काही व्यक्तींमध्ये कलाकार हा कुठल्यातरी कप्प्यात दडून बसलेला असतो, योग्य संधी मिळाली की तो स्वत:चं रुप प्रगट करतो, आणि त्या व्यक्तीला ही जाणीव होताच, त्याची कारकीर्द त्या दिशेनं वळू लागते, घडू लागते, पुढे फुलून त्या कलेला बहर पसरतो व कलाकार म्हणून ती व्यक्ती लौकिक मिळवते आणि सातासमुद्रपार सुद्धा चाहते निर्माण करते. अर्थात यासाठी त्या व्यक्तीचं व्यक्तीमत्व तितकचं “आपलसं आणि आपल्यातलंच” वाटतं तेव्हा त्याची लोकप्रियता वाढत राहते. अशीच प्रचिती आली संदीप लोखंडे या तरुणाशी बोलताना. स्टॅण्डअप कॉमेडियन, मिमिक्री आर्टिस्ट, निवेदक आणि स्वत:तील अभिनयाचे पैलू त्यांनी “शेअर” केले मराठीसृष्टी.कॉम शी केलेल्या या बातचीत मधून……..
लहान असताना दादा कोंडकेंचा “मुका घ्या मुका” हा सिनेमा मी पहायला गेलो. त्यावेळी दादांच्या आवाजाची, आणि त्यांच्या बोलण्याच्या लकबीची खूप अप्रुपता वाटत असे. तेव्हा तोच आवाज मी काढू लागलो पुढे अनेक कलाकारांचे चित्रपट पाहून त्यांच्या आवाजांच्या नकला करण्याचा प्रयत्न करु लागलो. अर्थात त्यासाठी सातत्य ठेवलं गेल्यामुळे हळुहळू आवडही निर्माण झाली व मी या फिल्ड मध्येच कारकीर्द घडवू शकतो असा विश्वास निर्माण झाल्याचं संदीप म्हणतो. अर्थात त्यासाठी प्रयत्नांची बरीच पराकाष्टा करावी लागल्याचं त्याने सांगितलं. कारण घरातून कोणीही या क्षेत्रात नसल्यामुळे “आवाजाची बाराखडी” इथपासून सुरुवात करावी लागली होती. “मिमीक्री डबिंग” साठी एक नवं विश्व संदीपची वाट पाहत होतं. कोणत्याही कलाकाराच्या आवाजाला, अन् कोणत्याही पट्टीत बोलावं लागलं तरी संदीपचा आवाज त्याला मॅच होत गेला, इतका की जणू त्या कलाकाराचा हुबेहुब आवाज वाटावा.
कोणत्याही माध्यमाला साजेल अशा भारदस्त आवाजाचं कोंदण संदीपच्या आवाजाला लाभलय. रेडिओ, डबिंग, मिमीक्री, सूत्रसंचालन तसंच थिएटर या प्रांगणात आवाजाची छाप उमटवल्यामुळे त्याचं बोलणं हे आपल्या आयुष्याशी निगडीत आहे असं कायम वाटत राहतं. त्याचबरोबर, सदैव प्रसन्न व्यक्तीमत्व आणि कोणत्याही परिस्थितीला अनुसरुन सहज मिसळणं या गुणामुळे एका कलाकाराचं व्यक्तीमत्वही त्याच्याशी बोलताना जाणवतं.
आत्तापर्यंत मिमीक्री आर्टिस्ट म्हणून अनेक शोज देश-परदेशात संदीप लोखंडे याने केले असून, त्यामुळे “स्टॅण्डअप कॉमेडियन” म्हणून त्याची अनोखी ओळखही निर्माण झाली आहे. हे सर्व शोज हिंदीत असून त्या निमित्ताने, “मराठी टॅलेण्ट” जगाच्या कानाकोपर्या पर्यंत पोहोचलं एवढं मात्र नक्की. “हिंदी वर किती मेहनत घ्यावी लागली” या प्रश्नावर संदीप उत्तरतो की, “जवळपास प्रत्येक हिंदी चित्रपट मी पाहत राहिलो तसंच त्याचा अर्थ समजून घेऊन, ते सतत बोलण्याचा प्रयत्न करायचो, यामुळे आपसूकच हिंदी भाषेची गोडी वाढत गेली त्यामुळे मी उत्सफूर्तपणे बोलू शकतो,” असं विनम्रतेने संदीप सांगतो.
“वन मॅन शो” ची थीम असल्यामुळे खूपच प्रयोगशील राहता येतं. तसंच कल्पकतेला वाव मिळतो, त्याचप्रमाणे प्रेक्षक कोणत्या वयोगटाचा आहे, कोणत्या ठिकाणचा आहे या बाबींचा विचार करुन सुद्धा कार्यक्रमाची आखणी करत असल्याचंही नमूद करतो, त्यामुळे संदीपच्या कार्यक्रमात वैविध्याचा नजराणा पहायला मिळतो.
संदीपच्या आकर्षक व्यक्तीमत्वामुळे दूरचित्रवाणीवर काम करण्याची संधी त्याला प्राप्त झाली, “मोगरा फुलला” या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन असो, किंवा “झी टॉकीज” चा आला आला सिनेमावाला, या दोन्ही कार्यक्रमातून एक उत्कृष्ट निवेदक आणि दुसरीकडे मिमीक्रीचा अगदी खुबीने त्याने वापर केला. पण सर्वात जास्त संदीप रमला ते म्हणजे हिंदीतच.
“भविष्यात आवाजावर विविध प्रयोग करुन, सातत्याने लोकांचं मनोरंजन कसं होईल, यावर कटाक्ष असेल” असं संदीप विचारलेल्या प्रश्नावर उत्तरतो.
“स्टॅण्डअप कॉमेडियन” व “मिमीक्री आर्टिस्ट” असलेल्या संदीप लोखंडेचा अनेक पुरस्कारांनी सन्मान झाला असून १९९९ साली मुंबई विद्यापीठातर्फे आयोजित आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत सर्वोत्कृष्ट नकलाकार म्हणून “सुवर्ण पदक” मिळवणारा संदीप लोखंडे हा पहिला मानकरी ठरला आहे. आपला भारदस्त आवाज व बोलण्यातला लाघवी स्वभाव, विनोदी शैलीतून रसिकांचं मनोरंजन करणार्या संदीप लोखंडेचं नाव इथून पुढेही प्रेक्षकांना खिळवून ठेवेल, यात काहीच शंका नाही.
Leave a Reply