प्रभाकर पाध्ये यांनी पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटमधून अर्थशास्त्र विषयात एम.ए. पदवी मिळवली. पदवीनंतर त्यांनी मुंबईस परतून पत्रकारिता आरंभली. मो.ग. रांगणेकरांच्या ‘चित्रा’ साप्ताहिकात पाध्ये रुजू झाले. या साप्ताहिकातून पाध्यांनी राजकीय विषयांवर व्यासंगपूर्ण लिखाणास आरंभ केला. याशिवाय हरिभाऊ मोटे यांच्या ‘प्रतिभा’ साप्ताहिकात पाध्ये साहित्यिक घडामोडींवर लिहीत असत.
चित्रा साप्ताहिकातले त्यांचे लिखाण झाल्यावर ते १९३८ – १९४५ सालांदरम्यान ‘धनुर्धारी’चे संपादक होते. त्यानंतर १९४५ – १९५३ सालांदरम्यान ते ‘नवशक्ती’चे संपादक होते; परंतु फ्री प्रेस समूहाचे मालक एस. सदानंद यांच्याशी वैचारिक मतभेद उद्भवल्यावर ते नवशक्तीतून राजीनामा देऊन बाहेर पडले.
प्रभाकर पाध्ये १९५३-५४ मध्ये इंडियन कमिटी फॉर कल्चरल फ्रीडम या संस्थेचे चिटणीस, तर १९५५-५७ या काळात याच संस्थेच्या आशिया विभागाचे जनरल सेक्रेटरी होते. १९६७-७८ या काळात प्रभाकर पाध्ये सेंटर फॉर इंडियन रायटर्स या संस्थेचे संचालक होते. पत्रकारितेच्या जोडीनेच पाध्यांनी ललित साहित्यही लिहिले. त्यांची ‘मैत्रीण’ ही कादंबरी, ‘त्रिसुपर्ण’ हा दृष्टांतकथासंग्रह व अन्य चार कथासंग्रह प्रकाशित झाले. पाध्यांनी प्रवासवर्णने व समीक्षाही लिहिल्या. त्यांच्या ‘सौंदर्यानुभव’ या समीक्षापर ग्रंथाला साहित्य अकादमी पुरस्कार लाभला.
प्रभाकर आत्माराम पाध्ये यांचे २२ मार्च १९८४ रोजी निधन झाले.
आपल्या समूहातर्फे प्रभाकर आत्माराम पाध्ये यांना आदरांजली.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply