लहानपणी मांडव्याला गेल्यावर मांडवा ते रेवस रस्त्यावर सारळ पूला पर्यंत सायकल घेऊन फिरायला खूप मजा यायची. मांडवा जेट्टी आणि किनाऱ्यावर सायकल घेऊन तासन तास फिरताना कोणीच अडवायचे नाही. रस्त्यावर तेव्हा फारशी रहदारी नसल्याने सायकल दोन्ही हात सोडून चालवणे, उतरण असलेल्या रस्त्यावर हॅन्डलवर हाता ऐवजी दोन्ही पाय ठेवून चालवणे अशा करामती केल्या जायच्या. मांडव्याला आमच्या नानांची जुनी सायकल होती सुरवातीला सीट वरुन पाय पोचत नव्हते तेव्हा मधल्या दांड्यातून एक पाय टाकून सायकल चालवायचो त्याला कैची टाकून चालवणे बोलले जाई. नानांची सायकल अजूनही वापरात आहे कमीत कमी पन्नास वर्ष जुनी तरी नक्कीच असावी. मामे भाऊ, मावसभाऊ मिळून पाठीमागे कॅरिअर वर एक जण आणि मधल्या दांड्यावर एक जण अशी आम्ही तिघा तिघा जणांनी सायकल वरना भटकंती केलेली आहे.
नंतर मोटार सायकल चालवता यायला लागल्यावर तर पेट्रोलच्या टाकीवर एक जण सीटवर तिघेजण आणि कॅरियर वर एक जण असा पाच पाच जणांनी मोटर सायकल दामटवली आहे. सुट्टीत मांडव्याला गेल्यावर बालपण फक्त खेळण्यात आणि दंगा मस्ती करण्यात गेले. नाना आणि नानी दोघेच जण आणि आम्ही तेरा नातवंडा पैकी कमीत कमी आठ नऊ जण असायचोच.
सकाळी ज्याला पहिले जाग येईल तो जाऊन चूल पेटवायचा, बहुतेक वेळा नाना सगळ्यात पहिले उठलेले असायचे आणि त्यांनी चूल पेटवलेली असायची. उठल्या बरोबर एक एक जण चुलीजवळ येऊन शेकायला बसायचा. मग शेकता शेकता चुलीत लाकडं नाहीतर काड्या टाकत आगीशी खेळ करत एखाद तास घालवला जायचा. बाथरूम मध्ये नळ उघडल्यावर हिटर आणि सोलर च्या गरम पाण्यात आंघोळ करणाऱ्या पिढीला, चुलीवर आंघोळीला पाणी तापवणे आणि कढत्या पाण्यात घराबाहेर असलेल्या नळाच्या ओट्यावर सकाळच्या थंडीत हुडहुडी भरलेली असताना आंघोळ करायची मजा नाही कळणार.
नानी चहा करून ठेवायच्या त्यात खायला खारी, टोस्ट, बटर नाहीतर पावाच्या लाद्या सायकल वरुन जाणाऱ्या भय्या कडून घेऊन ठेवलेल्या असायच्या. नानी कधीच खारी बटर चा अलुमिनियमचा डबा रिकामा ठेवत नसत. साखर लावलेली समोसा खारी, जिरा बटर, नानकटे ज्याला जो प्रकार आवडेल त्याची पाकीटं डब्यात असायची. आंघोळ आणि चहात खारी बटर खाऊन झाली की तासाभरात नानी चमचमीत कांदे पोहे, घावणे, थालीपीठ, उपमा, शिरा नाहीतर शिळ्या राहिलेल्या भाताला झक्कास फोडणी देऊन गरमा गरम नाश्ता द्यायच्या. तळलेला फोडणीचा भात सकाळी नाश्त्याला मिळावा म्हणून आम्ही पोरं कधीकधी नानीना रात्री मुद्दाम जास्त भात घालायला सांगायचो.
सकाळी दहा साडे दहा वाजता दारावरून गावातल्या कोळणी नानींना हाक मारायच्या त्यांच्याकडून ताजी कोलबी, बोंबील, पापलेट नाहीतर मांदेली घेऊन नानी दुपारचे जेवण बनवायला घ्यायच्या. त्यांच्या हातचे चिंच टाकून केलेलं आंबट कालवण खाण्यापूर्वी चुलीवर घातलेल्या भाताची वाफाळणारी पेज प्यायला आमच्यात चढाओढ लागायची कारण घरच्या तांदळाची पेज तेवढीच चवदार असायची. समुद्राच्या ताज्या मासळी प्रमाणे तेव्हा मांडव्याला गावातल्या गावात पिकवला जाणारा ताजा आणि गावठी भाजीपाला मिळायचा त्यामुळे शाकाहारी जेवण असले तरी जेवायला मजा यायची.
गरम गरम भात आणि मध्ये तळलेल्या मच्छीचे तवे आणि कालवण असलेली टोपं मांडली जायची. नानी मध्ये बसायच्या त्यांच्या भोवती आम्ही सगळी नातवंड बसायचो, नाना पाटावर बसायचे. लहानपणी मांडव्याला जेवण म्हणजे एक आनंद सोहळा असायचा, नानींच्या हातचे जेवण आणि त्यातही त्या स्वतः सगळ्यांना वाढायच्या त्यामुळे तर जेवताना पोट भरले तरी मन काही भरायचे नाही. उन्हात खेळायला आणि उनाडायला त्यांनी कधीच अडवलं नाही तस बघितले तर तेव्हा मांडव्याला उन्हाचा तेवढा त्रास पण होत नसे कारण उन्हाळ्याच्या सुट्टीत नानी घरातच कोकम आणून त्यांचे सरबत करायच्या भरपूर दूध, दही आणि ताक विकत घेऊन सगळ्यांना प्यायला लावायच्या. घरात बसून टीव्ही बघण्यापेक्षा त्या नेहमी बाहेर खेळायला आणि हुंदडायला प्रोत्साहन द्यायच्या.
नाना आणि नानी दोघेही प्राथमिक शाळेतून मुख्याध्यापक म्हणून रिटायर्ड झाले होते. नाना खूप कडक शिस्तीचे आणि रागीट होते पण आम्हा नातवंडाना त्यांचा राग आणि कडक शिस्त कधी वाट्याला आली नाही. याउलट नानी खूपच प्रेमळ आणि मायाळू. सगळ्याच नातवंडांचे त्यांना कौतुक हा मुलीचा किंवा मुलाचा, नात किंवा नातू, हा हुशार किंवा चांगला असा कोणताच भेदभाव त्यांनी केला नाही. कोणाला लागलं, त्रास झाला कोणाचे खेळताना भांडण किंवा रागाराग झाली की मायेने जवळ घेणार, समजावणार आणि कुरवाळणार. नानींना भेटायला कोणीही आले तरी त्या व्यक्तीला नानी कधीच रिकाम्या हाताने पाठवत नसत, हातात हात घेऊन नाहीतर पाठीवर हात ठेवून भरभरून आशीर्वाद देताना त्या खूपच प्रेमळ आणि प्रसन्न दिसायच्या. त्याचमुळे आनंद आणि सुख साजरे करायला येणाऱ्यांसह स्वतः दुःख आणि मन व्यक्त करायला सुद्धा सगळ्यांना नानींचाच आधार होता. नानी आम्हा सगळ्या नातवंडांसाठी गोधड्या शिवून घेत आणि सुट्टी लागायच्या पहिले त्या धुवून वाळवून ठेवत. लहानपणीच्या गोधड्या अजूनही मांडव्याला आहेत पण आता त्यात नानींच्या मायेची उब नाही जाणवत.
नानींना आजारपणा मुळे शेवटी शेवटी पूर्णपणे ऐकु येईनासे झाले. पण हातवारे किंवा इशारे करून त्यांना समजवून सांगायचा प्रयत्न केला जायचा तरीही समजले नाही तर मग त्यांना लिहून दाखवायला लागायचे, लिहिलेले वाचले की मग अस्स होय, एवढंच ना हात तिच्या मारी बोलून जोरात हसायच्या. आजारपणात गोळ्या औषधं घेण्याचा त्यांनी कधी कंटाळा केला नाही की बहिरेपणा आला म्हणून कधी चिडचिड आणि त्रागा केला नाही.
त्यांचा मायेचा स्पर्श आणि शब्दांची ऊबच अशी होती की मांडव्याला जाताना जो आनंद आणि उत्साह असायचा तोच मांडव्यातून निघाल्यावर डोळ्यातून पाणी येईपर्यंत वाईट वाटायचे.
घरा समोरच्या शेतात नाहीतर समुद्रावर क्रिकेटच्या मॅच खेळायचो. शेतावर असलेल्या बांबू नाहीतर झाडांच्या फ़ांद्या तोडून आम्ही त्यांचे स्टम्प बनवायचो. मांडव्याला असलेल्या मोठमोठ्या वडाच्या झाडांच्या खाली लोंबकळणाऱ्या फ़ांद्याना लटकून झोके घेणे. शेतावर असलेल्या एका मोठ्या काजूच्या झाडावर सुरपारंब्या खेळणे. घरासमोर असलेल्या टेकडीवर दम लागला तरी धावत धावत चढणे. टेकडी उतरताना पडण्याची भीती न बाळगता पळत पळत उतरणे.
रात्री रस्त्यावर गाड्यांची वर्दळ कमी झाली की डांबरी रस्त्यावर लोळून वर आकाशाकडे तोंड करून चांदणे आणि चंद्र तारे बघणे. चमकणाऱ्या काजव्यांना मुठीत पकडून काचेच्या पारदर्शक बाटलीत बंद करणे. रात्रीच्या अंधारात किर्रर्र किर्रर्र करणाऱ्या रातकिड्यांचा आवाज सुरु झाला की भूताप्रेताच्या गोष्टी सांगणे आणि भीतीमुळे डोक्यावरून गोधडी घेऊन झोपणे. मांडव्याचे कौलारु घर, घराला ओटी, वर लाकडाच्या फळ्यानी बनवलेला माळा, घरासमोर अंगण, चुलीसाठी स्वतंत्र खोली हळू हळू बराच बदल होत गेला.
हम दो हमारे दो आणि आता छोटा परिवार सुखी परिवार या संकल्पने मुळे दिवाळीच्या आणि उन्हाळ्याच्या सुट्टीतले भावंड आणि त्यांचे बालपण नाहीसे होत चालले आहे. नाना नानी आणि आजी आजोबांकडे नातवंड जाण्यापेक्षा, नाना नानी आणि आजी आजोबाच नातवंडांकडे कधी जायला मिळेल याच्या साठी तळमळत असतात.
मॅगी, लेज, कुरकुरे, पिझ्झा,बर्गर असले जंक फूड खाणाऱ्या पिढीला, आजी आणि नानींच्या हातांनी बनवलेल्या चमचमीत घावणे, थालीपीठ, उपमा,कांदेपोहे आणि फोडणीचा भात खायला नाही जमणार.
आम्हा सगळ्या एकूण तेरा बहीण भावांत एकमेकांशी अशी अटॅचमेन्ट आहे की लहानपणा पासूनच एकमेकांच्यात असा जीव गुंतलेला की एकाला लागले तर दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी यावे. मोठ्या भावंडानी लहानांना सांभाळले आणि जपले, कोणाबद्दल कोणाच्या मनात असूया किंवा तेढ निर्माण झाली नाही की कोणाला स्वतःबद्दल अहंकार किंवा गर्व झाला नाही. एकमेकांविषयी आपुलकी, प्रेम आणि जिव्हाळा या गोष्टी नाना नानींनी सगळ्यांच्या मनावर त्यांच्या वागण्यातून अशा ठसविल्या की आज नाना नानी हयात नसले तरीही त्यांच्या आठवणी आजही जशाच्या तशा जिवंत आहेत.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर
B. E.(mech), DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply