नवीन लेखन...

एटीएमची चोरी – (कथाकुंज क्रमांक ८)

बाळू शिंदे, हुसेन आणि मटकर हे त्रिकूट पोलिसांच्या दफ्तरात नोंदलेलं होतं.
तिघेही लहान सहान गुन्ह्यांसाठी तुरुंगवास भोगून आले होते.
तिथेच त्यांची दोस्ती झाली होती.
त्रिकूट आता मोठे दरवडे घालायला मागेपुढे पहात नसे.
मटकर हा खरं तर इलेक्ट्राॅनिक्स इंजिनीअर.
तो आपल्या ज्ञानाचा उपयोग ह्या चोऱ्यांची आंखणी आणि अंमलबजावणी दोन्हीसाठी करत असे.
तिघे बाईकवरून फिरत असत.
बाळू आणि हुसेन या दोघांनी स्त्रियांच्या गळ्यांतील दागिने हिसकावून पळून जायचे उद्योग पूर्वी केले होते.
आता तिघांना अशा किरकोळ चोऱ्यात रस नव्हता.
त्यांना वाटे की आपण जेवढी जोखीम घेतो, त्याच प्रमाणात फायदाही व्हायला हवा.
सहा महिन्यात त्यांनी तीन कुलूपबंद घरांवर दरवडे टाकून माल पळवला होता.
अलिकडे लोक सावध झाले होते.
घरांत फुटकळ दागिने किंवा चक्क खोटे दागिनेच सांपडत.
रोकड कमीच मिळत असे.
त्यांना आपले श्रम वायां गेल्यासारखे वाटे.
ते नाराज होत असत.
तिघांचा विचारविनिमय चालला होता की काय करावं ?
तिघांचेही स्वतःचे बॅंकेत खाते होते.
त्यांनी केवायसी कशी केली होती आणि कोणत्या नांवाने खाती उघडली होती, ह्या तपशीलांत आपण नको जाऊया.
त्या त्रिकूटाच्या दृष्टीने ह्या अतिशय मामुली गोष्टी होत्या.
बॅंक अकाऊंट असल्यामुळे साहाजिकच त्यांच्याकडे एटीएम कार्डही होते.
एकदा बाळूला एटीएममधून पैसे काढायचे होते.
तिघांनी बाईक एटीएमसमोर थांबवल्या.
बाळू आंत एटीएममधून पैसे आणायला गेला.
हुसेन मटकरला म्हणाला, “मटकर, अरे एटीएम कार्ड असून मला कांही पैसे काढता येणार नाहीत. कारण खात्यात कांही पैसेच नाहीत.”
मटकर म्हणाला, “डरो मत यार, एटीएममधून पैसे काढायच्या बऱ्याच हिकमती आहेत.”
नंतर मटकरने त्याबद्दल दोघांना माहिती दिली होती.
एका पध्दतीप्रमाणे लोकांच्या कार्डांचा सर्व तपशील मिळवून तशीच कार्ड करून घ्यायची व पैसे काढायचे.
ही पध्दत बाळू आणि हुसेनला आवडली नाही.
खटाटोप जास्त नी फायदा कमी.
मटकर म्हणाला, “दुसरी पध्दत म्हणजे एटीएममधली सर्वच रोकड लंपास करायची.”
बाळू आणि हुसेन ह्यांनी कान टवकारले.
बाळूने विचारले, “किती रोकड असते एटीएममध्ये ?”
मटकर म्हणाला, “आठ दहा लाखांपासून ते तीस लाखांपर्यंत.
वेगवेगळ्या कंपन्याचे वेगवेगळ्या प्रकारचे एटीएम असतात.”
हुसेन आतुरतेने म्हणाला, “पुढे बोल. कसं करायचं ते बोल.”
मटकर म्हणाला, “गॅस कटरने एटीएमचा पत्रा कापतां येतो.
खूप काळजी घ्यावी लागते.
कॅमेरा चालू असेल तर आपण दिसू शकतो.
आपलं पोलिस रेकाॅर्ड आहे.
तेव्हां ते धोकादायक आहे.
शिवाय कांही मशीन्सना धोक्याची सूचना देणारी घंटा जोडलेली असते.
पण कांही जुन्या मशीन्स बसवल्यांत तिथे कॅमेरा नाही आणि अलार्मही नाही.
अजून अशा बऱ्याच मशीन्स आहेत.”
बाळूने विचारले, “पण एटीएममध्ये कापाकापी करतांना आवाज नाही होत ? आणि कोणी आलं तर ?”
मटकर म्हणाला, “कोणता एटीएम फोडायचा त्याचा आपल्याला अभ्यास करायला लागेल.”
अभ्यास हा शब्द ऐकून बाळू आणि हुसेन दोघांनीही आंबट चेहरा केला.
त्या दोघांनी आठवी पर्यंत कशीबशी मजल मारलेली होती.
मटकर त्यांच्या चेहऱ्यांकडे पहात म्हणाला, “अरे, अभ्यास म्हणजे कांही पुस्तक नाही वाचायचे.
एटीएमवर नजर ठेवायची.
रोकड केव्हां भरतात ?
लोकांची गर्दी केव्हां असते ?
रात्री किती वाजेपर्यंत लोक पैसे काढायला येतात ?
हे सर्व लक्षांत घेऊन सोयीचा एटीएम आणि सोयीची वेळ निवडायची.”
बाळू आणि हुसेनचे चेहरे लकाकले.
“तू फक्त सांग की आम्ही सगळी माहिती तुला काढून देतो.”
हुसेन म्हणाला आणि बाळूने दुजोरा दिला.
कित्येक दिवस नजर ठेवून आणि माहिती मिळवून त्रिकूटाने बारा एटीएम निवडले.
कांही बॅंकानी अती उत्साहाने वस्ती नसलेल्या रस्त्यांवर कारने जाणाऱ्या/येणाऱ्यांसाठी बसवलेले एटीएम होते.
ते ह्यांच्या बाराच्या यादीत आले.
कांही ठिकाणी दिवसा गर्दी असे पण रात्री पूर्ण सामसूम असे.
ते ही एटीएम ह्यांच्या यादीत आले.
असे करत त्यांनी बारा एटीएम तीन महिन्यात फोडायचा बेत आंखला.
अर्थात हे सर्व एटीएम ‘अनमॅनड्’ म्हणजे सुरक्षारक्षक नसणारे होते, हे वेगळे सांगायला नकोच.
चोरीची पध्दत अगदी सोपी होती.
रात्री एक वाजून गेल्यावर एकजण जणू कांही आंतल्या माणूस बाहेर यायची वाट पहातोय, असे दाखवत बाहेर उभा राही.
दोघे आंत शिरत व गॅस कटर वापरून एटीएम कापून आतली सर्व रोकड पिशवीत भरत.
कॅमेरा बहुदा नसेच.
त्यामुळे त्यांचे चेहरे टिपले जाणार नव्हते.
सर्व काम पार पाडायला केवळ पंचवीस मिनिटे लागत.
एकूण तीन बॅंकांच्या पांच एटीएम मधून सुमारे पन्नास लाख रोकड चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल झाली होती.
त्या सर्वच एटीएमची देखभाल व रोकड भरण्याचे काम बॅंकांनी एका खाजगी कंपनीवर सोपविलेले होते.
त्या कंपनीने बॅंकातर्फे पोलिसात तक्रार केली आणि विमा कंपनीकडून पैसे घेतले.
विमा कंपन्या अर्थातच पुढचे हप्ते वाढवून ती रक्कम पुन्हा बॅंकांकडून व बॅंका सामान्य ग्राहकांकडून ह्या ना त्या रूपात घेणार होत्या.
सुव्यवस्थेच्या दृष्टीने ह्या चोऱ्या दुर्लक्ष करण्यासारख्या नाहीत, हे पोलिसांच्या लक्षांत आले होते.
त्यांना मिळालेल्या महितीवरून चोरांची चोरी करण्याची पध्दत एकच होती.
म्हणजे एटीएम मधील रोकड चोरणारी टोळी शहरांत आली होती.
इतर कांही राज्यांत अशा चोऱ्या झाल्याचे पोलिसांनी माहित होते.
तेव्हां पोलिसांनी त्या बाजूने त्या टोळ्यांचा शहरांत तपास सुरू केला.
त्या राज्यांकडून संबंधित गुन्हेगारांचे फोटो व बोटाचे ठसे वगैरे मागवले.
बोटांच्या ठशांचा कांही फारसा उपयोग नव्हताच कारण गुन्हेगार हातमोजे घालूनच चोरी करत होते.
आपल्याच राज्यांत अशी नवी टोळी तयार झाली असेल असे त्यांना वाटले नाही.
त्यामुळे तपासाची दिशा चुकली व ही टोळी आपले पुढचे उद्योग सुरू ठेवायला मोकळी राहिली.
टोळीने पुढचे ठिकाण म्हणून हायवेजवळ कोपऱ्यावर असणाऱ्या एका एटीएमची निवड केली होती.
त्याच्या जवळपास घरं नव्हती.
तो एटीएम हायवे पासून जरासा आंत असला तरी त्याच्यावर झगमगणारी पाटी हायवेवरून दिसत असे.
दूर जाणारे अनेकजण तिथून रोकड काढत.
त्यामुळे त्याची क्षमता जास्त ठेवली होती.
त्यांत एका वेळेस तीस लाख रोकड भरत असत.
तो एटीएम तुलनेने अगदी जुन्यांतला नव्हता तरी अद्ययावत नव्हता.
तिथे सुरक्षारक्षक नव्हता.
कॅमेरा एटीएमशी जोडलेला नव्हता.
दरवाजाच्या वर बसवलेला होता.
तो चालू नव्हता.
कंपनीच्या माणसाच्या ते लक्षात आलं नव्हतं पण मटकरने ते पाहिलं होतं.
कॅमेरा असता तरी त्याला कसे चकवायचे हे मटकरला माहित होते पण त्यापेक्षा तो नसतांना चोरी करणं सोप्पं होतं.
त्यांनी मंगळवारची रात्र चोरी करण्यासाठी निवडली.
हायवेवरची वाहतूक मंगळवारी सर्वांत कमी असे.
रात्री एकनंतर फक्त थोडी ट्रक वाहतूक असे.
सहसा ट्रकमधले ड्रायव्हर/क्लीनर कांही तिथे रोकड काढायला येत नसत.
रात्री एकनंतर सामसूम असे आणि शनिवार, रविवार, सोमवारी रोकड काढली गेल्यामुळे कंपनी मंगळवारी पुन्हां रोकड पूर्ण भरत असे.
मंगळवारी रात्री बाळू, हुसेन आणि मटकर रात्रीची वाट पहात होते.
ह्यावेळी त्यांच्याकडे एक सेकंडहॅंड इनोव्हा होती.
रात्री दीड वाजता ते नाक्यावर आले.
वेळ योग्य आहे याची खात्री होती.
पोलिसांची पेट्रोलिंग करणारी जीप साडेबारानंतर तीन वाजेपर्यंत त्या रोडवर येण्याची शक्यताच नव्हती.
मटकर आणि हुसेन एटीएमच्या छोट्या केबीनमधे दार उघडून आत गेले.
बाळू ते बाहेर येण्याची वाट पहात असल्यासारखा दरवाजाच्या बाहेर उभा राहून राखण करू लागला.
मटकरचे साहित्य जवळच्या बॅगमधे होते.
आंत गेल्यावर मटकरने सर्वप्रथम एटीएमला जोडलेल्या सर्व केबल्स हुशारीने कापल्या.
मग हुसेन गॅस कटर काढून मागच्या बाजूने एटीएम कापू लागला.
संध्याकाळी त्यात रोकड भरलेली बाळूने पाहिली होती त्यामुळे त्यांना खात्री होती की आज आपल्याला तीस लाखाच्या आसपास रक्कम मिळणार.
हा एटीएमचा मेक मटकरला थोडा वेगळा वाटला.
तो गॅस कटरने तितका सहज कापला जात नव्हता.
त्याने काम थांबवून चाचपणी केली.
हुसेनकडला कटर स्वतः घेऊन पुन्हा प्रयत्न सुरू केले.
इन्सपेक्टर वर्दे त्या दिवशी नेहमीप्रमाणेच रात्री खूप उशीरा घरी आले होते.
बारा, एक हीच हल्ली त्यांची घरी परतण्याची वेळ झाली होती.
जेवण म्हणून कांही खाणं आधीच झालेलं असे.
दिवसभराचा शीण असला तरी घरी ते प्रसन्न होत.
त्यांची चार वर्षांची लेक सखी ते आल्याशिवाय कधीच झोपत नसे.
तशी ती दुपारी झोप घेई पण रात्री बाबा येईपर्यंत जागी राही.
ती सदा प्रसन्न असे.
तिला तशी पाहून इन्सपेक्टर वर्देंचा थकवा कुठल्या कुठे पळून जाई.
सखीच्या सगळ्या मागण्या ते पुरवत.
फक्त तिच्याबरोबर त्यांना वेळ घालवणं कठीण होई.
आज सखीच्या मनांत काय आलं कुणास ठाऊक !
ती म्हणाली, “बाबा, मला बाहेर घेऊन चल ना ! मला फिरायचे आहे.”
बाबा तिला समजावत म्हणाले, “बेटा, ह्यावेळी कुठे बाहेर जाणार आणि काय पहाणार तू ?”
सखी म्हणाली, “बाबा, मी त्या प्लेगृपमधे जाते ना तिथल्या माझ्या मैत्रिणीचा बर्थडे आहे.
मला तिला गिफ्ट द्यायची आहे.”
बाबा म्हणाले, “किती मोठी गिफ्ट देणार आहेस ?”
सखी म्हणाली, “मी तिला मोठा ससुला भेट देणार आहे.”
बाबा म्हणाले, “ठीक आहे. माझ्याकडे आहेत तेवढे पैसे. मी तुला आता देऊन ठेवतो.”
सखी म्हणाली, “अहं ! मला एटीएममधल्या नोटा हव्यात नव्या नव्या.”
शेवटी बाबांनी बालहट्टापुढे हात टेकले व आपली ‘डीझायर’ गाडी बाहेर काढली.
बापलेक दोघं रात्री दीड वाजता एटीएममधून पैसे काढायला बाहेर पडले.
प्रयत्न करूनही मटकरला गॅस कटरने ते मशीन कांपता येईना.
त्याला घाम फुटला होता.
त्याच्या मनांत एक कल्पना आली.
आपण पूर्ण एटीएमच काढून इनोव्हातून नेला तर ! ते शक्य होतं.
वेळ थोडा जास्त लागला असता पण बेसमधून तो उचकटता येतो.
अशा चोऱ्या इतर राज्यांत झाल्याचे त्याने वाचले होते.
त्याने आता हातोडा, पहार बाहेर काढली.
आवाज मोठा होत होता पण तो ऐकायला दूरपर्यंत कोणी नव्हतं.
दहा पंधरा मिनिटानी एखादा ट्रक हायवेवरून जात होता तेवढाच.
एटीएमचा बाॅक्स भिंतीपासून आणि जमिनीपासून अलग करण्यासाठी हुसेन आणि मटकर पूर्ण ताकद लावून प्रयत्न करत होता.
बाहेर उभा असलेला बाळू एखाद्या लाईनीत उभा असणाऱ्या कस्टमरसारखाच अस्वस्थ होता.
इतका वेळ काय करताहेत हे ?
तो ही दार उघडून आत गेला.
इन्सपेक्टर वर्देना जवळच्या एका एटीएमवर “आऊट ॲाफ कॅश” तर दुसऱ्यावर “आऊट ॲाफ ॲार्डर” असे बोर्ड दिसले.
त्यावर ते हायवेजवळच्या एटीएमकडे आले.
त्याचवेळी एटीएम सुटा करण्यात त्या तिघांना यश मिळाले.
एटीएम बूथचे दिवे बंद पाहून इ. वर्दे परत फिरणार होते, त्याचवेळी ते त्रिकूट उचकटलेला एटीएम बाहेर घेऊन आले व तो इनोव्हामधे कोंबू लागले.
एटीएम चोऱ्याविषयी माहिती असणाऱ्या इ. वर्देंनी काय चाललंय हे तात्काळ ओळखलं आणि त्यांनी पेट्रोलिंग टीमला फोन केला.
जीप दूर होती.
एटीएम आत बसवून शिंदे चालकाच्या जागी बसला व हुसेन त्याच्या बाजूला. मटकर मागे बसला.
इनोव्हा धांवू लागली.
इ. वर्दें डीझायरने इनोव्हाचा पाठलाग करू लागले.
मधे मधे पेट्रोलिंग टीमला माहिती देत होते.
मटकरला आपला पाठलाग होतोय अशी शंका आली.
त्याच्या सांगण्यावरून बाळूने वेग वाढवला.
डीझायरचाही वेग वाढला.
इनोव्हा हायवेवरून सर्व्हीस रोडवर आली व हूल देण्यासाठी अचानक ‘नो एंट्री’ असलेल्या रस्त्यावरून वेगाने आत घुसली.
तिथून अचानक समोर आलेल्या मोठा ट्रक बाळूला दिसतो न दिसतो तोच इनोव्हाने ट्रकला जोराची धडक दिली.
मागोमाग येणाऱ्या इ. वर्देंनी आपली कार वेळेत थांबवली व ते बाहेर आले.
जीपही येऊन पोहोचली.
इनोव्हा चेपली गेली होती.
पुढे बसलेले बाळू आणि हुसेन यांचे देह छिन्नविच्छिन्न झाले होते.
एटीएम सुध्दा चेपून फुटला होता व त्यातल्या नोटा पसरल्या होत्या.
मटकरचा निष्प्राण देह, त्याच नोटांवर हात पसरून पालथा पडलेला होता.
एटीएममधून रात्रीच पैसे काढायचा हट्ट करणारी निरागस सखी इ. वर्देंच्या कारच्या मागच्या सीटवर गाढ झोपली होती.

— अरविंद खानोलकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..