रविश ,
तुझ्या घरी मी येऊन गेले . पण आपली भेट झाली नाही . तू पुढचे तीन आठवडे सतत टूर वर असल्याचे कळले . त्यामुळे आता आपली भेट होणे कठीण आहे . म्हणून हे पत्र .
अर्थात whatsapp , email , फ़ेसबुक आणि फोन यावर संपर्कात राहू हे नक्कीच ! ! !
मी मधेच तुला सांगितल्या प्रमाणे मी आता कायमची लंडनला जात आहे .आईला बरोबर घेऊन .
कायमचे घर सोडायचे म्हणून सगळी आवराआवर करत असताना जुन्या फोटोत तू , शिरीष आणि तुमचे भाटे सर ( माझे आजोबा ती .आप्पा ) अशा फोटोच्या २ कॉपी मिळाल्या . त्या तुझ्या घरी वहीनी कडे दिल्या आहेत….एक शिरीष साठी आणि दुसरी अर्थात तुझ्यासाठी . तुम्ही दोघे आप्पांचे अत्यंत लाडके विद्यार्थी ना ! ….नंतरच्या काळातले त्यांचे तरुण मित्र .
…हे फोटो वहिनीला दिले तेंव्हा तिला इतके भरून आले होते ना …आणि मलाही …एक तर आमच्या दोघींचे माहेरचे आडनाव एक …आणि दुसरे म्हणजे तू आणि शिरीष चे आप्पांशी असलेले भावबंध ! ! !
खरंच , कसे असत ना आपले आयुष्य ….
मी पहिलीत असल्यापासून तुला आणि शिरीषला ओळखते . तेंव्हा तुम्ही आप्पांकडे इंग्लीश शिकायला यायचात . तेंव्हा तुम्ही सातवी – आठवीत होतात .( अर्थात तुम्ही पाचवीत असल्यापासूनच आप्पांकडे यायचात . पणत्या एक -“दोन वर्षातले मला काही आठवत नाही .)
तुम्ही दोघं इतर मुलांबरोबर एरवी यायचात त्यात काही नाही . पण फक्त तुम्ही दोघं च शनिवार – रविवार तर्खडकर ग्रामर शिकायला यायचात तेच मला जास्त आठवते आणि आवडतही .
माझ्या मनात तुमच्या दोघांची असलेली प्रतिमा म्हणजे इंग्लीश शिकायची तुम्हा दोघानाही असलेली अतोनात आवड . त्यातही शिरीषचा कल व्याकरणाकडे जास्त आणि तुझा एकाच शब्दाला असलेल्या अनेक अर्थाकडे .
त्या विविध छटांचा नेमका अर्थ आणि त्याचा उपयोग समजून घेण्यासाठी तुझी धडपड सुरू असायची . तुम्ही graduation ला गेलात तरी तुम्ही तिघे शनिवार – रविवार हमखास भेटायचात .
मला अजून आठवते तुमच्या या चर्चा ऐकायला मिळाव्यात म्हणून मी शनिवारी अक्षरशः पळत घरी यायचे .
तुम्हांला तिघांना तुम्ही कशाची चर्चा करत आहात याचही कधी कधी भान नसायचे .
मला अजून आठवतंय …तुम्ही पंचवीस – सव्वीस वर्षांचे असाल . तुम्ही अप्पांशी मिठी – आलिंगन -चुंबन – श्रुंगार याबाबतचे विविध शब्द आणि त्यातल्या अर्थाच्या वेगवेगळ्या छटा यावर चर्चा करत होतात .
१८ -१९ वर्षाची एक मुलगी घरात आहे याचेही तुम्हांला कोणाला भान नव्हते .
मी याबाबत तू आणि शिरीषला विचारलं तर तू म्हणालास की ” आम्ही फक्त चर्चा करत होतो ; क्रुती नाही . आणि ही चर्चा ही भाषा किंवा शब्दांची होती …त्यातल्या विषयाची किँवा वासनेची नाही ”
असले तुम्ही तिघे ….
तुमचे हे शिकणे कधीच रुक्ष नसायचे ! तू आणि शिरीष खऱ्या अर्थाने हिंदी पंडित आणि आप्पाना हिंदी चा गंधही नाही .त्यामुळे आप्पा सांगायचे की चर्चेत तुम्ही हिंदी साहीत्यातले दाखले सांगा ….तुमच्या शिक्षा ही कायभन्नाट असायच्या … इंग्लीशचे एक एक आद्याक्षर घेऊन त्याचे प्रत्येकी दहा शब्द लिहायचे असा खेळ तुम्ही खेळायचे …आदल्या दिवशी झालेला शब्द जर दुसऱ्या दिवशी पुन्हा आला तर त्यादिवशी जाजमावर न बसतागार शहाबादी लादीवर खुरमान्डी घालून बसायचे अशी शिक्षा होती ….आणि व्याकरणात चूक झाली तर त्यादिवशी पूर्ण वेळ उभे राहून शिकायचे ….
तुला कधीच खुरमान्डी घालून बसता यायचे नाही आणि शिरीषला इतका वेळ उभे राहायचा कंटाळा यायचा …
मग एकदा तुम्ही आप्पा ना पटवलत ….की तुझी कशीही चूक झाली तरी तुला शिक्षा म्हणजे तू उभे राहायचे आणि तेच शिरीष ला शिक्षा म्हणजे शिरीष नेहमी खुरमान्डी घालणार
या पटवण्याचा मास्टर – माईंड तू ….
त्यावरून आप्पा ना नंतर कधीही विचारले तर आप्पा म्हणायचे की तू म्हणजे ” द्वाड पण गोड पोरगं ” !
तेंव्हा पासूनच तुझे हेच वर्णन डोक्यात – मनात घट्ट बसले आहे .
तुझ्या कोणत्याही भाषणाला जाऊन आलो की मी आणि आई एकदा तरी म्हणतोच ….तू म्हणजे द्वाड पण गोड पोरगं ….
एकदा आईने तुला विचारले होते की तुझ्या भाषणात – लिखाणात अनेकदा तू एकाच अर्थाचे अनेक शब्द का वापरतोस …
तेंव्हा तू हसून म्हणाला होतास …ही आप्पांची क्रुपा ….
आणि मग म्हणालास की तोच तोच शब्द वापरण्याचा तुला कंटाळा येतो ….
पण तोच शब्द त्याच अर्थाने एकाच संभाषणात परत वापरला तर आप्पा चमकून पाहायचे म्हणून तुला ही सवय लागली ना ….
विशेषण आणि अनुप्रास याची ओढ अशीच तुझ्या कडे माझ्या आई कडून आली …ती म्हणायची शिरीष ला चकली आणि तुला बेसनाचा लाडू …साजूक तुपातला व बेदाणे लावलेला …..
आणि हो ….
फोटो बरोबर जांभळे आणि बकुळीची फुले पण दिली आहेत . या दोन गोष्टीशिवाय तुझी आठवण पुरीच होणार नाही …
आठवत तुला ?
तू आणि शिरीष मी दुसरीत असताना मला आमच्या वाड्याच्या पायऱ्यांवर बसून माझा ग्रुहपाठ पूरा करायला मदत करत होतात . त्यावेळी काहीतरी समजावून देण्यासाठी अंगणात पडलेले जांभूळ तू उचलून आणलेस . तेनेमके आप्पानी पाहिले . ते रागावले नाहीत ; पण ते एवढे म्हणाले की ….” जी वस्तू आपली नाही , ती केवळ खाली पडली आहे म्हणून आपली होत नाही .”
तेंव्हा पासून मला आठवत ते इतकेच की अगदी शेंगदाणे विकत घेतानाही तू खारेदाणे विकणाऱ्या भय्याला विचारल्या शिवाय दाण्याला हात ही लावत नाहीस .
आज तुझ्या निस्प्रुह कारकिर्दीचा गौरव होत असतो तेंव्हा मला हे नेहमी आठवते …ही खरी गुरुदक्षिणा .
तुझे आजोबा तुला चहा पिण्यावरून ओरडले म्हणून तू आपणहून शालेय जीवनात चहा पिणे सोडले होतेस …
एकीकडे असा कर्तव्यकठोर असताना तू किती कोमल आहेस हेही मला माहीत आहे ना ….म्हणून फोटो बरोबर बकुळीची फुले दिली आहेत …खर तर त्याचा वळेसर देणार होते …तुला आवडतो तसा
पण नेमका त्यादिवशी नाह्री ना मिळाला …
मला नेहमी आठवते की आमच्या घरून निघताना तू नेहमी दिंडीतून बाहेर पडताना रस्ता क्रॉस करायचास …आवश्यकता नसतानाही …
याबाबत तुला विचारले की म्हणायचास ..”.दिंडीत आणि बाहेर बकुळीची फुले पडलेली असतात . त्यावर चुकून पाय नको पडायला ” .
या जुन्या आठवणींच्या बकुलफुलात आता एक नवीन भर पडली आहे .
गेल्या महिन्यात …
तुझी पुस्तके द्यायला तू आमच्या घरी आला होतास . लाडका विद्यार्थी आणि त्यात एकावेळी इतक्या विविध प्रकारची पुस्तके प्रसिद्ध झालेला लेखक दस्तुरखुद्द स्वतः जातीने घरी आलेला …
साहजिकच आईला अत्यानंद …
तिला पुस्तकांचे पैसे द्यायचे होते आणि तुला ते घ्यायचे नव्हते .
मग त्यावर तू नामी शक्कल लढवलीस .
तू म्हणालास ….” बाई , तुम्ही मला ” औदुंबर ” कविता शिकवा “.
मग काय ?
आमच्या घरात एक अनोखा वर्ग भरला ….
दोघांचाच ….दोघां साठीच ….
साठीच्या उंबरठ्यावरचा विद्यार्थी आणि नव्वदीची शिक्षिका ….
विद्यार्थी बाईंच्या पायाशी बसलेला …
खुरमान्डी घालून ….
” ऐल तटावर , पैल तटावर हिरवाळी घेऊन
निळा सावळा झरा वाहतो बेटा – बेटातून
चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे
शेतमल्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे
पायवाट पांढरी आडवी तिडवी पडे
हिरव्या कुरणातूनी चालती काळ्या डोहाकडे
झाकलूनी जळ गोड काळीमा पसरी लाटांवर
पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर “.
कविता शिकवता शिकवता आईनी तुला अचानक विचारले ….
” बाकी सगळ्या कविता सोडून आज हीच कविता का शिकवायला सांगितलिस रे ? ”
” म्हणजे ? ”
” ही कविता निराशेकडे झुकणारी आहे , उदास करणारी आहे असे अनेकांचे मत आहे , म्हणून अस विचारले .”
” बाई , अगदी खरं सांगतो . मला नाही वाटत तसं . एकवेळ उदास ठीक आहे . पण निराश नक्कीच नाही .”
” Interesting .”
” बाई , आणि यातला उदास हा शब्द ही मला नेहमीपेक्षा वेगळ्या अर्थाने योग्य वाटतो . समर्थ रामदास जसं उदास हा शब्द निराश अशा अर्थाने न घेता विरक्त अशा अर्थाने घेतात ना तसं .”
” शाब्बास .”
” बाई , आता या वयात मला असे वाटते की प्रत्येक आला क्षण अतिशय तन्मयतेने जगावा , कठीण क्षण असेल तर त्याला पूर्ण ताकदीने भिडाव . पण तो क्षण एकदा संपला की त्यात किँवा त्याच्या निकालात अडकूनपडू नये ”
” बाळा , इतकेच सांगते की ही कविता तुला पक्की कळली आणि वळली आहे .”
” बाई , ते मला माहीत नाही . पण त्यासाठी तुमचा आशीर्वाद असू द्या .”
तुला त्यादिवशी मी दारापर्यंत सोडायला आले तर तू अश्रू भरल्या डोळ्यांनी म्हणालास
” आज मला दोन औदुंबर दिसले …आप्पा आणि बाई ….तेही अगदी …
” पाय टाकूनी जळात बसला असला औदुंबर ” .
देवाशप्पथ खरं सांगते तुला पाठमोरा पाहाताना मी स्वतःशीच तुझे वर्णन असच करत होते ….औदुंबर
घरात आले तर आई म्हणाली …”.बेसनाचा लाडू असणारा माझा विद्यार्थी आता औदुंबर झाला आहे .”
औदुंबर ….
तुझी अप्रत्यक्ष सहाध्यायी सदैव राहू इच्छिणारी
स्वरा .
चन्द्रशेखर टिळक
७ मार्च २०१८.
Leave a Reply