१९७९ साली सांगलीच्या स्थानिक वृत्तपत्रांमध्ये औदुंबराच्या १४ जानेवारीच्या “सदानंद साहित्य संमेलनाचे ” वृत्त वाचले आणि त्यांमध्ये चक्क एक काव्यस्पर्धा असल्याचीही (सुखद) बातमी होती. मी आणि मित्राने कविता पाठविल्या. काही दिवसांनी वालचंदच्या हॉस्टेलला आमच्या नांवे पोस्टकार्ड. त्यांत काव्यस्पर्धेचा निकाल होता. आम्हांला बक्षीस नव्हते (प्रथम पुरस्कार होता सांगलीच्या राजलक्ष्मी भगवान नाईक यांना) पण काव्यवाचनाचे निमंत्रण होते.
आम्ही गेलो, एकदिवसीय साहित्य संमेलनाचा ग्रामीण आणि आत्मीय अनुभव घेतला. आणि मग वालचंद सुटेपर्यंत दरवर्षी जात राहिलो.
१९८६ साली इस्लामपूरला आल्यावर, ति. दादांना (कविवर्य सुधांशू) यांना कळविले. पुन्हा १९८७ पासून आम्ही उभयता औदुंबरला साहित्य संमेलनाला जायला सुरुवात केली.
१९९२ सालच्या अखेरी एका रात्री संयोजकांपैकी २-३ व्यक्ती इस्लामपूरला आमच्या घरी आल्या. १९९३ च्या कवी संमेलनाचे अध्यक्षपद मी स्वीकारावे अशी त्यांनी विनंती केली. मी गडबडलो. जिथे वर्षानुवर्षे कविता वाचल्या (आणि कधीही पारितोषिक मिळाले नाही), तिथे डायरेक्ट अध्यक्ष ! तेही सुवर्णमहोत्सवी साहित्य संमेलनाचे ? अखेरीस त्यांचे आवर्जून आलेले निमंत्रण आणि ति. दादांचे हक्काचे बोलावणे टाळणे शक्य नव्हते. त्या दिवशीच्या संपूर्ण संमेलनाचे अध्यक्ष श्री ना.ग. गोरे होते. मी गेलो. भाषण केले, कविता सादर केल्या. कृष्णेकाठच्या या प्रेमळ साहित्य मेळाव्याला असलेली आपुलकीची किनार नव्याने अनुभवली.
त्याचवर्षी इस्लामपूर सुटले आणि आमचे साहित्य संमेलनही ! पुढील काही वर्षे त्यांनी आवर्जून निमंत्रण पाठविणे सुरु ठेवले होते, पण पुण्याहून जाणे जमायचे नाही.
पुढील महिन्यात पुन्हा एकदा सदानंद साहित्य संमेलन असेल आणि यंदाही आम्हांला जाणे जमणार नाहीए.
नुकत्याच घडलेल्या शोधयात्रेत हे सापडले आणि मी पोस्ट लिहायला उदयुक्त झालो. चक्क हस्तलिखित भाषणही सापडले आहे, पण विस्तारभयास्तव —-
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply