लेखक जगन्नाथ कुंटे तथा स्वामी अवधूतानंद यांचा जन्म १५ मे १९४३ रोजी झाला.
शांतीच्या शोधात असलेल्या असंख्य भारतीयांना साद घालणाऱ्या नर्मदा परिक्रमेचे अचंबित करणारे अनुभव साध्या सोप्या भाषेत शब्दबद्ध करणारे लेखक जगन्नाथ कुंटे, तथा स्वामी अवधूतानंद हे ‘नर्मदे हर हर’ या पुस्तकामुळे प्रकाशात आले. कुंटे यांनी एक-दोनदा नव्हे, तर चार वेळा खडतर नर्मदा परिक्रमा केली होती.
आसक्ती-वासनांचा त्याग करून शांतीच्या शोधातील या यात्रेकरूने आध्यात्मिक लेखनाची वेगळीच शैली विकसित केली. त्यांचा जन्म कऱ्हाडमधील. अध्यात्माची ओढ लहानपणापासूनची. कतारमधील ‘गल्फ टाइम्स’मध्ये काही वर्षे नोकरी करून मायभूमीत परतल्यानंतर सुरू झाली त्यांची आगळी वेगळी शोधयात्रा. नर्मदेची साद आली, आणि ते परिक्रमेस निघाले. तीन वेळा परिक्रमा केल्यानंतर त्यांनी ‘नर्मदे हर हर’ हे पुस्तक लिहिले. या परिक्रमेत त्यांना आलेले अनुभव अत्यंत रोमांचक आणि अचंबित करणारे आहेत. लेखकपणाचा कोणताही आव न आणता फक्त घटनेशी भिडण्याच्या त्यांच्या शैलीने वाचक मंत्रमुग्ध झाले. त्यांचे काही चमत्कारांचे अनुभव बुद्धीला पटणारे नसले, तरी कुंटे यांची शोधक वृत्ती आणि मानवी स्वभावाची निरीक्षणशक्ती यांमुळे त्यांच्या पुस्तकाच्या चाहत्यांची संख्या वाढतच गेली.
‘नर्मदे हर हर’च्या २४ आवृत्या निघाल्या. यावरूनच त्याच्या लोकप्रियतेची कल्पना यावी. कधीही उठावे, घरात पत्नीला वंदन करून यात्रेस निघावे आणि तीन-चार वर्षांनी पुन्हा घरी यावे, हा त्यांचा परिपाठच झाला. आपल्या विलक्षण अनुभवांवर पुस्तके लिहिण्याचा परिपाठही त्यांनी रुजविला. ‘साधनामस्त,’ ‘नित्य निरंजन,’ ‘धुनी,’ ‘कालिंदी’ आणि ‘प्रकाशपुत्र’ ही पुस्तके त्यांच्या सिद्धहस्त लेखणीची साक्ष देतात. कुंटे हे उत्तम वक्तेही होते.
अध्यात्म आणि बुवाबाजी यांच्यात ते फरक करीत. बुवाबाजीवर त्यांनी सतत प्रहार केला. ‘अध्यात्म म्हणजे जीवनाचा विकास,’ असे ते मानत असले, तरी नर्मदा परिक्रमेमध्ये एकीकडे प्रसिद्ध महंतांच्या वागण्यातील फोलपणा आणि दुसरीकडे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या कार्याविषयी सहृदयताही कुंटे यांच्या लेखनातून प्रकटली आहे.
जगन्नाथ कुंटे यांचे ४ मार्च २०२१ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply