लेखक पुरुषोत्तम नागेश ओक उर्फ पु. ना. ओक यांचा जन्म २ मार्च १९१७ रोजी इंदोर येथे झाला.
पु.ना.ओक यांनी मुंबई विद्यापीठातून एम.ए आणि कायद्याची पदवी घेतली. काही काळ फर्ग्युसन महाविद्यालयात इंग्रजी शिकवले आणि त्यानंतर ब्रिटीश आर्मी जॉईन केली. दुसऱ्या महायुद्धात सिंगापूर मध्ये त्यांची पोस्टिंग होती. जेव्हा जपानने ब्रिटीश आर्मीला हरवले तेव्हा पु. ना. ओक सुद्धा युद्ध कैदी म्हणून जपान्यांच्या हाती सापडले. पुढे त्यांची भरती आझाद हिंद सेनेत केली गेली.
त्यांनी सांगितल्या आठवणीनुसार ते आझाद हिंद सेनेतला बहुतांश वेळ नेताजी सुभाषचन्द्र बोस यांचे असिस्टंट होते. तिथून त्यांची रवानगी जनरल जगन्नाथ भोसले यांचा ऑन फिल्ड असिस्टंट म्हणून करण्यात आली. त्यांनी आझाद हिंद रेडियोचे देखील काम सांभाळलं. दुसऱ्या महायुद्धात आझाद हिंद सेना ब्रिटिशांच्या विरुद्ध विजयी होऊ शकली नाही. नेताजींचे विमान कोसळले, आझाद हिंद सेनेची वाताहत झाली. युद्ध संपल्यावर पु.ना. ओक पायी चालत सिंगापूरहून अनेक देश, जंगले ओलांडून कोलकात्याला आले. १९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळालं. पु.ना ओक नी वार्ताहार म्हणून हिंदुस्तान टाईम्स, द स्टेटसमन अशा वृत्तपत्रांमधून काम केलं. पुढे माहिती आणि नभोवाणी मंत्रालयात अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली.
एवढेच नाही तर अमेरिकी दुतावासात देखील संपादनाचे काम केले. या दरम्यानच्या काळात भारतात इतिहास हा स्थानिकांच्यावर अन्याय करणारा लिहिण्यात आला आहे असे त्यांच्या निरीक्षणात आले. मग त्यांनी भारतीय इतिहासाचे पुनर्लेखन करायची जबाबदारी उचलली. आणि त्यांनी नवा इतिहास घडवलां… भारतीय इतिहास पुनर्लेखन संस्थेची स्थापना १९६४ साली केली. पुढे त्याचेच रुपांतर विश्व इतिहास पुनर्लेखन संस्थेत केले.
फक्त भारताचाच नव्हे तर जगाचा इतिहास पाश्चात्य लेखक आणी त्यांना धार्जिण्या भारतीय इतिहासकारांनी हिंदूच्या विरोधात लिहिला असे त्यांनी ठासून सांगितले. त्यांनी हिंदी आणि मराठी भाषेत अनेक पुस्तके लिहिली. यातले सर्वात प्रसिद्ध पुस्तक म्हणजे “ताजमहल नव्हे तेजोमहालय”
ताजमहल हा शहाजहानने बांधला नसून तो अग्रनगरच्या अग्रसेन महाराजांनी अग्रेश्वर महादेवासाठी बांधलेला तेजोमहालय आहे असे या पुस्तकाचे म्हणणे आहे.या पुस्तकातील बरीचशी पाने ताजमहाल शहजाहान ने कसा बांधला नाही यात खर्ची केली आहेत पण ज्या अग्रसेन महाराजांनी तेजोमहालय बांधल्याचा दावा ओक करतात त्याच्या बद्दल विस्तृत माहिती द्यायला ते कमी पडतात. फक्त शहाजहान पूर्वी ५०० वर्षापासून हे मंदिर अस्तित्वात होते असे त्यांनी सांगितले आहे आणि बाकी सर्व पुरावे मुघलानी, इंग्रजानी आणि त्यानंतर आलेल्या सेक्युलर सरकारांनी दडवले असा आरोप ते करत राहतात. या पुस्तकाबद्दल अनेक वाद झाले.
त्यात अनेक तज्ञ इतिहासकारांनी ऐतिहासिक पुराव्यांचा आधार देऊन ओक यांचा समज खोटा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना आणि त्यांचा इतिहास पटणाऱ्या लोकांनी त्याकडे लक्ष दिले नाही. अखेर हे प्रकरण सर्वोच्च न्यायलयात गेले.
तिथे झालेल्या सविस्तर चर्चेनंतर १३ जुलै २००० साली न्यायमूर्ती एस.पी.भरूचा यांच्या नेतृत्वाखालील बेंचने निर्णय दिला कि हि वास्तू तेजोमहल नसून ताजमहलच आहे. फक्त एवढे करून न्यायालय थांबले नाही तर विनापुरावा सर्वोच्च न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याबद्दल पु. ना. ओक यांची कानउघडणी केली.
पु. ना. ओक यांचे ४ डिसेंबर २००७ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply