भारतीय संस्कृतीमध्ये मंगलकार्यप्रसंगी कलशाला फार महत्त्व प्राप्त आहे. तांदळाच्या राशीवर ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढून कलशाची स्थापना केली जाते. त्यामध्ये गंगा जल आणि पंचरत्ने घालून पंचपत्रीने तो सुशोभित करतात. त्यावर नारळ ठेवला जातो व मग कलशाची पूजा केली जाते. गंध, अक्षता आणि फुले वाहून देवघरात कलश ठेवला असता सुख, समाधान आणि शांती प्राप्त होते. समुद्र मंथनातून बाहेर आलेले अमृत भरण्यासाठी विश्र्वकर्म्याने सर्व देवांमध्ये असलेल्या कलेचे ग्रहण करुन जे भांडे बनवले ते म्हणजे कलश होय अशी कथा पुराणात सांगितली आहे.
कळशी या भाड्याचा छोटा आकार म्हणजे कलश. कळशाचे भांडे पितळेचे अथवा तांब्याचे असते.
क्षितींद्र, जलसंभव, पवन, अग्नी, कोशसंभव, सोम, आदित्य आणि विजय असे कलशाचे विविध प्रकार आहेत. यापैकी विजय कलश पीठाचे मध्यभागी स्थापन केला जातो. अन्य कलश आठ दिशांना ठेवले जातात. कलशाच्या मुखाच्या ठिकाणी ब्रम्हा, गळ्याच्या ठिकाणी शंकर, मूलगामी विष्णू, मध्यभागी मातृकामण आणि दाही दिशांना वेष्टून दिक्पाल निवास करतात. कलशाचे पोटात सप्तसागर, सप्तव्दीप, ग्रहनक्षत्रे, कुलपर्वत, गंगा आणि चार वेद सामावले आहेत असे शास्त्रकार म्हणतात.
तांब्याच्या कलशात रात्री पाणी भरुन ते सकाळी उठल्यावर अनुशापोटी सेवन केले असता बध्दकोष्ठ नाहीसा होतो. तांब्याच्या कलशातील पाणी प्यायल्याने इतर अनेक विकारही दूर होतात.
Leave a Reply