“या या ss आप्पा कुलकर्णी ss .. ही इथे छोटीशी बाग आणि ही बघा ss .. आलीच .. ही तुमची खोली !!” .. “वृद्धाश्रमातल्या” खोलीकडे घेऊन जाता जाता “दामू” गप्पा मारत होता .. “आता निवांत आराम करा .. संध्याकाळी चहाला भेटुच.. कधीही काही लागलं तर मला अगदी हक्काने सांगा बरं का !.. आणि हो ss .. हे घ्या .. माझ्याकडून हे सुगंधी “अत्तर” तुम्हाला सप्रेम भेट .. तसं मी काही तुम्हाला मला विसरून देणार नाही पण तरी विसारलातच तर या वासाने तरी माझी आठवण राहील तुम्हाला .. काय म्हणता ss .. हा हा हा ss .. चला निघतो आता !!!” .. असं म्हणत त्या अत्तराची कुपी कुलकर्णी आप्पांच्या हातात ठेवत दामू निघून गेला .. आप्पा थक्क होऊन बघत राहिले ..
दामू .. एक अजब रसायन .. खरं तर वृद्धाश्रमाच्या संस्थापकांच्या गावातला , “चारच बुकं” शिकलेला तरुण .. विसाव्या वर्षीच आई वडिलांचं छत्र हरपलं म्हणून त्या दयाळू संस्थापकांनी त्याला आश्रमात आणलं आणि तो तिथलाच होऊन गेला .. आत्ता असेल साधारण “चाळीशीच्या” आसपास …. स्वयंपाक घरातल्या आचाऱ्यापासून साफसफाई करणाऱ्या मावशीपर्यंत सगळ्यांना मदत करायचा .. बागकाम मन लावून करायचा .. आश्रमात येणाऱ्या सगळ्या आजी-आजोबांच्या मनाचा ठाव घेत लगेच आपलसं करणारा असा हा कायम हसतमुख आणि बोलघेवडा गडी .. त्याची खासियत अशी की त्या वृद्धाश्रमात जे कोणी नवीन राहायला येतील तेव्हा त्यांच्या पहिल्या दिवशी हा दामू त्यांना स्वखर्चाने अत्तराची बाटली द्यायचा .. वृद्धाश्रमात कोणी स्वखुशीनी नक्कीच येत नाही पण या अत्तरामुळे त्यांच्या इथल्या वास्तव्याची किमान सुरुवात तरी “सुवासिक” व्हावी हा त्याचा हेतु .. येणाऱ्या आजी-आजोबांना सुद्धा त्यामुळे नक्कीच प्रसन्न वाटायचं .. तोच दरवळ सतत त्यांच्या सोबत असायचा .. हा दरवळ खरं तर त्या अत्तराचा नाही ; तर समोरच्याच्या मनाला आपल्या चैतन्याने कायम प्रफुल्लित ठेवणाऱ्या दामुच्या “सुगंधी अस्तित्वाचा दरवळ !!” …..
आप्पा कुलकर्णी हळूहळू रुळायला लागले…. इतर सोबती ज्येष्ठ नागरिकांशी मजा मस्करी , गप्पा रंगू लागल्या .. गप्पात सुद्धा दामुचा विषय असायचाच ..
“काय कुलकर्णी ?? .. तुम्ही नाश्ता करायला आलात की मस्त घमघमाट येतो हो !! “
“होय हो दामले आजी .. सगळी दामूची कृपा !! हां हा ss ..”
“मग sss आमचा दामू आहेच हो तो तसा ss .. तुम्ही आत्ताच आलाय .. तो काय चीज आहे हे कळेल तुम्हाला हळूहळू !!”.. इति सोनावणे आजोबा
“ काय हो कारखानीस .. त्या जोशी आजी तिकडे बागेत काय करतायत सकाळीच सकाळी ? “.. आप्पांची उगाच एक शंका ..
“त्यांना दामुनीच पाठवलं असेल ..तुळस लावायला .. येतील त्या नंतर .. आपण सुरू करू नाश्ता !!” ..
कोणी एकटे पडले म्हणून , कोणाला सांभाळणारं कोणी नाही म्हणून , काहीना सगळे असूनही केवळ घरच्याना अडचण होते म्हणून , कोणी सोय म्हणून तर कोणी नाईलाज म्हणून असे सगळे वेगवेगळ्या परिस्थितीतून आलेले अनेक ज्येष्ठ नागरिक वृद्धाश्रमाच्या त्या एका छताखाली आपलं उर्वरित आयुष्य एकत्र व्यतित करत होते .
एक दिवस सकाळी आप्पा कुलकर्णी उठले तर बाजूलाच उशाशी एक बॉक्स दिसला.. त्यानी उघडून पहिला तर आत मस्त “म्हैसूर पाक” .. सोबत चिठ्ठी… “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .. तुमचा दामू !!” .. आजोबांच्या डोळ्यात टचकन पाणी .. आपला वाढदिवस एखाद्या नवख्या व्यक्तीनी लक्षात ठेवून इतक्या प्रेमानी एका परक्या ठिकाणी असा साजरा व्हावा ही कल्पनाच फार आनंददायी होती त्यांच्यासाठी .. सोनावणे आजोबा म्हणाल्याप्रमाणे “दामू काय चीज आहे” हे आता आप्पांना लक्षात येऊ लागलं होतं .. नंतर दामुनी स्वतः येऊन शुभेच्छा दिल्याच .. शिवाय संध्याकाळी वृद्धाश्रमाच्या वतीने सगळ्यांसारखा एकत्रित वाढदिवस साजरा केला … पण तो “म्हैसूर पाक” आणि त्यातल्या प्रेमाचा गोडवा मात्र आप्पांचं मन कायमचं जिंकून गेला . दामुकडे सगळ्यांची नावं आणि त्यांचे वाढदिवस याची यादीच होती .. प्रत्येकाचा वृद्धाश्रमातला पहिला वाढदिवस दामू असाच म्हैसूर पाकाचं सरप्राईझ देऊन साजरा करायचा .. तिथे येणाऱ्या सगळ्यांनीच आजवर गोडाधोडाचे अनेक पदार्थ खाल्ले असतील-नसतील पण आपुलकीनी दिलेला दामुचा हा “म्हैसूर पाक” तिथल्या कोणालाच कधीही न विसरता येण्यासारखा होता…
दिवस सरत होते .. असंच एके दिवशी जाधव आजोबा बागेत काहीतरी करताना दिसले .. आप्पांनी विचारलं तर म्हणाले ..
“काही नाही .. दामुनी दिलेलं तुळशीचं रोप लावत होतो !!” ….
“कशासाठी ? मागे एकदा जोशी आजी सुद्धा हेच करत होत्या ..काही विशेष आहे का ?”
“काही नाही हो आप्पा .. सहजच !!” .. असं म्हणत जाधव आजोबा निघाले ..
पण कुलकर्णी आप्पांचं कुतूहल मात्र अधिकच वाढलं आणि त्यानी जाऊन थेट दामूलाच याबद्दल विचारलं
“ते तुमच्यासाठी नाही हो ss .. म्हणजे मला ते तुम्हाला कधीच द्यायची इच्छा नाहीये”
“ म्हणजे रे दामू ??.. काय भानगड आहे ही ??”
“ सोडा हो आप्पा ss .असंच जरा कामाला लावलं त्यांना ..चला दोन डाव टाकू रमीचे !!“..
दामूला प्रत्येकाची नस अन् नस चांगलीच माहिती होती . तिथे काही नुसत्याच आज्या होत्या , काही फक्त आजोबा रहात होते तर काही ज्येष्ठ जोडपीही होती .. पण दामुचे सगळ्यांशीच अगदी जिव्हाळ्याचे संबंध .. व्यवस्थित लक्ष ठेवून असायचा सगळ्यांवर .. … एखाद्या वयस्कर शिक्षकाच्या हाताखालून कसे अनेक वर्षात वेगवेगळ्या प्रकारचे बरेच विद्यार्थी गेलेले असतात तसंच या तरुण दामुच्या हाताखालून इतक्या वर्षात बऱ्याच निरनिराळ्या परिस्थितीतले ज्येष्ठ नागरिक गेले होते .. या बाबतीत त्याचा अनुभव दांडगा होता.. त्यामुळे बरेचदा काहीही न सांगताच त्याला त्यांच्या मनातलं कळायचं ..
असंच एके दिवशी मुलं-नातवंडं भेटून गेल्यानंतर आप्पा एकदम खिन्न झाले .. आपल्या खोलीत जाऊन शांत बसले .. आपण त्यांच्याबरोबर न राहता इथे राहावं लागतंय या विचारानी उद्विग्न झाले होते .. दुसऱ्या दिवशी न्याहरीला सुद्धा आले नाहीत .. त्या विवंचनेत असतानाच त्यांच्या खोलीत दामुनी प्रवेश केला .. त्याच्या कमालीच्या मनमिळाऊ स्वभावानुसार भरभरून गप्पा सुरू केल्या .. सत्य कितीही कटू असलं , तुमची बाजू कितीही योग्य असली तरीही आता पुढच्या आयुष्यासाठी हा वृद्धाश्रम हेच घर आणि इतर सवंगडी हेच कुटुंब या वास्तवाची त्याच्या हसत खेळत शैलीत जाणीव करून दिली . पुढचं आयुष्य आनंदात घालवायचं असेल तर हे सत्य स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही हे पटवून दिलं. ज्यांनी आपल्याला सोडलं त्यांचा विचार करून तुम्ही तुमचे उर्वरित दिवस उगाच फुकट का घालवताय ?. जे नाहीये त्यात अडकून पडत दुःखी आयुष्य जगण्यापेक्षा या तुमच्यासारख्याच इतर समदुःखी नाही तर “समसुखी” मंडळींसोबत पुढचे दिवस मस्त मजेत घालवता येतील असा “सकारात्मक दृष्टीकोन” सुद्धा दिला .. आजकालच्या भाषेत सांगायचं तर अशा प्रसंगात एखाद्या मुरलेल्या “कौन्सिलरसारखं समुपदेशन” करायचा दामू .. कठीण काम होतं.. पण दामू ते लीलया पार पाडायचा आप्पांचं मन आता त्या विचारांतून बाहेर आलं .. शांत झालं .. त्यानी आस्थेने नकळत दामुचा हात धरला आणि त्याच वेळेस दामुनी पिशवीतून आणलेलं तुळशीचं रोपटं अलगद त्यांच्या हातावर ठेवलं ..
“हे घ्या आप्पा .. आता ही “तुळस” आपल्या बागेत लावा .. मगाशी आलेले सगळे त्रासदायक विचार त्या मातीत कायमचे पुरून टाका .. तुळशीमुळे आजूबाजूची हवा जशी शुद्ध होते , ऑक्सीजन वाढतो तसंच हे रोप लावल्यावर तुमच्या मनातले सगळे नकारात्मक विचार पळून जातात की नाही बघा .. चला चला !!” ..
एव्हाना इतरांच्या तुळस लावण्यामागचं गूढ उकललं होतं .. आप्पांनी मनोभावे ते रोप लावलं .. त्यानंतर देखील मुला-नातवंडांचे , नातेवाईकांचे फोन यायचे .. त्यांच्याशी बोलायचे , पण बोलून झाल्यावर कधीच ते उदास झाले नाहीत .. दामुच्या तुळशीची आणि त्यानी घातलेल्या समजुतीची जादू .. थोड्याफार फरकानी सगळ्यांचा अनुभव असाच असायचा …. म्हणूनच दामूची अशी इच्छा असायची की अशी तुळस कोणाला द्यायची वेळच येऊ नये पण तिथे राहणाऱ्या प्रत्येकावर कधी न् कधी ही वेळ यायचीच आणि दामू ती अचूक हेरायचा ..
याच नित्यक्रमात ऋतुमागूनी ऋतु जात होते .. आप्पा कुलकर्णी आणि त्यांच्यासारखी अनेक पिकली पानं केव्हाच गळून पडली .. अनेक वर्ष लोटली .. आताशा दामू ही एक “पिकलं पान” झाला होता .. मधल्या काळात वृद्धाश्रम संस्थापकांच्या पश्चात नवीन व्यवस्थापन आलं .. हा थकलेला “सत्तरीच्या” जवळ आलेला दामू सुद्धा आता “दामू आजोबा” होऊन तिथल्याच एका खोलीत इतरांसारखाच राहू लागला .. खूप जुना सदस्य म्हणून संस्था त्याचा सगळा खर्च करायची पण त्याचा वृद्धाश्रमात सक्रिय सहभाग बंद झाल्यापासून “अत्तर , म्हैसूरपाक आणि तुळस” या त्याच्या प्रथाही साहजिकच बंद झाल्या . अनेक नवीन आजी-आजोबा यायचे आणि जायचे ….पण दामूची जागा घेणारं मात्र दूसरं कोणीच नव्हतं ..
एक एक दिवस संपल्यावर त्या रात्री कॅलेंडरच्या त्या तारखेवर फुली मारणारे हे दामू आजोबा उद्याची तारीख बघून एकदम उदास झाले .. दुसऱ्या दिवशी उठल्यापासून खोलीतच थांबले .. काही खाल्लं-प्यायलं नाही .. “परमेश्वराss सोडव आता !!”.. असा जप करू लागले .. या सगळ्यामुळे थकवा येऊन भोवळ आली आणि पलंगावरच पडले. संस्थेच्या कर्मचाऱ्यानी हॉस्पिटल मध्ये नेलं .. त्यांच्या एका नियमित देणगीदाराचं हॉस्पिटल होतं ते .. आले तेव्हा जनरल वॉर्ड मध्ये अॅडमिट केलेले दामू आजोबा जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा मोठ्या स्पेशल रूम मध्ये होते . त्यांना जाग आल्यावर नर्सने लगेच डॉक्टरांना बोलावलं .. तशी सुचनाच होती डॉक्टरांची ….. प्रसन्न चेहऱ्याचे तरुण तडफदार डॉक्टर लगेचच आले आणि विचारपूस करू लागले
“ काय म्हणताय आजोबा ?? .. बरं वाटतंय ना आता ? “
“हो ss .. पण आता बास .. पुरे झालं आयुष्य . काय करायचंय आता अजून जगून ??“ .. दामू आजोबा त्रासिक चेहऱ्याने म्हणाले.
“ असं म्हणून कसं चालेल आजोबा ?? .. ओ सिस्टर , जरा बाहेर एक ट्रे ठेवलाय तो आणता का जरा प्लिज ? “.. डॉक्टरांनी बाजूला उभ्या असलेल्या नर्सला सांगितलं.
डॉक्टरांनी दामू आजोबांच्या पुढ्यात तो ट्रे ठेवला आणि त्यावर घातलेलं रेशमी कापड अलगद काढलं .. . तो ट्रे बघून दामू आजोबा अवाकच झाले कारण त्या ट्रेमध्ये होतं .. “अत्तर , म्हैसूरपाक आणि तुळस”..
दामू आजोबांच्या डोळ्यातलं आश्चर्य लपतंच नव्हतं .. झर्रकन जुना काळ आठवला आणि एकदम भरून आलं .. पण त्याचा इथला संदर्भ काही लागत नव्हता ..
“ हे काय डॉक्टर ???.. आणि हे सगळं तुम्हाला कसं माहिती ?? ”
“ दामू आजोबा .. मी “डॉक्टर कुलकर्णी” … तुम्हाला आठवतायत ना आप्पा कुलकर्णी ??.. त्यांचा मी नातू … माझी आजी गेल्यावर माझ्या आई बाबांनी आप्पांना तुमच्या वृद्धाश्रमात ठेवलं .. खरं तर मला ते अजिबात पटलं आणि आवडलं नव्हतं … पण तेव्हा मी होतो लहान … त्यामुळे माझ्या वाटण्याला काहीच अर्थ नव्हता … मी आप्पांना सोडायला आलो होतो तेव्हाच पहिल्यांदा तुम्हाला बघितलं … नंतर सुद्धा जेव्हा जेव्हा आलो तेव्हा तुम्हाला भेटलो … मला आजही तुमचा तो चेहरा लख्ख आठवतोय… अॅडमिट झालात तेव्हा बघताक्षणी ओळखलं मी तुम्हाला आणि लागलीच या रूम मध्ये हलवलं !!”
डॉक्टर कुलकर्णी अगदी आपुलकीनी बोलत होते ..
“ आप्पा फोनवर कित्येकदा मला तुमच्या गमती जमती सांगायचे .. जसा मोठा झालो तसं त्यानी तुमच्या या “अत्तर , म्हैसूरपाक आणि तुळस” त्याबद्दलच्या सगळ्या आठवणी सांगितल्या …. मी तेव्हाच ठरवलं की माझ्या आई वडिलांनी केलेली चूक मी कधीही करणार नाही … मी माझ्या आई वडिलांसोबतच रहातोय .. मला माझ्या आजोबांचा सहवास मिळाला नाही पण माझ्या मुलांना मी त्यापासून वंचित नाही ठेवलं … या सगळ्याचं अप्रत्यक्ष श्रेय तुम्हालाच आहे दामू आजोबा ss .. तुमचा आज या हॉस्पिटल मधला पहिला दिवस म्हणून हे “अत्तर” खास तुमच्यासाठी …. तुमच्या अॅडमिशन फॉर्मवर बघून समजलं की आजच तुमचा वाढदिवस म्हणून हा “म्हैसूर पाक” …. आणि ही “तुळस” कशासाठी आहे हे तुम्हाला कळलं असेलच ना दामू आजोबा .. काय sss ?? तेव्हा आता हे नकारात्मक विचारांचं मळभ ताबडतोब दूर करा , तीन-चार दिवस इथे निःसंकोचपणे आराम करा आणि तंदुरुस्त होऊन पुन्हा नव्याने जन्म घ्या ….माझ्या आप्पांच्या आठवणीतला दामू व्हा .. अहो आजही तुमच्यासारख्या अनेक समवयस्क मंडळींना तुमच्या सकारात्मक ऊर्जेची नितांत गरज आहे .. मग तुम्हीच अशी शस्त्र टाकून कसं बरं चालेल ??”…
डोळ्यातलं पाणी हळूच पुसत , डॉक्टर कुलकर्णींच्या पाठीवर कौतुकाने थाप मारत , नाजुक स्मित हास्य करत दामू आजोबा म्हणाले .. “ हे बरं आहे डॉक्टर .. गुरुची विद्या गुरूलाच काय ??? … हा हा ssss ….. पण खरं आहे तुमचं …मीच जरा वाट सोडून मध्येच भरकटलो होतो ….त्यात काल रात्री कॅलेंडरवर आजची माझ्या वाढदिवसाची तारीख बघितली आणि उगाच हे वय वाढतंय , आपण ओझं होतोय असं वाटू लागलं होतं मला अचानक ….पण आता नाही डॉक्टर ….. लगेच उद्याच्या उद्याच सोडा मला …..सकाळीच सकाळी ही तुम्ही दिलेली तुळस लावतो तिकडे ….आणि कामाला लागतो ..
जगण्याची हरवलेली उमेद गवसलेले हे दामू आजोबा आता पुन्हा एकदा नव्या जोमाने , पूर्वीच्याच उत्साहात त्यांच्या मूळ दामूच्या भूमिकेत शिरले ….. आणि वृद्धाश्रमात पुन्हा एकदा रुजू झाली रामबाण उपाय असलेली त्यांची त्रिसूत्री .. अर्थात .. “अत्तर , म्हैसूरपाक आणि तुळस”..
©️ क्षितिज दाते, ठाणे
Leave a Reply