दिएगो सालाझार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अभ्यासलेल्या, इथल्या सुमारे तेहतीस हजार सागरी सजीवांच्या अवशेषांत, शैवाल, मासे, मृदुकाय प्राणी, कणाधारी (पृष्ठवंशी) प्राणी, तसंच कणा नसलेले (अपृष्ठवंशी) प्राणी, अशा अनेक प्रकारच्या सजीवांचा समावेश होता. यांतील अनेक प्राणी हे खोल पाण्यात राहणारे सागरी जीव आहेत. या सागरी प्राण्यांच्या अवशेषांबरोबरच, या संशोधकांना इथे विविध प्रकारची सागरी वाळू आणि सागरी दगड-गोटे सापडले. इथे सापडलेल्या, काही ठिकाणच्या अवशेषांत मानवी हाडांचा, कोळशाच्या तुकड्यांचाही समावेश होता. माणसांनी दगडांपासून उभारलेल्या भिंतींचे अवशेषही इथे सापडले. या अवशेषांतील दगड हे ज्या प्रकारे कलंडले होते, त्यावरून या भिंती समुद्राकडून आलेल्या शक्तिशाली लाटेमुळे पडल्या असल्याचं दिसून येत होतं. या सर्व पुराव्यांवरून या सागरी प्रदेशावर त्सुनामीचं आक्रमण झालं असल्याचं स्पष्ट झालं. […]