठवला नाही तर फार मोठे नुकसान होणार अशी वर धमकी असते. जो भक्तिभावाने मेसेज पुढे पाठवतो त्याला नोकरी वगैरे लागते, नोकरी नाही तर लॉटरी तर लागतेच. कुणाकुणाला मुलेही होतात. हो, खरंच! असं त्या मेसजमध्ये लिहीलेलं असतं. आणि याउलट कुणी हा मेसेज डिलीट केला तर त्याचा अॅक्सिडेंट होतो किंवा त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात येते. यापैकी काही नाही झाले तर त्याचा धंदा तरी डुबतो.
आपल्या दुर्दैवाने असा एखादा मेसेज आलाच तर आपणही आपल्या जबाबदार्या ओळखून नाईलाजाने जो कोण शिव्या देणार नाहीत त्यांची नावे आठवायला लागतो. माझा एक मित्र असे मेसेज पाठवले की खूप शिव्या देतो. तो नास्तिक आहे अशातला भाग नाही. उलट अशा मेसेजेसना तो जाम घाबरतो. अशी काही धमकी आली की त्याला चैनच पडत नाही. ते मेसेज त्याला पुढे पाठवावेच लागतात तेव्हा कुठे तो सुटकेचा नि:श्वास सोडतो. आता तर वॉट्सअॅपची सोय झाली आहे. गुपचुप कुठल्यातरी गु्रपमध्ये ढकलता येतो. नंतर “सॉरी, चूकून पाठवला…” वगैरे सारवासारवीही करता येते.
पूर्वीच्या काळात मेसेज पाठवायला पैसे पडायचे. कधी कधी तर एकवीस मेसेज पाठवायला लागायचे. हे म्हणजे जरा अतीच! काही महाभागांनी एक शक्कल काढली होती, ज्या कुणाकडून असा मेसेज आला त्यालाच “२१ गुणिले…” लिहायचे आणि तोच मेसेज लगेच परत ठोकून द्यायचा. हे म्हणजे लग्नाच्या आहेरात आलेली साडी लगेच परत करण्यासारखा प्रकार. तिथे फक्त पार्टी बदलायची. इथे तसे नाही, पार्टी तीच. प्राचीनकाळी म्हणजे साधारण इ.स. २००० च्या आसपास लोक अशा मॅटरची पत्रकेही काढून वाटायचे म्हणे! असो, याचा अनुभव आम्हांला नाही. खरंच नाही.
एक दिवशी असाच कुणाचातरी एक मेसेज आल्यावर दिन्या बेफिकिरीने म्हणाला, “मी नाही फॉरवर्ड करत असले मेसेज कुणाला.”
हे ऐकून सावंत उडालाच, “म्हणजे तू लिंक तोडतोस?”
“कसली लिंक?”
“असल्या मेसजेसची.”
“येडा आहेस काय रे तू सावंत? हे काय खरं नसतं.”
“गप्प बस! म्हणून तर तुझे लग्न होत नाही. आपले प्रमोशन रखडलंय. च्यायला! तुझ्या एकटयामुळे आमचेे सगळयांचेही अडून आहे. संगतीचा परिणाम असतो तो असा.” असे म्हणून सावंत निराश होउुन एकटाच चहा प्यायला निघून गेला. वास्तविक त्यादिवशी चहा द्यायचा त्याचा टर्न होता.
एका विद्यार्थ्याने ही पोस्ट शेअर केली तर त्याला टेस्टमध्ये वीसपैकी एकोणिस मार्क मिळाले. एका मुलीने ही पोस्ट फेसबुकच्या चार गु्रपवर टाकली तर तिला नामांकित कंपनीचे मेकअप कीट फुकट मिळाले. (कसे ते विचारू नये, ते एक सिक्रेट आहे). एका गरीब माणसाने (म्हणजे सार्वजनिक व फुकटाचा वायफाय वापरून) ही पोस्ट शेअर केली तर त्याला नवीन चलनात आलेली पाचशेची नोट सापडली. हे सगळे बोधामृत वाचूनही ज्यांनी कोणी ही पोस्ट शेअर केली नाही त्यांची फेसबुक अकाउुंट बंद झाली आहेत, त्यांचा वायफायचा पासवर्ड आपोआप बदलला आहे आणि तो रिसेट करता येत नाही. बर्याचजणांचे फोन हँग झाले आहेत व ते नुसतेच रिस्टार्ट होताहेत. बघा बाबा, निर्णय तुमचा आहे!!
© विजय माने, ठाणे
https://vijaymane.blog/
Leave a Reply