जयवंत दळवी यांचा जन्म १४ ऑगस्ट १९२५ रोजी झाला. जयवंत दळवी यांच्या कादंबऱ्या आणि नाटके पाहिली तर मानवी स्वभावाचे अनेक कंगोरे त्यात दिसतात. कोकणाकडील माणसे, त्याचे विचार, त्याचे आचार, त्याच्या मनातील सुप्त घालमेल आणि मानवी सम्बंध यावर प्रकाश पाडणाऱ्या व्यक्तिरेखा त्यांनी समर्थपणे उभ्या केल्या. त्यांची प्रत्येक कादंबरी वाचताना खूप काही जाणवते ते आपल्यामध्ये आहे पण ते निद्रिस्त अवस्थेत आहे. त्याच्या स्पर्श या कथासंग्रहातील कथा वाचताना मन थबयाकून जाते कारण प्रत्येक कथा मनाला थकवते, विचार करण्यास प्रवृत्त करते. जयवंत दळवी यांनी सुमारे २५ कादंबऱ्या लिहिल्या त्यात कवडसे, महानंदा,सारे प्रवासी घडीचे, चक्र, अधांतरी, अपूर्णांक ह्याचा समावेश आहे.
दळवींनी आठ नाटके लिहिली त्यात संध्याछाया, बॅरिस्टर, सूर्यास्त, पुरुष, नातीगोती यांचा समावेश आहे. त्यांनी चक्र, रावसाहेब, उत्तरायण, कवडसे हे चित्रपटही केले. त्यांच्या अनेक कादंबऱ्यांमध्ये एक वेड लागलेले पात्र अनेक वेळा असते असे दिसून आले आणि ह्याचा शोध घेणे हे वाचकाना जणू आव्हानच आहे असे मानावे लागेल. गंभीर असणाऱ्या जयवंत दळवी यांनी ‘ ठणठणपाळ ‘ नावाने मराठी साहित्यक्षेत्रात एक वेगळेच दालन उघडले.
जयवंत दळवी ठणठणपाळ या नावाने मराठी लेखकावर विनोदी पद्धतीने जे लिखाण केले की शेवट्पर्यंत हा ठणठणपाळ कोण याची उत्सुकता संपूर्ण मराठी साहित्यविश्वाला लागली होती. शेवटी ते नाव जेव्हा कळले तेव्हा सर्वजण आश्यर्यचकित झाले होते.
जयवंत दळवी माणसात फार मिसळत नव्हते परंतु त्यांची निरीक्षणशक्ती जबरदस्त होती. ते म्हणत भाजीबाजार ही अशी जागा आहे की तिथे सर्व प्रकारची माणसे बघता येतात. त्यांनी कधीच भाषणे केली नाहीत, अगदी अगदी शेवटच्या काळात एकदोनदा भाषणासाठी स्टेज चढले असतील.
अशा जबरदस्त लेखकाचे, नाटककाराचे १६ सप्टेंबर १९९४ रोजी निधन झाले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply