व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेली प्रतिभा सराफ यांची हि कविता
जुन्या पुस्तकातून शिकते नवीन खूप काही
भावाच्या शिक्षणासाठी कधी सोडते शाळाही
जे मिळते, जसे मिळते, घेते ती…
आत्मनिर्भर ती, स्वावलंबी ती
का तरीही मग दुःखीकष्टी ती ?
चार भांड्यातही चालवते छान संसार बाई
ना उरले खाण्यास तरी तिची तक्रार नाही
कोंड्याचा मांडा सहज करते ती…
आत्मनिर्भर ती, स्वावलंबी ती
का तरीही मग दुःखीकष्टी ती ?
दबून राहते..तरी करते कौतुक ठाई ठाई
तापट, दारूडा वा असो नवरा गुंडाभाई
कष्टाने पोसते परिवारास ती…
आत्मनिर्भर ती, स्वावलंबी ती
का तरीही मग दुःखीकष्टी ती?
कधी लटकला कर्जबाजारी होऊन तोही
सावरते संसार… घरदार… मुलेबाळेही
ना लटकते, ना लटपटते कधी ती…
आत्मनिर्भर ती, स्वावलंबी ती
का तरीही मग दुःखीकष्टी ती ?
कधी उच्चपदस्थ, कधी राजकारणी
खोचून पदर सदा संसार भार वाही
आत्मबळ देत असते ती…
आत्मनिर्भर ती, स्वावलंबी ती
का तरीही मग दुःखीकष्टी ती?
कोणत्याही परिस्थितीत फुलवते वनराई
घरात बाईचे अस्तित्व म्हणजेच हिरवाई !
समजली का कुणास कधी ‘ती’ ?
आत्मनिर्भर ती, स्वावलंबी ती
व्हावी सुखाचीही भागीदार ती…
– प्रतिभा सराफ
Leave a Reply