मला माझ्या पहिल्या जहाजावरील माझ्या कामाचा पहिला दिवस चांगलाच आठवतो. माझे प्री सी ट्रेनिंग झाल्यानंतर जहाजावर ज्युनिअर इंजिनिअर म्हणून जॉईन झालेलो. ज्युनिअर इंजिनिअर किंवा फिफ्थ इंजिनिअर ही जहाजावर इंजिन डिपार्टमेंट मध्ये ट्रेनी इंजिनिअर म्हणून रँक आहे. ज्यामधे जहाजाच्या कामाची, कुठल्याही मशिनरी किंवा इंजिनची प्रत्यक्ष अशी जवाबदारी नसते. फोर्थ इंजिनिअर पासून ते चीफ इंजिनिअर अशा सगळ्यांना जहाजावर जबाबदारी असते.
ज्युनिअर इंजिनिअर चे काम म्हणजे जहाजावर कामं शिकून घ्यायचे आणि जिथं गरज लागेल किंवा मदत लागेल तिथं वरिष्ठांच्या सूचनेने आणि मार्गदर्शनाने काम करायचे. माझा जहाजावरील पहिलाच दिवस होता त्या दिवशी मला पहाटे चार वाजता सेकंड इंजिनिअर सोबत वॉच मध्ये जावं लागले होते. पहाटे पावणे चार वाजता केबिन मध्ये मला फोन आला, पलीकडून गुड मॉर्निंग पांच साब क्वार्टर टू फोर असा आवाज आला आणि लगेच मी काही उत्तर देण्या अगोदर फोन ठेवला सुद्धा गेला. मी ज्याला रीलिव्ह करणार होतो तो दूसऱ्या दिवशी घरी जाणार होता. जहाजावर तो काय काम करत होता आणि जहाजावरील मशीनरी आणि जहाजाची इतर माहिती तो मला तो घरी जायला निघेपर्यंत देणार होता.
आमचं जहाज अमेझॉन नदीच्या तोंडावर होते आणि पुढे नदीतून मनॉस या पोर्ट मध्ये जाणार होते. चार वाजण्याच्या आत मी खाली इंजिन कंट्रोल रूम मध्ये पोचलो. रात्री बारा ते चार वॉच करणारा थर्ड इंजिनिअर ठाण्याचा आणि मराठी असल्याने त्याने हसुन काय पांच साब झोप झाली का म्हणून विचारले. चहा घे मग झोप उडेल असं तो सांगत होता. घरी जाणारा ज्युनिअर इंजिनिअर माझ्या मागोमाग आला आणि पुढल्या पाच मिनिटांनी सेकंड इंजिनिअर आला. सेकंड इंजिनिअरच्या कपाळावरील आठ्या त्याला आम्ही सगळे गुड मॉर्निंग बोलल्यावर पण गेल्या नाहीत. मी मनात म्हटले थर्ड इंजिनिअरने जसे हसून स्वागत केले, आपण काही बोलायच्या आतच त्याने स्वतःहून गुड मॉर्निंग पांच साब केले आणि सेकंड इंजिनिअर असा काय उदास होउन गुड मॉर्निंग केले तरी हुं करत नाही की चूं करत नाही.
थर्ड इंजिनिअर सेकंड इंजिनिअरला वॉच हॅण्ड ओव्हर करून निघून गेला. जाताना माझ्या पाठीवर थाप मारताना पुन्हा हसून गेला. सेकंड इंजिनिअर ने एक सिगारेट शिलगावली, झुरके मारत मारत ती संपवली पुन्हा दोन मिनिटांनी दुसरी एक सिगारेट शिलगावली. सिगारेट विझवून झाल्यावर माझ्याकडे वळला आणि बोलला, एक जन को सिखाया अभी फिरसे तेरेको सिखाना पडेगा. मी ज्याला रीलीव्ह केले तो पण मुंबईचा होता त्याने मला जहाजावर ज्युनिअर इंजिनिअर म्हणुन काय काय काम करावं लागतं. कुठली मशिनरी कुठे आहे, त्याचे काम काय. कुठली. महत्वाची आहे , कुठल्या मशिनरी चे काय तपासायचे. कुठला पंप कुठे आहे असं सगळं दाखवले.
मला बोलला सेकंड इंजिनिअर जे बोलला ना को तेरेको सिखाना पडेगा, तर एक गोष्ट लक्षात ठेव इथे कोणी तुला स्वतःहुन शिकवणार नाहीये. तुझे तुला शिकावं लागेल आणि कसं शिकायचे किती वेळात शिकायचे ते तुझ तुलाच शिकावं लागेल. हा सेकंड ॲटीट्युड वाला आहे, पुढील महिन्यात सेकंड इंजिनिअरचा रीलिव्हर येईल.
महिनाभराने सेकंड इंजिनिअर जाऊन त्याच्या जागी दुसरा येणार होता. गेल्या महिना भरात त्या सेकंड इंजिनिअर ने मला पाईप लाईन स्ट्रेस करणे, फ्युएल आणि ल्युब ऑईल च्या लाईन डायग्राम बनवणे अशी कामं सांगितली. त्याला काही अडचणी किंवा माहिती विचारली असता तो नाराज व्हायचा किंवा सांगितले तरी जीवावर येऊन संगितल्यासारख करायचा.
थर्ड इंजिनिअर मराठी होता, फोर्थ इंजिनिअर बंगाली होता दोघेही मला काही काम असले की बोलवायचे शिकवायचे माहिती द्यायचे. चिफ इंजिनिअर साठी ओलांडलेला होता तो फक्त सकाळी दहा वाजता चहा पिण्यासाठी इंजिन कंट्रोल रूम मध्ये यायचा. चिफ इंजिनिअर मला मी काय शिकलो किंवा कसं काम करतो आहे असं विचारण्या ऐवजी जे काही करशील ते काम काळजी घेऊन आणि सांभाळून कर असे आपुलकीने सांगायचा. कधी कधी तर स्वतः मला घेऊन जायचा आणि हे बघ हे असं चेक करत जा, काही गडबड वाटली तर इंजिनीअर्स ना लगेच कळवत जा, इंजिन रुम मध्ये राऊंड मारताना नाक, कान , डोळे अशा सर्वांचा वापर कर असं सांगायचा. सेकंड इंजिनिअर घरी जाण्यापूर्वी महिनाभरात त्याच्या मार्गदर्शना खाली मी काय काय शिकलो काय काय ट्रेनिंग घेतली हे माझ्याकडे असलेल्या ट्रेनिंग रेकॉर्ड बुक मध्ये त्याच्या सही निशी नोंदवून घ्यायचे होते. माझ्याशी तो क्वचीतच बोलत असे, इतरांशी पण तसाच तुसडे पणाने बोलायचा.
मी त्याच्याकडे ट्रेनिंग रेकॉर्ड बुक घेऊन गेल्यावर त्याने दोन वेळा आता नको नंतर घेऊन ये असं सांगितलं. तिसऱ्या वेळेला गेलो तर नाराजीने ते ट्रेनिंग बुक हातात घेतले आणि मग एक एक पान उलटून त्या बूक मध्ये असणारे मुद्दे विचारू लागला. जहाजावर ही मशिनरी कुठे आहे? या उपकरणाचा उपयोग काय? जहाजावर अमुक अमुक सिस्टीम कशासाठी आहे? असे प्रश्न तो वाचून विचारू लागला. मला त्याच्या एकाही प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. तो मला म्हणाला हे काय आहे, तुला अजून हे माहिती नाही ,ते माहिती नाही. तुला महिना होत आला पण काहीच सांगता येत नाही. तू कशासाठी जहाजावर आला. त्या रात्री मी बराच वेळ रडत बसलो होतो आणि खरंच मी जहाजावर कशासाठी आलो असं मला वाटू लागले होते. नवीन येणार सेकंड इंजिनिअर हा सरदारजी होता. प्रि सी ट्रेनिंग ला माझ्यासोबत जम्मूचा एक सरदार होता त्याचा मामा मला सेकंड म्हणून येणार होता. माझ्या सरदार मित्राचा मामा सेकंड इंजिनिअर म्हणून माझ्या जहाजावर जॉईन झाला. त्याला जुन्या सेकंड इंजिनिअर जाताना नवीन सेकंड इंजिनिअरला मला अजून काही येत नाही , मी असा आहे मी तसा आहे अशी गाऱ्हाणी लावली आणि तो निघून गेला. नवीन आलेल्या सेकंड इंजिनिअरला मी त्याच्या भाच्याचा मित्र म्हणून सहानुभूती वाटत होती की नाही माहिती नाही पण तो मला अशा पद्धतीने शिकवू लागला की काही दिवसांपुर्वी मला मी कुठल्या कुठं जहाजावर आलो आणि रडू लागलो होतो याचा विसर पडू लागला.
बच्चा अपने माँ के पेट से थोडी ना सिख के आता हैं. जहाज पे जो टिकता हैं वो सिखता भी हैं. तुम्हे बस जिद्दी बनकर टिकना हैं. जहाजावर कुठलाही प्रॉब्लेम आला की त्यातून काही ना काही शिकायला मिळू लागले. सेकंड इंजिनिअर असलेला सरदारजी मला विचारू लागला हे का झालं असेल आता पुढे काय करायचे. त्याला काही उत्तरं दिली तर तो तसे का करावं लागेल याची कारणं विचारायचा, मशीनरी आणि सिस्टीमच्या मॅन्युअल मधून फॉल्ट फाइंडिंग करायला लावायचा. तो नेहमी एकच बोलायचा देख भाई जहाज मे काम करना कोई रॉकेट सायन्स नहीं है. काय झालं कधी झालं आणि कसं झालं एवढं शोधायचे आणि पुढं काय करायचे एवढं ठरवता आलं पाहिजे. मी माझ्या पहिल्या जहाजावरच मी कुठं येऊन फसलो मला काही येणार नाही म्हणून एका महिन्यातच रडत बसलो होतो पण पुढील चार महिन्यातच मी जहाजावरील सगळ्या मशिनरी आणि सिस्टीम बद्दल माहिती करून घेतली आणि सरदारजी जाऊन नवीन सेकंड इंजिनिअर आला. सरदारजी ने जाता जाता माझी पाठ थोपटली आणि त्यानंतर आलेल्या सेकंड इंजिनिअर ने सुद्धा मी माझे पहिल्या जहाजावरुन साडे आठ महिन्यांनी घरी जायला निघाल्यावर पाठ थोपटली.
पुढील प्रत्येक जहाजावर जेवढे चीफ इंजिनिअर मला भेटले त्या सगळ्यांनी जाताना माझी नुसती पाठ न थोपटता माझ्या अप्रेजल रिपोर्ट मध्ये हार्ड वर्किंग, एक्सीलंट ॲटीट्युड, रेकमंडेड फॉर ॲक्सीलरेटेड प्रमोशन असे शेरे मारले.
अप्रेजल रिपोर्ट मधील ॲक्सीलरेटेड प्रमोशनच्या रेकमंडेशन मुळे मला मानसिक तयारी नसल्याने एकदा थर्ड इंजिनिअर आणि दुसऱ्यांदा चिफ इंजिनिअर चे प्रमोशन स्वतःहून नाकारण्याची वेळ आली होती. पण शेवटी अशी वेळ आली की मी माझ्या वयाहूनही जास्त अशा चाळीस वर्ष जुने असलेल्या जहाजाचा चीफ इंजिनिअर म्हणून काम करू शकलो.
काही लोकांना त्यांच्या शिक्षणाचा त्यांच्या पदाचा, दिसण्याचा किंवा त्यांच्या आर्थिक परिस्थीतीचा ॲटीट्युड असतो ज्यातून त्यांची वृत्ती किंवा त्यांचा दुसऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन दिसून येतो ज्यामुळे अशी लोकं आपल्या आयुष्यात पुन्हा येऊच नयेत असं मला वाटायचं. शेवटी जिद्द आणि चिकाटी सोबतच कोणाच्या ॲटीट्युडला कशासाठी आणि किती महत्व द्यायचे हे तर आपल्याच हातात आहे.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनिअर
कोन,भिवंडी,ठाणे.
Leave a Reply