अणुऊर्जेची निर्मिती ही कोळशासारखं एखादं रासायनिक इंधन जाळून केलेल्या ऊर्जानिर्मितीपेक्षा वेगळी असते.
रासायनिक इंधनाद्वारे झालेल्या ऊर्जानिर्मितीत संपूर्ण अणू सहभागी होतो, तर अणुइंधनाद्वारे झालेल्या ऊर्जानिर्मितीत फक्त अणुकेंद्रकाचा सहभाग असतो. म्हणूनच या क्रियांना केंद्रकीय क्रिया म्हटलं जातं.
रासायनिक क्रियेत भाग घेणारी मूलद्रव्यं ही रासायनिक क्रिया घडून आल्यानंतरही आपलं अस्तित्त्व कायम राखतात. केंद्रकीय क्रियेत मात्र एका मूलद्रव्याच्या अणुकेंद्रकाचं रूपांतर इतर मूलद्रव्यांच्या अणुकेंद्रकांत होतं. केंद्रकीय क्रियेत भाग घेणाऱ्या घटकांचं एकत्रित वजन हे केंद्रकीय क्रियेनंतर किंचितसं कमी झालेलं असतं. कारण केंद्रकीय क्रियेत पदार्थाचं रूपांतर ऊर्जेत होतं.
अणुऊर्जेपासून वीजनिर्मिती करताना केंद्रकीय क्रियांद्वारे मिळालेली ऊर्जा प्रथम पाण्याचं वाफेत रुपांतर करण्यासाठी वापरली जाते. त्यानंतर या वाफेवर जनित्र चालवलं जाऊन त्यातून वीजनिर्मिती होते. औष्णिक वीजनिर्मितीत कार्बन डायऑक्साइडसारखे पृथ्वीचं तापमान वाढवणारे वायू निर्माण होतात. अणुऊर्जा ही अशा वायूंच्या उत्सर्जनापासून मुक्त असते.
अणुऊर्जेची मोठ्या प्रमाणावरील निर्मिती दोन प्रकारे करता येते. पहिला प्रकार हा वजनदार अशा काही विशिष्ट अणूंच्या केंद्रकीय विखंडनावर आधारित आहे. अणुभट्टीत नियंत्रित स्वरुपात या अणुकेंद्रकांचं विखंडन घडवून (तुकडे पाडून) ऊर्जानिर्मिती केली जाते. केंद्रकीय विखंडनातून (सामान्य भाषेत अणुविखंडनातून) निर्माण होणाऱ्या ऊर्जेचं प्रमाणही प्रचंड असतं. जितकी ऊर्जा एक टन कोळसा जाळल्यावर निर्माण होते, तितकी ऊर्जा अवघ्या अर्ध्या ग्रॅम युरेनियमसारख्या अणुइंधनात दडलेली असते.
आज अस्तित्त्वात असलेल्या सर्व अणुभट्टया केंद्रकीय विखंडनाच्या तत्त्वावर चालविल्या या जातात.
अणुऊर्जानिर्मितीचा दुसरा अणुकेंद्रकांच्या प्रकार हा संमीलनावर आधारित आहे. या प्रकारात कमी वजनाच्या काही विशिष्ट अणुकेंद्रकांचं संमीलन (एकत्रीकरण) घडवून आणलं जातं. या संमीलनाच्या क्रियेतही पदार्थाचं रुपांतर ऊर्जेत होतं. परंतु अणुसंमीलनात निर्माण होणाऱ्या ऊर्जेवर आधारलेली अणुभट्टी बांधण्यासाठी लागणारं पूरक तंत्रज्ञान अजून पूर्णपणे विकसित झालेलं नाही. त्यामुळे अशा प्रकारची ऊर्जानिर्मिती प्रत्यक्षात येण्यास काही अवधी जावा लागेल.
Leave a Reply