

सुप्रसिद्ध अभिनेते शम्मी कपूर यांचा जन्म २१ ऑक्टोबर १९३१ साली मुबंईत झाला. त्याच्या वडिलांचे नाव पृथ्वीराजकपूर होते आणि आईचे नांव रामशरनी कपूर होते.
त्यांचे वडील रंगमंच आणि चित्रपट कलाकार होते. त्यांचे दोन्ही भाऊ राजकपूर आणि शशी कपूर हे गाजलेले चित्रपट कलाकार होते.
त्यांचे बालपण पेशावर येथील कपूर हवेली आणि कोलकता येथे गेले. त्यांचे वडील कोलकाता येथे न्यू थिएटर स्टुडिओज मधून चित्रपटात कामे करत . मुंबईला आल्यावर त्यांचे शिक्षण न्यू ईरा स्कूल येथे झाले . पुढे ते रुईया कॉलेजमध्ये गेले. परंतु तेथे त्यांचे मन न लागल्यामुळे वडिलांच्या पृथ्वी थिएटरमध्ये ५० रुपये महिना पगारावर जुनिअर आर्टिस्ट म्ह्णून काम करू लागले . तेथे त्यांनी १९५२ पर्यंत काम केले. तेथे त्यांना शेवटचा चेक ३०० रुपयाचा मिळाला. त्यानंतर त्यांनी कारदार फिल्म्स मध्ये एक चित्रपट साईन केला . त्या चित्रपटाचे नांव होते ‘ जीवन ज्योती ‘ आणि माझी सहकलाकार होती चांद उस्मानी . त्या चित्रपटाचे दिग्दर्शक होते महेश कौल . त्यानंतर फिल्मिस्तानच्या नासिर हुसेन यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘ तुमसा नही देखा ‘ मध्ये काम केले. हा चित्रपट १९५७ साली आला. त्याच्याबरोबर त्या चित्रपटात नायिका होती अमिता. १९५९ साली आलेल्या ‘ दिल देके देखो ‘ या चित्रपटात त्यांची नायिका होती आशा पारेख. ह्या चित्रपटापासून त्यांची स्टायलिश प्ले-बॉय आणि प्रेमी हृदयाचा म्ह्णून इमेज निर्माण झाली.
१९६१ साली आलेल्या जंगली या चित्रपटाने त्याची इमेज बदलली आणि त्यांना एक आवाज मिळाला तो म्हणजे महंमद रफी यांचा. शम्मी कपूर आणि महंमद रफी हे एक वेगळेच रसायन बनून गेले होते. त्यांनी मधुबाला, नूतन, श्यामा , नलिनी जयवंत , आशा पारेख, सायराबानू , शर्मिला टागोर याच्याबरोबर कामे केली. ते म्हणतात मला शर्मिला टागोर आणि आशा पारेख यांच्याबरोबर काम करणे सोपे जायचे.
१९५५ साली त्यांचे गीता बाली बरोबर लग्न झाले. त्यावेळी गीता बाली चित्रपटात काम करत होत्या. शम्मी कपूर यांचे चित्रपट येत होते , यश मिळत होते . परंतु १९६५ मध्ये गीता बालीचे आजाराने निधन झाले. त्यावेळी त्यांना दोन मुले होती आदित्य राज आणि मुलगी कांचन . गीता बालीच्या निधनानंतर त्यांनी अनेक चित्रपट केले तीसरी मंझिल , बत्तमीज , लाट साहब, तुमसा नही देखा ,सिंगापूर , राजकुमार , काश्मीर की कली , चायना टाऊन , जानवर , ब्रह्मचारी असे अनेक चित्रपट केले. आजही त्याच्या चित्रपटाची गाणी लोकप्रिय आहेत.
त्यानंतर त्यांनी १९६९ मध्ये भावनगरच्या राजघराण्यातील नीला देवी यांच्याबरोबर विवाह केला. १९७२ नंतर त्यांनी वेगवेगळ्या भूमिका करायला सुरवात केली. त्यांनी ‘ संजीव कुमार आणि झीनत अमान यांना घेऊन ‘ मनोरंजन ‘ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता हा चित्रपट इर्माला ड्यूस वर आधारित होता परंतु तो फारसा चालला नाही. त्यांनतर त्यांनी प्रेमरोग, रॉक डान्सर , सेंसर , और प्यार हो गया , करीब , सँडविच असे अनेक चित्रपट केले.
अनेकांना माहीत नसेल की भारतात इंटरनेट पहिल्यांदा वापरणारे शम्मी कपूर होते. ते जेव्हा लंडनला गेले तेव्हा त्यांना लक्षात आले की आपणही आपल्या देशात करू शकतो. तेथील मोठ्या एका कंपनीने त्यांना भारतात एक स्पेशल लाईन दिली होती.
शेवटच्या सात वर्षात त्याच्या किडनी खराब झाल्यामुळे त्यांना आठवड्यातून तीनदा डायलेसिस करावे लागे. अशाच एक किडनी डे च्या दिवशी मी त्यांना भेटलो , गप्पा मारल्या , सुसाट नाचणारे शम्मी कपूर व्हील चेअरवर बघून खूप वाईट वाटले. एक दोनदा त्यांचा संदेश नेटवरून त्यांनी मला पाठवला होता , किडनी विकाराच्या संदर्भात होता तो , त्यांचे ग्रीटिंगही एकदा आले होते. कधी त्यांना भेटलो की महंमद रफीची आठवण निघाली की ते म्हणत ‘ वो तो मेरी आवाज थी ‘.
त्यांना बरेच पुरस्कार मिळाले १९६८ साली ब्रह्मचारी साठी उत्तम अभिनेत्याचे ‘ फिल्मफेअर ‘ अवॉर्ड मिळाले , तर १९८२ साली ‘ विधाता ‘ चित्रपटासाठी सहाय्यक अभिनेत्याचे अवॉर्ड मिळाले आणि १९९५ साली ‘ फिल्मफेअर ‘ चे लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळाले .
शेवटपर्यंत ते सगळ्यांच्यात मिसळत होते. त्याच्या पत्नी निलादेवी त्याच्याबरोबर नेहमी असायच्या . ७ ऑगस्ट २०११ रोजी त्याच्या शरीराचे अवयव निकामी होऊ लागले त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होते आणि १४ ऑगस्ट २०११ रोजी पहाटे त्यांचे मुबंईत निधन झाले. चित्रपटसृष्टीमधील एक झंझावात फक्त आता पडद्यावरच आपण पाहू शकू कारण शम्मी कपूर आता कायमचे काळाच्या पडद्याआड गेले होते.
— सतीश चाफेकर
Leave a Reply