सर्वांग परिपूर्ण सुखाची परिभाषा मेघदूतम् !
रसग्रहण हा तर मेघाच्या दृष्टीने एक वेगळाच विषय. मार्गात येणारी प्रत्येक नदी त्याची प्रेयसी आहे. त्याच्या विरहात ती रोडावली आहे. त्या प्रत्येकीचे पाणी (णि) ग्रहण करीत रसग्राही मेघ पुढे सरकत राहतो. पाथेय म्हणून कमलतंतु धारण करणारे राजहंस, कर्दळीच्या कळ्या खाणारे हरीण शावक, मकरंद ग्रहणाने धुंद झालेले भ्रमर या सगळ्या रसांच्या सोबत भगवान महाकालाच्या मंदिरात आणि हिमालयावर प्रत्यक्ष भगवान शंकरांच्या सानिध्यात ओसंडून वाहणारा भक्तिरस हा एक वेगळाच आनंदोत्सव आहे. […]