समाजकार्य करताना आपण जे काम करतो आहे, व ज्यांच्यासाठी करत आहे त्यांच्याविषयी मनात प्रेम, आत्मीयता व स्थिरता हवी. निश्चलपणे व आजुबाजुला असलेल्या अडथळयांची तमा न बाळगता इतरांसाठी झटणारे समाजसेवक त्यांना पदच्युत करण्याचा प्रयत्न करणार्या व्यक्तींना अजिबात घाबरत नाहीत. त्यासाठी लागणारे असामान्य धैर्य, स्वतःच्या तत्वांवर असलेला प्रचंड आत्मविश्वास, इतरांसाठी काहीतरी भव्य-दिव्य करण्यासाठी लागणारी जिद्द व अखंड सेवाभाग या सर्व गोष्टी अंगी बाणवण्यासाठी मनात शुध्दता व शरीरात बळ हवं असतं. जरी सर्व धार्मिक संघटना समाजातील तळागाळातील लोकांसाठी काहीतरी करण्यासाठी झटतीलच असं नाही, परंतु आध्यात्मिक व धार्मिक प्रवचनांमुळे व सत्संगामुळे आपल्याला मनाला स्थैर्य मिळत, चंचलता कमी होते, आपल्या पुढचा मार्ग अगदी धुतलेल्या काचेसारखा चकचकीत दिसायला लागतो, जीवनाच्या निराशावादी, काळोख्या कप्प्यांमध्ये सुध्दा आशेचे काजवे चमचमायला लागतात, मनाला नवी उमेद व उभारी येते, इतरांची सेवा करताना कधीतरी डोकावणारे स्वार्थी व आत्मकेंद्रीत विचारसुध्दा बंद होतात, व प्रसिध्दीच्या आर्कषणापासून मनुष्य हळुहळू लांब होत जातो. […]