खरंतर लहानपणीच्या खूपशा आठवणी प्रत्येकाला आयुष्यभर पुरतात . त्यात कसा आनंद घ्यायचा ? किंवा त्यातून काय शिकायचे ? हे प्रत्येकाच्या आपापल्या स्वभावावर अवलंबून असते .खूप साऱ्या खूप छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानता येतो .म्हणजे तुम्ही म्हणाल, ‘ हे अल्पसंतुष्ट आहेत काय ? आपल्याला आवडत नाही .माणसाने कसे मोठी स्वप्ने पहावी. एवढ्या तेवढ्या गोष्टीत समाधान मानले तर आपण पुढे कसे जाणार ? ‘ वगैरे वगैरे हेही खरेच .पण आजूबाजूचे, आर्थिक परिस्थिती , कुवत म्हणा हवे तर आणि सामाजिक भान यावर या गोष्टी अवलंबून असतात . मूळ मुद्दा राहिलाच.
आत्ताची 50 -60 वयाची पिढी . त्यांनी असे खूप सारे अनुभव नक्कीच घेतले असतील आणि ते आठवणीत ठेवून खूप रमायला होतं . लहानपणात मलाही खूप वेळा असं होतं .
माझे पप्पा आणि ताई (आई) प्राथमिक शिक्षक .माझे पप्पा एकदम कडक शिस्तीचे .कधीच फालतू लाड करायचे नाहीत .पण सर्वच बाबतीत भरभरून आनंद घेणारी जाॕली स्वभावाची कलंदर व्यक्ती .त्यांना अत्तर खूप आवडायचे . त्यावेळेस स्प्रे चे एवढे फॅड नव्हते . छोट्या छोट्या सुंदर आकाराच्या काचेच्या बाटल्यातून अत्तर विकत मिळत . बस स्टॅन्ड वर सुद्धा गळ्यात छोटी लाकडाची पेटी अडकून फिरणारे विक्रेते असत . रस्त्यावर , चौकात विक्रेते असत .तसं तर बाटली सर्वांना परवडत नसे . मग एक कापसाचा बोळा बाटलीच्या तोंडावर धरून अत्तर त्याला लावली जाई आणि तो बोळा म्हणजे फाया विकत घेतला जाई . बार्शीच्या पांडे चौकात अजिंठा लॉज च्या समोर बरेच विक्रेत्ये आसत .त्याच्या मधला फिरदोस अत्तर माझ्या पप्पांना खूप आवडत असे . आम्हा भावंडांना सणाच्या दिवशी समोर बसून सगळ्यांना ते फाया देत .मग काय ? आम्ही पुढचे तीन-चार दिवस त्या सुंदर धुंद वासाबरोबर हवेतच रहात असु . कानात वरच्या बाजूला तो बोळा ठेवायचा आणि हात पालथा करून तळहाताच्या मागील बाजूला तू चोळायचा .दिवसभर सारखा सारखा पालथा हात हूंगत राहायचा . कसले भारी वाटायचे . आता कितीही स्प्रे मारा .नाही तर स्प्रे ने आंघोळ करा ते समाधान नाही .
शाळेत खापराच्या पाट्या सगळ्यांनाच असायच्या .चुकून पाटी पडली की फुटायची .मग वर्षभर त्याच पाटीचा मोठा किंवा छोटा तुकडा वापरावा लागे .त्याला खापोळा म्हणायचे . तो कोळशेने घासून पाण्याने स्वच्छ धुऊन वापरायचा .परिस्थिती साधारण असणाऱ्यांना कोण आणणार सारखी सारखी फुटली की पाटी ? तशी बऱ्यापैकी सगळ्यांची परिस्थिती सारखीच असे . काय सुंदर अक्षर उमटायचे त्याच्यावर .कधी कमीपणा वाटायचा नाही .माझ्याकडे फुटकी पाटी आहे म्हणून .कोणाचेच मित्र मैत्रिणी एकमेकांना चिडवत नसेत. त्यावर पाठ केलेले पाढे मात्र आयुष्यभर लक्षात राहिले .
शाईचे पेन असायचे पूर्ण दौऊत (शाईची बाटली )भरून आणायची परिस्थिती नसायची .शाईची दौऊत म्हणजे शाईची बाटली हेही सांगावे लागेल .आता काय करणार ? परत शंका नको .आर्थिक परिस्थिती नसायची मग दुकानातून दौत भरून आणायची . शाई संपली की उसनवारी चालायची .तीन ते पाच थेंब .अगोदरच पेन उघडून ठेवायचे . म्हणजे त्यातील शाई सांडायला नको .असे देव -घेवीचे संस्कारही त्याचं वयापासून झाले .ते आयुष्यभर अंगवळणी पडले .
फारसा पैसा वापरत नसे . धान्य भरपूर पिकायची मग बरीच देवाण-घेवात धान्यात चालायची . सुट्टीला आजोळी गेली की आजी फ्रॉक मध्ये ज्वारी द्यायची . दुकानातून काही पण खायला आणण्यासाठी .गारे गारवाला बर्फ किसून गोळा देणारा .तो सुद्धा ज्वारी घ्यायचा . तो गोळा त्याच्याजवळ उन्हात उभा राहून चोकत राहायचे .थोड्यावेळाने त्याला परत त्याच्यावर बाटलीतील रंगीत गोड पाणी टाकायला लावायचे .संपेपर्यंत एक दोन वेळा ते घ्यायचे . मग अर्धा दिवस लाल जीभ आपण पण आरशात पाहायची आणि इतरांना पण दाखवायची ‘ बघू तुझी किती लाल ? किती मजा यायची .खूप साध सरळ आयुष्य .
शाळेत एखाद्या दिवशी कोणी एकाने गोळ्या आणल्या .खोबऱ्याच्या गोळ्या किंवा लेमन गोळ्या किंवा बाहुलीच्या आकाराच्या कि त्याच्याजवळ लाडीगोडी लावायची .उगीचच त्याच्या मागे पुढे करायचे .सर्वांना हे पाठ झालेले असे .प्रत्येकाची कधी ना कधी ही वेळ यायची .मग त्यांनी फ्रॉक किंवा शर्टाच्या आतून गोळी ठेवून ती तोंडाने फोडायची . म्हणायचे ‘ तुला , चिमणीच्या दातांनी फोडून देतो किंवा देतो ‘ मग त्यातला एक तुकडा आजूबाजूच्या मित्र-मैत्रिणींना द्यायचा .सगळेच खुष . त्यावयापासून शेअरींगची किंवा इतरांना आनंद देण्याचा सवय लागली . सर्वांनाच गाईड नसायची .गाईड काय ? पुस्तक पण नसायचे .एकमेकाची गाईड वापरून परीक्षा दिल्या जायच्या .कोणीच आखूडपणा करायचा नाही .
आत्ताच्या पिढीच्या लहान मुलांना असले अनुभव घेता येत नाही . त्यांना सहजासहजी सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात .म्हणजे पालक देतात त्यामुळे ती बरेच अंशी आत्मकेंद्री बनलेले आहेत .अपवाद असतील काही .पण
असे ते रम्य बालपण आणि त्या सुखद आठवणी .फायामधल्या अत्तरासारख्या उडून गेल्या आहेत .मागे उरले फक्त आठवणींचा कोरडा बोळा सतत स्पर्श करून त्या दिवसांच्या तरल आठवणी हिंदोळ्यावर झुलत राहण्यासाठी .त्याच्यावरच आत्ताचे धुंद आयुष्य जगत राहायची आणि त्यातच रमून जायचे .रम्य ते बालपण आणि रम्य त्या आठवणी .आता लहानपण परत येणार नाही .पण ते निरागस जीवन सगळ्यांनाच जगायला आवडेल .होय ना ?
‘ लहानपण देगा देवा ‘
असाच आसु दे आठवणींचा ठेवा ‘
-सौ.कल्पना डुरे – पाटील .
Leave a Reply