संस्कृतीचा पुजारी
विलासरावांच्या सहवासातून मला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू दिसले. उत्तम राजकारणी, उत्तम प्रशासक, प्रगल्भ विचारांचा माणूस, सहृदय मित्र अशी अनेक गुणवैशिष्ट्ये विलासरावांच्या ठायी होती. महाराष्ट्राच्या बहुजन समाजाची तसेच नागरी समाजाची उत्तम जाण असणारा नेता, सरपंचापासून ते मुख्यमंत्रिपदापर्यंतचा प्रवास आणि केंद्रीयमंत्रीपदापर्यंतची ही वाटचाल अत्यंत कष्टाची होती. त्यांनी केवळ महाराष्ट्रातच नाही तर दिल्लीच्या राजकारणातही मोठ्या परिश्रमपूर्वक पद्धतीने स्थान निर्माण केले. त्यांच्या या वाटचालीचा मराठी माणूस म्हणून नक्कीच अभिमान वाटत राहील. त्यांची ही कारकीर्द आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रत्येक मराठी माणसाच्या मनात सदैव घर करुन राहील.