व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेला खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांचा लेख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या काळामध्ये आत्मनिर्भर भारत बनवण्याची हाक देशवासियांना दिली. त्या दृष्टीने संपूर्ण भारतामध्ये या विचाराला गती मिळाली आणि विविध स्तरावर विचार मंथन सुरू झाले. राजकारणामध्ये उच्चपदस्थांनी काही भूमिका घेतलेली असते, राजकीय कारणास्तव विरोधक विरोधही करतात ही वस्तुस्थिती आहे. परंतु या विषयामध्ये असे म्हणता येईल की आत्मनिर्भर भारत ही भूमिका पंतप्रधानांनी मांडली, तेव्हा यामध्ये विरोधकांनाही कोणतीही उणीव काढावीशी वाटली नाही यातच त्याचे यश आहे आणि त्यामुळेच सर्व स्तरावर या भूमिकेचं स्वागत झालेलं आहे.
आत्मनिर्भर याचा अर्थ आपल्या घराची दारं इतरांसाठी बंद असा याचा अर्थ नाही. आपल्या पायावर सर्वार्थान उभा राहणं यामध्ये आर्थिक, सामाजिक, एक प्रकारे वैचारिक आणि सामरिक असेही विषय येतात. आपली अर्थव्यवस्था मजबूत करून उत्पादन क्षेत्राला अधिक गती देऊन दैनंदिन वस्तू देशातच बनवणं, आवश्यक असणारे कच्च्या मालाचे घटक, प्रक्रियेसाठी लागणारे घटक, उत्पादनासाठी लागणारी यंत्रसामग्री आणि बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यासाठी लागणाऱ्या सुविधा या सर्व गोष्टी देशांतर्गत कशा पद्धतीने व्हाव्यात हा यामागचा दृष्टिकोन आहे. स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी लागणारी ही प्रेरणा पंतप्रधानांच्या या आवाहनातून मिळालेली आहे. आत्मनिर्भर होणे ही भूमिका घेताना, देशासाठीची आत्मनिर्भरता कशी असेल तर भौगोलिक घटकांची आत्मनिर्भरता हा अर्थ अभिप्रेत आहे. एखादा तालुका आत्मनिर्भर होतो, जिल्हा होतो, एखादी शिक्षण संस्था आत्मनिर्भर होते म्हणजेच त्यांना आवश्यक गरजांची संसाधने विकसित होतात. विविध माध्यमातील व्यक्ती, संस्था यांच्यामध्ये आत्मनिर्भर होण्याची जाणीव निर्माण झाली आहे. हे विकासाचे द्योतक म्हणावे लागेल.
औषध उत्पादने आपल्याला आवश्यक आहेत. त्यांची प्रक्रिया आपल्या देशात होते, पण औषधे मात्र, इतर देशातून आयात करावी लागतात. यासाठी मूळ औषधांच्या निर्मितीसाठी सरकारने प्रोत्साहन दिले आहे. संरक्षण क्षेत्रातील उत्पादनांच्या बाबतीत परदेशी कंपन्यांवर अवलंबून राहावे लागते आहे. तेथील उत्पादन प्रक्रियेवर निर्भर राहावं लागतं, पण आता आपल्या देशाच्या संरक्षणाची संपूर्ण सुविधा, त्याची उत्पादने देशातच करावीत या विचाराने आपण पुढे जात आहोत.
अन्नधान्यांच्या बाबतीतही आपल्याकडे स्वयंपूर्णता आलेली आहे. पोषण मूल्य असलेली उत्पादने, अन्नघटक त्याच भागात उत्पादित व्हावेत, कृषी क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर उत्पादन व्हावे असा उल्लेखनीय दृष्टिकोन या चळवळीतून येत आहे.
आत्मनिर्भर यात ‘आत्म’ हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. आत्म याचा अर्थ स्वयम् म्हणजे स्वतः. स्वतःची ओळख असणं खूप गरजेचं आहे. स्वतःची ताकद काय आहे, मर्यादा काय आहे, आपली बलस्थाने कोणती, दुर्बलता कोणती, याचं ज्ञान आपल्याला होतं. दुर्बलतेवर आपण मात करू शकतो. आपल्या बलस्थानांना आपण अधिक मजबूत करू शकतो. आत्मनिर्भर चळवळीतून जनतेचा आत्मपरिचय, आत्मविश्वास वाढीला लागण्याची एक प्रक्रिया सुरू झाल्याचं दिसून येतं. या सर्व अंगांनी जर विचार केला तर हे आवाहन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कोरोना काळाने एक अनुकूल परिस्थिती निर्माण करून दिली, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कारण या विचाराच्या दिशेने आपली पावले उचलली गेली नसती. उद्योग क्षेत्रातील सर्व लोकांच्या मनामध्ये आता या विचारांनी स्थान निर्माण केले आहे. त्या दिशेने सर्वजण प्रयत्न करू लागले आहेत. कोरोना या संकटाला संधीत रूपांतर करून देण्याचं हे मोठे उदाहरण आहे.
आत्मनिर्भर या विचारांबरोबरच नवाचार यालाही महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. नवनवीन संकल्पना, सृजनशील वातावरण याचा नव तरुणांनी जास्तीत जास्त उपयोग करून घेतला पाहिजे. त्यांच्या नव्या संकल्पनांना उभारी देण्याचे काम आत्मनिर्भर चळवळ करीत आहे. प्रतिभा पोषणाची रचना तयार करण्यासाठी यंत्रणाही कटिबद्ध आहे. ‘आता नोकऱ्या मागणारे नाही तर नोकऱ्या देणारे व्हा’ याचा तरुणांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे. कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र अशा सर्व क्षेत्रातील सुधारणांचा परिपाक म्हणजेच आत्मनिर्भर चळवळ यात शंका नाही. आत्मनिर्भर भारताच्या चळवळीत तरुणांना सक्रिय करण्याची महत्त्वाची भूमिका शासनाने घेतलेली आहे.
-खासदार विनय सहस्त्रबुद्धे
(व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंका मधून)
Leave a Reply