‘संगीतभूषण’ पंडित राम मराठे म्हटले की अनेक नाटके, त्यांचे गाणे आठवते.
त्यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९२४ साली झाला. त्यांनी गायनाचार्य रामकृष्णबुवा वझे, मनोहर बर्वे , वामनराव सडोलीकर , मीराशीबुवा ,विलायत हुसेन खान साहेब ,गुणीदास जगन्नाथ बुवा पुराणिक आणि मास्तर कृष्णराव यांच्यासारख्या मातबरांकडून गायनाचे धडे घेतले. मंदारमला या नाटकासाठी त्यांनी अहीरभैरव , बैराग आणि जोगकंस ते राग सर्वप्रथम मराठी नाट्यसंगीतात आणले आणि यासाठीच त्यांना आदराने ‘ संगीतभूषण ‘ म्हणत असत .
एका दिवसात सौभद्र, सुवर्णतुला, स्वयंवर या तीन नाटकात तीन कृष्ण साकार करणे ही सोपी गोष्ट नव्हती ती त्यांनी केली. त्यांचे ‘ जय जय गौरीशंकर ‘ तर आजतगायत कुणीही विसरू शकत नाही. त्यांनी चित्रपटातून भूमिकाही केल्या त्यात व्ही. शाताराम यांचा ‘ माणूस ‘ चित्रपट आपण विसरू शकत नाहीत. त्यांतील रामभाऊचे काम आजही आपण विसरू शकत नाही. आजही त्यांची अनेक नाट्यगीते आकाशवाणी वर ऐकावयास मिळतात. सतत नाटके , सतत गाण्याच्या मैफली करून माणूस थकतो मानवी शरीरं थकते तसे पंडितजीचे झाले. ते आपल्या गाण्यात हरवून जात .
त्यांना महाराष्ट्र सरकारचा ‘ संगीतभूषण ‘ पुरस्कार मिळाला होता त्याचबरोबर विष्णुदास भावे , नाट्यदर्पण पुरस्कार मिळाला होता. तसे अनेक पुरस्कार मिळाले होते .लौकिक दृष्ट्या काही पुरस्कार त्यांना द्यायला हवे होते , अत्यंत सामान्य वकूब असणाऱ्या माणसांना ‘ पदम ‘ पुरस्कार खिरापतीसारखे वाटले जात असताना त्यांच्यासारख्या जातिवंत कलाकाराला वंचित रहावे लागले हे मराठी नाट्यसंगीताचे दुर्देव म्हणावे लागेल.
पंडित रामभाऊ मराठे आमच्या ठाण्यात पूर्व विभागात रहात असत त्यांचा तेथे छोटा बंगला आजही तो तेथे आहे. त्यांची मुले संजय आणि मुकुंद, त्यांची मुलगी हेही उत्तम गायक आहेत आणि त्यांच्या पुढच्या पिढीकडे हा वारसा चालत राहिला आहे हे महत्वाचे. ते खऱ्या अर्थाने संगीत भूषण होतेच तसेच त्यांचे नाव आजही ठाणे शहरासाठी भूषणास्पद आहे. आमची पिढी खूप भाग्यवान होती की आम्हाला त्यांना बघता आले .
अशा ह्या अलौकिक ‘ संगीतभूषण ‘ राम मराठे यांचे ४ ऑक्टोबर १९९८ रोजी निधन झाले.
— सतीश चाफेकर
Leave a Reply