रविवार १५ एप्रिल २०१२.
सजीवांची त्वचा, कातडी, चामडी ही निसर्गाची अदभूत, अनन्यसाधारण निर्मिती आहे. त्वचा ही मानवी शरीराचेच नव्हे तर सर्व सजीवांचे बाहेरचे आवरण आहे. प्रत्येक प्राण्याची कातडी आणि तिचे सौंदर्य अप्रतीम, वैशिष्ठ्यपूर्ण असते. तिच्यावरील रंगाविष्कार अवर्णनीय आहेत. पोपटांचे, मोराचे रंग, वाघ, जिराफ, झेब्रांचे पट्टे, चित्त्यांचे ठिपके यांना जबाब नाही. कातडीवर केस असतात. त्यांचेही रंग अप्रतीम. निरनिराळ्या दिशांनी पाहिले तर ते वेगवेगळे दिसतात. सरडे आणि काही कीटक तर, आसमंतातील निसर्गाच्या रंगाप्रमाणे आपल्या कातडीचे रंग बदलवून इतर प्राण्यांची फसवणूकदेखील करतात. निसर्गाने ही किमया कशी साधली असावी या संबंधीचा हा निबंध.
फळांची किवा झाडांची साल म्हणजे त्यांची त्वचाच आहे. प्रत्येक फळाची साल वेगळी. केळ्याची साल, मोसंबीची साल, संत्र्याची साल, टरबुजाची साल, फणसाची साल वगैरे. सगळ्या वेगवेगळ्या आणि वैशिष्ठ्यपूर्ण. त्यांच्यावरील रंगकाम आणि चित्रकलादेखील वेगळी. सालीवरून फळ ओळखता येते. फळ कच्चे असले तर हिरवा रंग आणि ते पिकले म्हणजे केशरी, नारिंगी, लाल, जांभळा असे आकर्षणीय रंग. पक्षी आणि जलचरांच्या बाबतीतही हीच तर्हा.
शेंगांचे सालपट म्हणजे आतील बियांचे पोषण आणि संरक्षण करणारी त्वचाच. आतील बियात, त्या झाडाच्या सर्व गुणधर्माच्या आनुवंशिक आज्ञावल्या आणि संकेत साठविलेले असतात. बिया जमिनीत पेरल्या, रोज थोडे पाणी घातले की त्या बियांना अंकुर फुटतात आणि एका झाडाचा जन्म होतो. अंकुर जमिनीत रुजण्यास काही काळ जावा लागतो. त्या काळात, आवश्यक असणारी पोषणद्रव्ये त्या बियातच असतात. मानवाला उपयोगी असलेली पोषक तेले म्हणजे त्या झाडाच्या अंकुराचे अन्नच असते. ही पोषणमूल्ये सुरक्षित रहावीत म्हणून प्रत्येक बी ला संरक्षक कवच असते. बदाम, नारळ वगैरेंचे कवच कठीण असते. आता लक्षात येते की निसर्गाने, पृथ्वीवरील सजीवांची आणि वनस्पतींची किती काळजी घेतली आहे. शास्त्रज्ञांनाही लाजवील इतक्या या प्रणाली परिपूर्ण आहेत.
मानवी त्वचा ::
त्वचा हा सर्वात मोठा मानवी अवयव समजला जातो. सर्वसाधारण माणसाचा देह सुमारे ७० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या त्वचेने झाकलेला असतो.
कातडीमुळे सजीवांना अनेक प्रकारचे संरक्षण मिळते आणि निरोगी त्वचेमुळे शरीराचे सौंदर्य वाढते. त्वचा, मानवी शरीरातील पाण्याचे आणि पर्यायाने शरीराच्या तापमानाचे नियंत्रण करते. शरीराला आवश्यक असलेले जीवनसत्व ड हे देखील, त्वचेतच, सूर्यप्रकाशाच्या सान्निध्यात तयार होते. म्हणूनच सूर्यस्नान आवश्यक आहे. त्वचा म्हणजे पाच इंद्रियांपैकी महत्वाचे असे स्पर्शेद्रिय आहे. सजीवांचे बाबतीत, त्वचेकडून, निसर्गाने अनेक प्रकारची उद्दिष्टे साधली आहेत.
मानवी त्वचेचे ३ स्तर असतात. बाह्य स्तर, (एपिडर्मिस), अंतस्तर (डर्मिस) आणि तिसरा अगदी खालचा, शरीराला जोडलेला (सबक्यूटॅनिअस) स्तर. त्वचेचे प्रमुख घटक म्हणजे केसांची मुळे, घामाच्या ग्रंथी, रंगद्रव्य आणि स्पर्शग्रंथी. त्वचेविषयी विस्तृत माहिती, जीवशास्त्राच्या पुस्तकांत आणि ज्ञानकोशात दिलेली असते ती अवश्य वाचावी.
सजीवांची त्वचा घडवितांना, निसर्गाने, अनेक असामान्य कृती प्रत्यक्ष अंमलात आणल्या आहेत आणि त्याही कोट्यवधी वर्षांपूर्वी. त्वचानिर्मितीची यंत्रणा इतकी शास्त्रशुध्द आणि प्रमाणीत आहे की ती आपोआप बिनचुकपणे कोट्यवधी वर्षांपासून काम करीत आहे. इतकेच नव्हे तर, पृथ्वीवरील हवामान आणि वातावरणानुसार त्या यंत्रणेत सकारात्मक बदल उत्क्रांतही झाले आहेत.
निसर्गाने, सजीवांच्या कातडीचे वस्तूद्रव्य कसे निवडले असावे? मातेच्या गर्भाशयात असतांनाच, मातेने घेतलेल्या आहारातूनच कातडीचे वस्तूद्रव्य अलग काढून गर्भाची त्वचा निर्माण करण्याची आज्ञावली प्रथम कशी तयार झाली? ही आज्ञावली पुढच्या पिढीत संक्रमीत होण्यासाठी निराळी आज्ञावली असण्याची आवश्यकता आहे हे जाणून ती आज्ञावलीही मातेच्या आहारातूनच निर्माण व्हावी याचीही सोय केली. या सर्व बाबींचा विचार केला की असे वाटते की या मागे धीमंत योजना म्हणजे इंटिलिजंट डिझाईन आहे हे नक्की.
विज्ञानीय दृष्टीकोनातून मानवी त्वचेचा विचार केला तर असे आढळते की निसर्गाने हा अवयव प्रत्यक्षात कसा घडविला हे एक महान आश्चर्य आहे. वास्तवशास्त्र, रसायनशास्त्र, जैवविज्ञान, अभियांत्रिकी वगैरेंचा वापर कसा प्रमाणित केला हे, मानवी मेंदूच्या मर्यादेपलीकडले आहे असे वाटते.
केसांमुळे सजीवांचा, थंडीपासून बचाव होऊ शकेल हे निसर्गाने कसे जाणले? कातडीवर केस लावायचे म्हणजे केशग्रंथीची आवश्यकता आहे. केस हा खरे पाहिले तर एक रासायनिक पदार्थच आहे. त्याचे संश्लेषण म्हणजे सिंथेसिस, केशग्रंथीकडून करवून घेणे, केसांना लागणारा कच्चा माल, मानवाने घेतलेल्या आहारातूनच मिळविणे, केसांची योग्यतर्हेने निगा राखली जावी यासाठीची यंत्रणा सिध्द करणे या सर्व बाबी साध्य करायच्या म्हणजे खरोखरच अतीकठीण काम आहे. पण ते निसर्गाने, आनुवंशिक आज्ञावल्या प्रस्थापित करून, कोट्यवधी वर्षांपासून यशस्वीरित्या राबविल्या हे विशेष. प्राण्यांची केसाळ कातडी, पक्षांची, उबदार केस असलेली कातडी आणि त्यांचे पिसे असलेले पंख वगैरे निसर्गाने कसे निर्माण केले असावेत?
उष्णप्रदेशातील सजीवांच्या कातडीत, मेलॅनीन नावाचे रंगद्रव्य जास्त प्रमाणात असते म्हणून त्यांची त्वचा काळी असते. त्यामुळे प्रखर सूर्यप्रकाशातील अतीनील किरणांपासून त्यांचे संरक्षण होते. तर थंड प्रदेशातील माणसांच्या त्वचेत मेलॅनीनचे प्रमाण कमी असते कारण वातावरणात जी काही थोडी उष्णता असते ती त्यांच्या शरीरात शोषली जावी आणि शरीराची उब वाढावी. उष्णप्रदेशातील अस्वलांचे केस काळे असतात तर धृवप्रदेशातील अस्वलांचे केस पांढरे असतात.
आता थोडा विचार करा. सूर्याच्या अतीनील किरणांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी मेलॅनीन हेच संयुग आदर्श आहे हे निसर्गाला कसे समजले? टायरोसीन नावाच्या अमायनो आम्लाचे, विशिष्ट परिस्थितीत, बहुवारीकरण (पॉलीमरायझेशन) झाले म्हणजे मेलॅनीन गटातील संयुगे निर्माण होतात. त्यामुळे बुबुळे, केस आणि कातडीचा रंग ठरतो. मेलॅनीन तयार करण्यासाठी बाह्य त्वचेत, मेलॅनोसाईटस् नावाच्या ग्रंथी असतात. प्रत्येक व्यक्तीच्या मेलॅनीनचा रंग वेगळा असतो. अगदी सारख्या रंगाची कातडी असलेल्या दोन व्यक्ती आढळणे दुर्मिळ आहे. सजीवांच्या कातडीचा रंग, रचना, त्यावरील नक्षीकाम वगैरेंचे संकेत, आनुवंशिक तत्वात साठविलेले असतात. आणि ते पुढील पिढ्यात संक्रमित होण्यासाठी आनुवंशिक आज्ञावल्याही असतात. विचार करून मेंदू ठप्प झाला की नाही? हे सर्व निसर्गाने कसे साधले असावे?
घामाच्या बाह्यस्त्रावी ग्रंथींची निर्मिती :: निसर्गाने, सजीवसृष्टीत, विज्ञानाचा किती कौशल्याने वापर केला आहे याचे, घामाच्या ग्रंथी हे उत्तम उदाहरण आहे.
कोणत्याही द्रवाचे जेव्हा बाष्पीभवन होते तेव्हा लागणारी उष्णता त्या द्रवातूनच घेतली जाते. त्यामुळे त्या द्रवाचे तापमान कमी होते हे १०० टक्के वास्तवशास्त्र आहे. मडक्यात ठेवलेले पिण्याचे पाणी थंड होते किंवा ओले कापड थंड लागते याचे हेच कारण आहे. या वास्तवशास्त्रीय नियमाचा, निसर्गाने, किती खुबीने मानवी शरीरात वापर केला आहे हे पाहू या.
निरोगी मानवाच्या शरीराचे तापमान सुमारे ३७ अँश सेल्शियस इतके स्थिर राहणे आवश्यक आहे. कमी झाले तर उबदार कपडे घालून ते वाढविता येते. पण जास्त झाले तर ते कमी करण्यासाठी, मानवी कातडीवर पाणी आणून त्याचे वाष्पीभवन झाले तर शरीराचे तापमान कमी होईल हा निर्णय निसर्गाने कसा घेतला असेल? नंतर या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी कोणकोणत्या योजना केल्या हे अनाकलनीय आहे.
त्वचेच्या आकृतीत घामाच्या ग्रंथी दाखविल्या आहेत. त्यातून रक्त खेळविले जाते आणि रक्तातले पाणी ग्रंथीत साठविले जाते. हाच आपला घाम. हा घाम त्वचेच्या पृष्ठभागावर आणण्यासाठी नळ्या बसविलेल्या असतात. त्यांची त्वचेच्या पृष्ठभागावरील छिद्रे म्हणजे घामाची रंध्रे. तेथून घाम, दवबिंदूंच्या स्वरूपात कातडीवर जमा होतो हा आपला अनुभव आहे.
शरीराचे तापमान ३७ अंशापेक्षा जास्त झाले की, मेंदूला तसे संदेश जातात. सजीवाच्या शरीराचे तापमान मोजण्याची यंत्रणा, शरीरात कुठे असते कोण जाणे. पण ती अती कार्यक्षम आहे. वाढलेल्या तापमानाचे संदेश मेंदूला गेले की आपल्याला उकडू लागल्याची जाणीव होते. पण त्याआधीच मेंदूने आपली कार्यवाही सुरू केलेली असते. घामाच्या ग्रंथीतून घाम पाझरू लागतो आणि त्याचे बाष्पीभवन लवकर व्हावे म्हणून आपण पंख्याने वारा घेऊ लागतो.
तापमान लवकर कमी व्हावे यासाठी हजारो घामग्रंथी शरीराच्या सर्व भागावर असल्या पाहिजेत आणि त्यात नेहमी घाम साठविलेला राहिला पाहिजे ही योजना म्हणजे एखाद्या महान शास्त्रज्ञाने आणि जैवअभियंत्याने बसविलेली यंत्रणाच आहे. याबाबतीत विचार केला की असे वाटते की ही, धीमंत योजना म्हणजे इंटिलीजंट डिझाईन आहे. घाम येणे ही अगदी सामान्य बाब वाटत असली तरी तरी ती विज्ञानीय दृष्ट्या असामान्य आहे हे ताबडतोब पटते.
सरड्याची रंगबदलू त्वचा ::
आसमंतातील निसर्गाच्या रंगाप्रमाणे आपल्या त्वचेचे रंग बदलविण्याची यंत्रणा, सरडे, नाकतोडे या सारख्या काही प्राण्यात असते. काही जातीच्या फुलपाखरांच्या पंखांवरील रंग आणि चित्रकला अशीच फसवी असते. शत्रूपासून आपला बचाव करण्यासाठी, किंवा भक्ष्याला फसवून त्याची शिकार करता यावी यासाठी, त्यांना निसर्गाने दिलेली ही देणगी आहे. या देणगीतील असान्यत्व आता जाणून घेऊ या.
आसमंतातील निसर्गात कोणकोणते रंग आहेत हे सरड्याच्या मेंदूला कसे कळते? त्याच्या डोळ्यात ही यंत्रणा असली पाहिजे किंवा त्याच्या कातडीत काही रंगसंवेदना ग्रंथी, कलर सेन्सर्स, असले पाहिजेत. रंगांबद्दलची ही माहिती तो मेंदूत साठवून ठेवतो. शत्रू किंवा भक्ष्याची चाहूल लागली, की त्याचा मेंदू, या माहितीचा उपयोग करतो, एक रंगीत चित्र तयार करतो आणि त्यानुसार, कातडीत असलेल्या मेलॅनोसाईट ग्रंथीना आज्ञा देऊन तो पॅटर्न कातडीवर निर्माण करतो. कशी वाटते ही निसर्गाची किमया?
निसर्ग किती महान आहे याची थोडीतरी कल्पना या विवेचनामुळे येईल याची खात्री आहे. ईश्वर सर्वज्ञ आहे म्हणूनच तो ही सृष्टी निर्माण करू शकला असे सरळसोट स्पष्टीकरण कुणीही देईल. निसर्ग म्हणजेच ईश्वर असे समीकरण मांडणे अपरिहार्य वाटते. पण हा ईश्वर म्हणजे, प्रत्येक धर्माने कल्पिलेला अध्यात्मिक ईश्वर नव्हे तर हा आहे विज्ञानेश्वर.
— गजानन वामनाचार्य
Leave a Reply