देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे
कोणतीही निर्मिती होताना प्रत्यक्ष त्याचं साक्षिदार असणं, हा विलक्षण आनंदाचा भाग असतो. निर्मिती, मग ती कोणतीही असो, ती देखणीच असते असं मला वाटतं. माझ्या लहानपणी आमच्या घरासमोर एक सुतारकामाचा कारखाना होता. माझं लहानपण हे लहानपणी जसं असावं तसंच होतं, आतासारखं ते मोठ्यांसारखं झालेलं नव्हतं. अभ्यास, तोही चोख, शाळेच्याच वेळेत करायची पद्धत होती. तो एकदा केला, की मग पुढचे अनेक तास गंमतीचेच असतं. क्लास ह्या शब्दाचा जन्मही झाला नव्हता तेंव्हा. त्यामुळे अभ्यास हा शाळेतच करायचा असतो, असं तेंव्हा आम्हाला वाटे. शाळेचे दोन-पाच तास सोडले, तर रात्री झोपेपर्यंतचा वेळ हा मजेचाच होता. […]