सदा दीप्तीः अपार अमृतवृत्तिः स्नानं ॥ ६ ॥
सदैव आत्मप्रकाशात राहणं हेच स्नान !
सर्वत्र भावना गंधः ॥ ७ ॥
प्रेमभाव हेच गंध !
आत्मरूप स्वयंप्रकाशी आहे, सदैव त्या प्रकाशात राहणं शरीराला सचैल करतं असा या श्लोकाचा अर्थ आहे. आपल्याकडे स्नानाला ज्याम महत्त्व आहे, एखादे दिवशी जरी अंघोळ झाली नाही तर कमालीची बेचैनी येते. त्यात पूजा वगैरे करायची असेल तर अंघोळ केल्याशिवाय ती निषिद्ध आहे; त्यामुळे काय वाट्टेल ती धावपळ होऊ दे अंघोळीचा उपचार पूर्ण झाल्याशिवाय दिवसाची सुरुवात अशक्य ! ही धारणा इतकी खोलवर गेली आहे की पारोसा म्हणजे अपवित्र ( आणि दुसऱ्या दिवशी अंघोळ करत नाही तोपर्यंत जवळजवळ अस्पृश्य), इतपत मजल गेली आहे. कुठलीही गोष्ट कितीही चांगली असली तरी तिची मजा जोपर्यंत ती अनिवार्य होत नाही तोपर्यंतच राहते, तस्मात, स्नानासारखी आनंददायी गोष्ट सुद्धा मौज हरवून बसली आहे.
अर्थात, स्नानाची गरज देहाला आहे, स्वरूप कायम शुद्धच आहे कारण त्याला कसलाही स्पर्श होत नाही; हा मूळ मुद्दा आहे. जगताना आपण देह अधिक आत्मा आहोत त्यामुळे शारीरिक आनंद आणि आरोग्यासाठी गरज असेल तेव्हा स्नान हा दिनक्रम योग्य आहे. आध्यात्मिकदृष्ट्या मात्र, निराकाराचा अंगीकार हेच साधकासाठी स्नान आहे. निराकार स्वयंप्रकाशी आहे त्यामुळे त्यानं देहाचा आतून वेध घेता येतो. मागच्या लेखात दिलेली साधना केल्यावर तुमच्या हे लक्षात येईल की नजरेच्या रोखानं निराकार मेंदूतल्या विविध भागात नेता येतो, विशेषतः जिथे तणाव जाणवतो तिथे तो आपसूक जाऊन हलकेपणा आणतो. अशा प्रकारे, डोळे मिटून आणि शांत बसून, नजरेच्या रोखानं शरीराच्या ज्या ज्या भागात तणाव जाणवतो तिथे निराकार नेल्यास तो भाग पूर्ववत होऊन पुन्हा सक्षम होतो, कारण निराकाराचा स्पर्श सर्व गोष्टी पूर्ववत करतो. या निराकाराचा अंर्तबाह्य अंगीकार करणं हेच स्नान !
————————————————
सातवा श्लोक समजायला अद्वैत सिद्धान्ताची कल्पना असणं अगत्याचं आहे. अद्वैत सिद्धांत ही खरं तर वस्तुस्थिती आहे, सिद्धांत नाही; कारण त्यात सिद्ध करण्यासारखं काही नाही, फक्त जाणलं की झालं !
अध्यात्मात आत्मा हा निर्लेप, तटस्थ आणि साक्षी मानला गेलायं आणि तो जे जे काही व्यक्त आहे त्यापेक्षा वेगळा समजला जातो. अर्थात, प्रथम चरणात हा प्रत्येक साधकाचा अनुभव आहे. डोळे मिटल्यावर आणि या मालिकेतल्या पहिल्या लेखात सांगितलेली ध्यान मुद्रा केल्यावर, आपल्याला संपूर्ण देहाची जाणीव होते, म्हणजे आपण देहाचे जाणते आहोत; देह झालेलो नाही. सर्व विचार, भावना आणि जाणणं हे मेंदूत (म्हणजे पर्यायानं देहात) घडतं, पण आपण या सर्वांचे जाणते आहोत, त्यामुळे त्या सर्वांपासून मुक्त आणि अलिप्त आहोत किंवा त्यांचे साक्षी आहोत. वास्तविक, हा उलगडा होईपर्यंतच जीवनाची संध्याकाळ उजाडते, त्यानं काही प्रमाणात शांतता लाभते, पण तरीही पूर्ण समाधान आणि सदैव आनंदी चित्तदशा लाभली असं होत नाही. याचं कारण म्हणजे आकार आणि निराकार हे द्वैत जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत चित्त स्वस्थ होत नाही.
आकार आणि निराकार किंवा प्रकृती आणि पुरुष हे द्वैत न मिटण्याचं एकमेव कारण म्हणजे, एकतर निराकाराचा उलगडाच महत्प्रयासानं झालेला असतो; आता पुन्हा आकाराशी संलग्नता साधायचा धोका कोण पत्करणार ? त्यात आयुष्याच्या संध्याकाळी पुन्हा नवे प्रयोग करायला ऊर्जाही नसते, त्यामुळे साधक तटस्थता बरी या निर्णयाप्रत येतो. पण निराकार गवसणं हा अर्धा प्रवास आहे; या नव्या उलगड्यातून आता पुन्हा आकाराला भिडणं ही खरी मौज आहे. निराकाराच्या प्ररिप्रेक्ष्यातून पुन्हा नातेसंबंधात समरसून उतरणं, काम-क्रोधाची खुमारी अनुभवणं, समोर आलीच तर पुन्हा निराशेच्या गर्तेत उडी घेणं आणि अलगद वर येणं; हे सर्व जमल्याशिवाय अध्यात्म परिपूर्ण होत नाही. आणि त्याही पुढे जाऊन, ते साधल्याशिवाय “सर्वत्र भावना गंधः ” या सूत्राचा उलगडा होणं असंभव !
काय आहे या सूत्राचं रहस्य ? आपण वरून साकार दिसलो तरी मुळात निराकार आहोत हा तुमचा निश्चयात्मक अनुभव हवा. ती उगीच अध्यात्मात सांगितलंय म्हणून किंवा इतकी वर्ष साधना केली म्हणून, मनाची काढलेली समजूत असेल तर त्याला अर्थ नाही. काय आहे त्या निश्चयात्मकतेचा निकष ? तर काहीही झालं तरी त्याचा आपल्याला कुठेही स्पर्श होत नाही ही खात्री; अगदी कुठेही, न मनाला, न हृदयाला, न देहाला ! याला बायबलामध्ये असंग कौमार्य (वर्जिनिटी) असा नाजूक शब्द आहे; म्हणजे कशाशीही आणि कितीही संग झाला तरी कौमार्य जसंच्या तसं ! एकदा ही वर्जिनिटी गवसली की आपण प्रकृतीच्या कोणत्याही अभिव्यक्तीला निर्भयतेनं भिडायला सिद्ध होतो.
मग आपल्या लक्षात येतं की क्रोध आपल्याहून वेगळा नाही, ते आपलंच कालबद्ध रूपांतरण आहे; आपण निःसंग राहून संपूर्णपणे क्रोधात उतरू शकतो ! आपण हरेक प्रसंगाला निर्भयपणे भिडून सुद्धा जसेच्या तसे राहतो आणि मग प्रेमभाव हाच आपला गंध होतो कारण प्रत्येक अनुभव पोकळ आहे, प्रत्येक अनुभवाच्या केंद्रस्थानी आपणच अस्पर्शितपणे स्थित आहोत. सारी प्रकृती आपलीच अभिव्यक्ती आहे, ती पुरुषापेक्षा भिन्न नाही. ती आपल्यातच उमलते, विहरते आणि लयाला जाते; तरीही आपण कायम अस्पर्शितच राहतो. यालाच कृष्ण नैनं च्छिंदंती शस्त्राणी म्हणतो आणि मग सर्वत्र भावना गंधः हा तुमचा नितांत रमणीय अनुभव होतो !
रुपकात्मकतेनं सांगायचं तर प्रथम चरणात, रंगमंच पात्रापेक्षा वेगळा आहे, रंगमंचावरची कोणतीही घटना किंवा पात्रावर काहीही प्रसंग गुदरला; तरी रंगमंच यथास्थितच राहतो हे आकलन. दुसऱ्या चरणात, मग याच परिप्रेक्ष्यातून, जीवनाच्या नाट्यात समग्रपणे उतरणं, प्रत्येक प्रसंग केवळ अभिनय म्हणून नाही तर सर्वस्वी ती व्यक्तिरेखाच बनून, हरेक प्रसंग जीवंत करणं आणि रसमयतेनं जगणं; आणि या सर्वात पुन्हा निःसंग कौमार्य जसंच्या तसं राहणं, हे खरं अध्यात्मिक जगणं आहे. ते खरं अद्वैत आहे आणि मग प्रेम हा त्याचा दोन्ही अर्थानं गंध आहे; भाळावरचा गंध आणि त्या गंधाचा श्वासात भिनलेला परिमल !
— संजय क्षीरसागर
Leave a Reply