प्राच्यविद्या पंडित, समाजसेवक व कुशल धन्वंतरी भाऊ दाजी लाड
भाऊंनी भारतभर दौरा करून हस्तलिखिते, शिलालेखांचे ठसे, दुर्मीळ चित्रं, नाणी, ताम्रपट, शस्त्रे इ. वस्तूंचा संग्रह केला. मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीचे ते सदस्य होते व पुढे उपाध्यक्ष झाले. वेगवेगळ्या परिषदांत त्यांनी प्राच्यविद्येच्या संदर्भात अनेक शोधनिबंध सादर केले. मुकुंदराज, हेमाद्री, हेमचंद्र इ. व्यक्तींचे तसेच कालिदासांचा कालनिर्णय आणि शिलालेख व ताम्रपट यावरील त्यांचे शोधनिबंध अभ्यासपूर्ण होते. माक्स म्युलर व रा. गो. भांडारकर यांनी या शोधनिबंधांविषयी गौरवोउद्गार काढले आहेत. कालिदासाचे कुमारसंभव व मेरुतुंगाचार्याचा प्रबंध, चिंतामणी हे ग्रंथ त्यांनी संपादित केले. तथापि त्यांनी लिहिलेला एकही स्वतंत्र ग्रंथ नाही. त्यांच्या मरणोत्तर रामचंद्र घोष यांनी द लिटररी रिमेन्स ऑफ भाऊ दाजी या शीर्षकाने त्यांचे संशोधनात्मक शोधनिबंध प्रसिद्ध केले. […]