रिमझिमत्या पावसात
माझ्या गर्द केसात मोगरा माळताना
तू दाखवलीस स्वप्नं…
रुणझुणत्या चुड्याची
भरजरी शालूच्या स्पर्शाची
पराक्रमी राजपुत्रानं
नजर करावं गुलबकावलीचं फूल
हळव्या राजकन्येला
तशी अवघ्या स्वप्नांची पूर्ती झाली
तुझी शपथ, तेव्हा वाटलं
पायतळी मंझिल आली !
आणि मग –
हातीच्या गुलाबाची
पाकळी पाकळी पडावी गळून..
तसे क्षण गेले निसटून
नि कसली अगम्य ओढ
मनात राहिली दाटून?
चालत्या पावलांना मी विचारते,
“तुम्हाला काय हवंय बाबांनो?’
कालचा मोगरीचा गंध
तस्सा ताजा –टवटवीत…
की पूर्ती झालेली सारी स्वप्ने…..
की त्याही पलिकडचं काही… अरुप…. अनाम..
जे काय तेही नक्की कळत नाही…..
साऱ्याच सुखाचा असा अर्थ शोधत राहिलास
तर हाय हृदया !
तुझ्या अतृप्तीला सीमा नाही।
तुझ्या अतृप्तीला. सीमा नाही !!
–सौ. राजलक्ष्मी देशपांडे
Leave a Reply