विश्राम चिंतामण बेडेकर यांचा जन्म १३ ऑगस्ट १९०६ रोजी झाला. ते मूळचे अमरावतीचे. त्यांचे शिक्षण एम . ए . एल .एल . बी . पर्यंत झाले. त्यांनी ‘ ब्रह्मकुमारी ‘ हे नाटक लिहिले आणि ते बलवंत संगीत मंडळींना देण्यासाठी पुण्याला आले. ‘ बलवंत ‘ चे एक मालक चिंतामणराव कोल्हटकर यांना ते भेटले . त्यांनी ‘ बलवंत ‘ साठी ब्रह्मकुमारी हे नाटक बसवले. त्यातील गीते विश्राम बेडेकर यांनी लिहिली . त्यातील ‘ विलोपीले मधुमिलनात या ‘ हे पद आजही आका शवाणीवर लागते. ‘ ब्रह्मकुमारी ‘ चा पहिला प्रयोग पुण्यात जूनमध्ये झाला. याआधीच १९३२ मध्ये बोलपट सुरु झालेले असल्याने मराठी नाटकांना उतरती कळा लागली होती. १९३४ मध्ये दीनानाथ मंगेशकर आणि चिंतामणराव कोल्हटकर यांनी नाटककंपनीचे ‘ बलवंत पिक्चर्स ‘ मध्ये रूपांतर करून सांगलीत स्टुडिओ उभारला. बळवंत पिक्चर्स मध्ये चित्रपट प्रशिक्षण आणि अनुभव कुणालाच नव्हता . त्यामुळे २५ वर्षाचे तरुण विश्राम बेडेकर याना कोल्हटकरांनी लेखन आणि दिग्दर्शन करायला सांगितले. परंतु पहिला चित्रपट अपयशी ठरला. १९३५ च्या सुमारास व्ही. शांताराम यांच्यापासून सगळे पौराणिक चित्रपट काढत होते किंवा फॅन्टसी चित्रपट काढत होते . तेव्हा विश्राम बेडेकर यांनी ‘ सत्याचे प्रयोग व ठकीचे लग्न ‘ असा दुहेरी रेषेत जाणारा पहिला सामाजिक आणि विनोदी चित्रपट काढला. ठकीचे लग्न ही कथा राम गणेश गडकरी यांची तर सत्याचे प्रयोग याची कथा चि .वि. जोशी यांची. त्यामध्ये एकही गाणे नव्हते. त्यातील ‘ चिमणराव ‘ आणि ‘ तिंबूनाना ‘ ह्या दोन्ही भूमिका दामुअण्णा मालवणकर यांनी केल्या. मराठी भाषेतील हा पहिला सामाजिक विनोदी चित्रपट करण्याचे श्रेय विश्राम बेडेकर यांचे. परंतु हा चित्रपट फसला आणि त्यात ‘ बलवंत मंडळी ‘ संपली. परंतु ‘ बेडेकर प्रोडकशन्स ‘ ही संस्था त्या स्टुडिओत काढून १९३६ मध्ये ‘ लक्ष्मीचे खेळ ‘ चित्रपट दिग्दर्शित केला . परंतु त्यातही स्टुडिओ वाचला नाही , बंद पडला.
त्यांनतर विश्राम बेडेकर पटकथेच्या अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती मिळवून लंडनला निघून गेले . वर्षभरात परतल्यावर ‘ प्रभात ‘ स्टुडिओत व्ही. शांताराम यांचे सहाय्यक म्ह्णून राहिले. त्यांनी एक महिन्यात ‘ शेजारी ‘ या चित्रपटाची पटकथा लिहून दिली. शांतारामबापूंच्या दिग्दर्शनामुळे ‘ शेजारी ‘ चित्रपट चांगला गाजला. ह्या चित्रपटात विश्राम बेडेकरांना जे यश मिळाले ते पाहून बाबुराव पेंढारकरांनी त्यांना ‘ नवहंस ‘ साठी ‘ पहिला पाळणा ‘ या चित्रपटासाठी बोलवले. हा चित्रपट चांगला चालला परंतु ‘ नवहंस ‘ साठी दुसरा काढलेला चित्रपट ‘ पैसा बोलतो आहे ‘ साफ पडला.
पुढे विश्राम बेडेकर यांना पुन्हा प्रभातमध्ये बोलवले . प्रभातसाठी त्यांनी ‘ लाखराणी ‘ चित्रपट केला परंतु तो चालला नाही. ह्या चित्रपटात गुरुदत्त त्यांचे सहाय्यक होते. त्यानंतर त्यांनी ‘ फेमस ‘ साठी ‘ चूल आणि मूल ‘ आणि ‘ क्रांतिवीर वासुदेव बळवंत ‘ हे चित्रपट केले ते खूप चालले. विश्राम बेडेकरांनी ‘ होनाजी बाळा ‘ या नाटकावरून ‘ अमर भूपाळी ‘ लिहिला. विश्राम बेडेकर यांनी हिंदीत ‘ पिया का घर ‘ हा व. पु. काळे यांच्या ‘ कुचंबणा ‘ या कथेवर आधारलेला होता.
विश्राम बेडेकर यांचे ‘ एक झाड दोन पक्षी ‘ हे आत्मवृत्त खूप गाजले . हे पुस्तक मी जेव्हा वाचले तेव्हा त्यांना पत्र लिहिले होते पुढे त्यांती त्याला उत्तरही पाठवले. त्यांना मुबंईत साहित्य संमेलनात त्यांना पाहिले होते.
विश्राम बेडेकर यांची ‘ रणांगण ‘ ही कादंबरी खूपच गाजली. त्यांनी सुधीर फडके यांच्यासाठी ‘ सांवरकर या चित्रपटासाठी पटकथा लिहिली परंतु तो चित्रपट दुसऱ्याच पटकथेवर तयार झाला. पुढे ती पटकथा दोन भागात पुस्तकरूपाने आली. विश्राम बेडेकर ‘ टिळक आणि आगरकर ‘ हे नाटक लिहिले ते खूप गाजले. त्याचप्रमाणे त्यांनी ‘ वाजे पाऊल आपुले ‘ हे नाटक लिहिले तेही गाजले. त्यांनी एक नन्हीं मुन्नी लडकी थी , रुस्तम-ए -सोहराब , काबुलीवाला हे हिंदी चित्रपट केले. तर मराठीमध्ये , कृष्णार्जुन युद्ध , क्रांतीवीर वासुदेव बळवंत , चूल आणि मूल , ठकीचे लग्न , नारद-नारदी , पहिला पाळणा , रामशास्त्री , वासुदेव बळवंत , सत्याचे प्रयोग हे चित्रपट केले. त्यांच्या पत्नी मालती बेडेकर या सुप्रसिद्ध लेखिका होत्या.
विश्राम बेडेकर यांना ‘ एक झाड दोन पक्षी ‘ ह्या पुस्तकाकरिता साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला होता. त्याचप्रमाणे त्यांना विष्णुदास भावे पुरस्कार मिळालेला होता. १९८८ साली मुबंईत झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
विश्राम बेडेकर यांचे ३० ऑक्टोबर १९९८ रोजी निधन झाले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply