नवीन लेखन...

आत्मा हरवलेली पत्रकारिता !

व्यास क्रिएशन्सच्या चैत्र पालवी 2019 या अंकात श्री सोपान बोंगाणे  यांनी  लिहिलेला पूर्वप्रकाशित लेख.


मराठी पत्रकारितेची महान परंपरा तब्बल १८५ वर्षांची. बाळशास्त्री जांभेकरांनी १८१२ साली सुरू केलेल्या दर्पण या वृत्तपत्राने पत्रकारितेचा पाया घातला. त्यांनी आपल्या वृत्तपत्राला दिलेले नावही मोठे अर्थपूर्ण असेच आहे. कारण १८५ वर्षानंतर मराठी पत्रकारितेने बाळशास्त्रींच्या दर्पण मध्ये आज आपला चेहेरा निरखून पाहण्याची आवश्यकता आहे. मराठी पत्रकारितेची ही थोर परंपरा पुढे लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, निळकंठ खाडिलकर, ह. रा. महाजनी, आचार्य अत्रे, अनंत भालेराव, माधवराव गडकरी, कुमार केतकर यांनी पुढे सुरू ठेवली. या पवित्र व्यवसायाचा धंदा न करता एका समर्पित भावनेने सुरू असलेली पत्रकारिता आता तशी उरली आहे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

माझी पत्रकारिता तब्बल ३६ वर्षांपूर्वी सुरू झाली. बँक ऑफ इंडियाची नोकरी सांभाळीत प्रथम दैनिक ठाणे वैभवचे संस्थापक नरेंद्र बल्लाळ आणि नंतर दैनिक लोकसत्ताचे संपादक माधवराव गडकरी यांचे मला भरभरून आशीर्वाद व मार्गदर्शन लाभले. लोकसत्ताचे तत्कालिन सहसंपादक चंद्रशेखर वाघ हे ऋषितुल्य पत्रकार माझे पत्रकारितेतील गुरु ! हाताने लिहिलेल्या बातम्यांचे कागद रोज सकाळी त्यांच्या घरी नेऊन द्यायचे आणि नंतर बँकेत कामावर हजर व्हायचे असा रोजचा दिनक्रम होता. लिहिलेल्या बातम्या, वृत्तांत ते वाचून काढायचे आणि मला समोर बसवून त्यातील चुका आणि अनावश्यक शब्द काढून टाकायचे. त्यातूनच पुढे पत्रकारितेचा प्रवास उलगडत गेला आणि गैरव्यवहार, भ्रष्टाचार अशा अनेक कुप्रथांवर कोणाचीही भिडभाड न बाळगता बिनधास्तपणे उजेडात आणायचे नैतिक बळ मिळत गेले.

लोकसत्ताचे संपादक म्हणून माधवराव गडकरी यांनी वेळोवेळी मार्गदर्शन कर केलेच पण, ठाणे व जिल्ह्यातील भ्रष्टाचार आण गैरप्रकारांवर लिहिण्याची उर्मी दिली. १९८६ साली महापालिकेच्या रस्त्यावर लावलेल्या सोडियम व्हेपर्स दिव्यांच्या खरेदीतील काही कोटींचा घोटाळा असो की, परिवहन सेवेतील बस खरेदी, बॉडी बिल्डींगच्या कंत्राटातील भ्रष्टाचार असो, गडकरी संपादक म्हणून ठामपणे पाठिशी उभे राहिले आणि माझ्या या विषयावर नुसता पाठिंबाच न देता स्वतः अग्रलेख लिहून सरकार व शासन यंत्रणेला दखल घेणे भाग पाडले. ठाण्यातील एका रक्तपेढीत गोरगरीब, मजूर, महारोगी अशांचे रक्त रोज काढून त्यांच्या हातावर १०-२० रुपये ठेवले जात होते. तेच रक्त गरजुंना दोनशे-अडीचशे रुपये वसूल करून विक्री केले जात होते. असेच प्रकार आणखी काही ठिकाणी सुरू असल्याच्या चर्चा होत्या. हा प्रकार घातक असल्याने मी लोकसत्तातून त्याविरुद्ध लिहिण्याचा विचार केला आणि तो गडकरींना भेटून सांगितला. त्यावर त्यांनी पुरावे गोळा करून बिनधास्त लिही असे सांगितले व कोणत्याही परिस्थितीत ते आपण प्रसिद्ध करू असा शब्द दिला. एक दिवस रक्त देण्यासाठी जमलेल्यांचे फोटो काढले त्यांच्या मुलाखती घेतल्या. हे संबंधितांना कळताच खळबळ उडाली. गडकरी यांच्या एका जवळच्या नातेवाईकासह या व्यवसायातील काही बडी मंडळी गडकरी यांना भेटायला एक्सप्रेस टॉवर्समध्ये गेली. पण गडकरी आपल्या निर्णयावर एवढे ठाम होते की, सदरचे वृत्त काही झाले तरी मी प्रसिद्ध करणारच असे सांगून त्यांनी त्यांची बोळवण केली. म्हणून ती मंडळी लगोलग कोर्टात गेली व ते वृत्त प्रसिद्ध करण्यास मनाई करणारा स्थगिती आदेश मिळविण्यात यशस्वी झाली. लगोलग माझ्यासह गडकरी यांना समन्स बजावले गेले. त्यावर गडकरी यांनी उच्च न्यायालयातील सुप्रसिद्ध वकील अॅड. रमाकांत ओवळेकर यांना वकील पत्र देऊन लगोलग दुसऱ्याच दिवशी त्यावर सुनावणी नक्की केली. एवढेच नाही तर गडकरी स्वतः ठाणे कोर्टात आले. त्यांना बघण्यासाठी त्यावेळी कोर्टात तुडुंब गर्दी उसळल्याचे मला आजही आठवते.

पत्रकारितेतील असे अनेक किस्से आजही आठवणीच्या कप्यात साठलेले आहेत. निःस्वार्थ आणि निःस्पृह पत्रकारिता कशी असावी याचे धडे ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत नेर्लेकर, कै. भैय्यासाहेब सहस्त्रबुध्दे, नानासाहेब पेठे, स.पां. जोशी, नरेंद्र बल्लाळ यांनी घालून दिले. जे समाजासाठी घातक आहे, गैर आहे त्यावर कोणाचीही भिडभाड न ठेवता प्रहार करणे हेच एकमेव ध्येय उराशी बाळगून या सर्वांनी ठाणे जिल्ह्याची पत्रकारितेची उज्वल परंपरा पुढे नेली. १२-१४ तास घराबाहेर प्रसंगी जव्हार, वाडा, मोखाडा, तलासरी अशा दुर्गम भागात फिरून आम्ही अनेक विषांना वाचा फोडली. पण आजची परिस्थिती मनाला अस्वस्थ करते. पत्रकारितेचा मूळ आत्माच आम्ही हरवून बसलो आहोत की काय असे वाटायला लागते. बाळशास्त्री जांभेकर, आंबेडकर, आचार्य अत्रे, माधवराव गडकरी यांच्याशी आमचे नाते सांगण्याचे धारिष्ट्य आणि चारित्र्य आज आमच्यापाशी उरले आहे काय असा प्रश्न पडावा एवढी परिस्थिती बदलली आहे असे वाटायला लागले तर त्याचे आश्चर्य वाटू नये!

सोपान बोंगाणे
दै. पुण्यनगरी

व्यास क्रिएशन्सच्या चैत्र पालवी 2019 या अंकात पूर्वप्रकाशित लेख. 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..