एच. जी. वेल्स हे वैज्ञानिक वाडमय लिहिणारे लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. टाईम मशीन ही त्यांची कादंबरी खूप गाजली. तिच्या कल्पनेवर चित्रपट निर्माण झाले. इनव्हीजिबल मॅन ही देखील तितकीच गाजलेली कादंबरी. ‘फर्स्ट मेन ऑन द मून’ आणि इतर वैज्ञानिक कथांमधून त्यांनी जणू कांही भविष्याचा वेधच घेतला. त्यांनी कल्पिलेल्या अनेक गोष्टी पुढे वास्तवांत आल्या. त्यांनी जगाचा इतिहासही लिहिला आणि आदर्श जग कसं असावं ह्याच्या कल्पनाही कथा कादंबऱ्यांतून मांडल्या. त्यांच्या अनेक कथाही लोकप्रिय झाल्या. ब्लाईंड मॅन, व्हॅली ऑफ स्पायडर, इ. कथांमधे कल्पना विलास तर आहेच पण बरोबरच शिकवण पण आहे. मॅजिक शॉप ही त्यांची जरा वेगळीच कथा. ह्या कथेत तर्कसंगत विचार करू पहाणाऱ्या बापाचा जादूवरला अविश्वास किंवा जादू म्हणजे युक्ती असे मत आणि त्याच्या लहान मुलाचा जादूवरला संपूर्ण विश्वास ह्या विरोधाभासावर कथा आधारीत आहे. बापाला आलेला अनुभव तर्कसंगत वाटत नाही. तो अजूनही त्यावर विश्वास ठेवू इच्छित नाही. त्याच्या तर्कनिष्ठेला धक्का तर बसलाय पण ते त्याला गैर वाटतय. मुलगा तेच सत्य म्हणून सहज स्वीकारतो. जेवढं आणि जसं आपण पहातो तसंच दुसरा पहात नाही. त्याची जाणीव वेगळ्या पातळीवरची असू शकते. ह्यात योग्य, अयोग्य कांही नाही.
पण आपली जाणीवच खरी व दुसऱ्याची चुकीची असा दुराग्रह असू नये. गोष्टीत जादूकडे वेगळ्या दृष्टीने पहाणारा लहान मुलगा त्याचाच असतो, म्हणून तो ते सहज स्वीकारतो, इतकेच. […]