नवीन लेखन...

आवडणारे गंध

जास्तीत जास्त लोकांना आवडणारा गंध कोणता असावा, हा संशोधकांच्या दृष्टीनं उत्सुकतेचा प्रश्न आहे. कारण या एका प्रश्नात तीन प्रश्न दडलेले आहेत. हे तीन प्रश्न म्हणजे – एखाद्या व्यक्तीची विशिष्ट वासाची आवड ही, ती व्यक्ती ज्या संस्कृतीत वाढली त्या संस्कृतीनुसार ठरते का? वासाची आवड जगभर सारखीच असते का? वासाची आवड ही, तो वास निर्माण करणाऱ्या रसायनाच्या रेणूवर अवलंबून असते का? हे तीनही प्रश्न तसे एकमेकांत गुंतलेले आहेत. स्वीडनमधील कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटमधील आर्तिन अर्शामिआन आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा यशस्वी प्रयत्न आपल्या संशोधनाद्वारे केला आहे. गंधांवरचं हे संशोधन ‘करंट बायोलॉजी’ या शोधपत्रिकेत अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. संख्याशास्त्राचा आधार घेणाऱ्या या संशोधनातून निघालेले निष्कर्ष लक्षवेधी ठरले आहेत.

आर्तिन अर्शामिआन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या संशोधनासाठी, जगातील वेगवेगळ्या संस्कृतींतल्या आणि वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीतल्या जवळजवळ तीनशे लोकांची निवड केली. निवड झालेले लोक हे विविध प्रदेशातले होते – अगदी वाळवंटी प्रदेशापासून ते उष्णकटिबंधीय वर्षावनांपर्यंत, तसंच समुद्रकिनाऱ्यापासून ते उंचावरच्या ठिकाणांपर्यंत… यांतील काही लोक शहरी होते, काही लोक ग्रामीण भागातले होते, तर काही लोक अगदी वन्यप्रदेशातले होते… काही लोक शिकारीवर जगणारे होते, तर काही लोक हे शेती किंवा मासेमारीवर उदरनिर्वाह करणारे होते. यांत थायलंडच्या मलाय द्वीपकल्पावरील जंगलातल्या सेमाक बेरी, मानिक, तसंच मेक्सिकोतील सेरी, इक्वेडोरमधील चाची, यासारख्या नऊ वेगवेगळ्या जमातींचा समावेश होता. अभ्यासलेला दहावा गट हा अमेरिकेतल्या न्यूयॉर्क या महानगरात राहणाऱ्या लोकांचा होता.

या संशोधनासाठी निवडलेले गंध चांगले-वाईट असे, वेगवेगळ्या प्रातिनिधिक प्रकारचे होते. तसंच हे गंध निर्माण करणाऱ्या रेणूंच्या रासायनिक रचनासुद्धा गंधांच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या स्वरूपाच्या होत्या. या गंधांत आयसोव्हॅलिरिक आम्ल (आंबलेल्या पदार्थांना येणारा वाईट वास), डायइथिल सल्फाईड (लसणाचा किंवा कांद्याचा तीव्र वास), कॅप्रिलिक आम्ल (दूग्धजन्य पदार्थांचा वास), गॅल्बाझाइन (भाजकट वास), मशरूम अल्कोहोल (अळंब्यांचा वास), फेनेथिल अल्कोहोल (ऑलिव्ह तेलाचा वास), इथिल ब्युटिरेट (ताज्या फळांचा गोडसर वास), युजेनॉल (मसालेदार वास), लिनालून (फुलांचा वास) आणि व्हॅनिलिन (व्हॅनिलाचा वास), अशा एकूण दहा वेगवेगळ्या गंधांचा समावेश केला होता.

आपल्या संशोधनासाठी लागणारी माहिती, आर्तिन अर्शामिआन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रत्यक्ष त्या-त्या ठिकाणी जाऊन मिळवली. संशोधनात भाग घेणाऱ्या लोकांना, कुप्यांमध्ये ठेवलेले वेगवेगळ्या गंधांचे अर्क कोणत्याही विशिष्ट क्रमानं न देता, यादृच्छिक पद्धतीनं दिले जाऊन ते हुंगायला सांगितलं गेलं. प्रत्येकानं एका अर्काचा दोन ते तीन सेकंद वास घ्यायचा व त्यानंतर या वासाचा परिणाम जाण्यासाठी सुमारे वीस सेकंद थांबायचं. नंतर दुसऱ्या अर्काचा दोन ते तीन सेकंद वास घ्यायचा आणि पुनः वीस सेकंद थांबायचं. अशा प्रकारे या सर्व दहा अर्कांच्या वासाची ओळख करून घेतल्यानंतर, आपल्या आवडीच्या वासांनुसार या वासांचा क्रम लावायचा. हा क्रम लावताना मात्र, कोणत्याही अर्काचा पुनःपुनः हव्या त्या पद्धतीनं वास घेण्याची या लोकांना मुभा होती. वासांचा आवडीनुसार क्रम हा दोनपैकी कुठल्या तरी एका प्रकारे नोंदवायचा होता. यांतली एक पद्धत, एक (सर्वांत आवडता वास) ते दहा (सर्वांत कमी आवडणारा वास), अशी आकड्यांवर आधारलेली होती. दुसरी पद्धत, निळा (सर्वांत आवडता वास) ते लाल (सर्वांत कमी आवडणारा वास), अशी रंगांवर आधारलेली होती.

या सर्व पाहणीतून जमा झालेल्या माहितीचं आर्तिन अर्शामिआन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तपशीलवार संख्याशास्त्रीय विश्लेषण करून, कोणते घटक वासांच्या आवडीनिवडीवर परिणाम घडवून आणतात ते अभ्यासलं. या विश्लेषणात, वासांच्या आवडीवर असणारा त्या-त्या संस्कृतीचा प्रभाव, वासांच्या आवडीवर असलेला वैयक्तिक आवडीनिवडीचा प्रभाव आणि एखादा वास निर्माण करणाऱ्या रेणूच्या रचनेचा त्या वासाच्या आवडीवर असलेला प्रभाव, या तीन गोष्टी अभ्यासल्या गेल्या.

या अभ्यासावरून निघालेल्या निष्कर्षांतला अनपेक्षित भाग म्हणजे, संस्कृती बदलली तरी वासांची आवडनिवड फारशी बदलत असल्याचं दिसत नव्हतं. संस्कृती आणि वासांची आवडनिवड यांचा संबंध असण्याची शक्यता फक्त ६ टक्के इतकीच आढळली. याउलट, वासांचा वैयक्तिक आवडीनिवडीशी संबंध असण्याची शक्यता सुमारे ५४ टक्के इतकी मोठी होती. त्याचप्रमाणे गंध निर्माण करणाऱ्या रेणूंची रासायनिक रचना आणि एखाद्याला तो वास आवडणं, या दोन गोष्टींचा संबंध असण्याची शक्यता हीसुद्धा सुमारे ४१ टक्के इतकी होती. या सर्व विश्लेषणावरून एक गोष्ट स्पष्ट होत होती. ती म्हणजे वासाच्या आवडीनिवडीचा, एखादी व्यक्ती कोणत्या संस्कृतीत, कोणत्या प्रदेशात वाढली याच्याशी संबंध नसतो. ही आवडनिवड वैयक्तिक असते आणि त्याचबरोबर ही आवडनिवड तो गंध ज्या रेणूपासून निर्माण झाला, त्या रेणूच्या रासायनिक स्वरूपावरही अवलंबून असते. त्यामुळे, काही विशिष्ट प्रकारची रचना असणारे रेणू गंधाच्या दृष्टीनं सुखावह वाटतात, तर काही विशिष्ट प्रकारची रचना असणारे रेणू हे गंधाच्या दृष्टीनं नकोसे वाटतात. या विश्लेषणात आणखी एक महत्त्वाची गोष्ट दिसून आली. ती म्हणजे, आपापल्या आवडीनुसार सर्वांनी लावलेला गंधांचा क्रम हा जवळपास सारखाच होता. वासांची आवड ही जगभर जवळपास सारखीच असल्याचं यावरून स्पष्ट होत होतं.

अनेकदा एखाद्या विशिष्ट प्रदेशात लोकप्रिय असणाऱ्या एखाद्या पदार्थाचा वास हा दुसऱ्या प्रदेशातील व्यक्तीला नकोसा वाटतो. त्यामुळे वासांची आवडनिवड ही संस्कृतीनुसार वेगवेगळी असणं अपेक्षित होतं. असं असतानाही, जगभरच्या विविध संस्कृतींत संशोधकांना आढळलेलं वासांच्या आवडीबद्दलचं हे अनपेक्षित साम्य, वासांची आवड ही माणसाच्या सर्वांगी जनुकीय जडणघडणीशी संबंधित असण्याची शक्यता दाखवतंं. कदाचित, मानव उत्क्रांत होताना केव्हा तरी, त्याला जगण्याच्या दृष्टीनं काही वास उपयुक्त ठरले असावेत व त्यानुसार अशी जनुकीय घडण निर्माण झाली असावी. आर्तिन अर्शामिआन आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आता एखादा गंध सर्वांनाच प्रिय असण्यामागचं कारण शोधण्याचीही आवश्यकता भासते आहे. कारण एखादा गंध आवडतो की आवडत नाही हे ठरवण्यात, गंध निर्माण करणाऱ्या रेणूची रासायनिक रचनासुद्धा महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं या संशोधनात दिसून आलं आहे. त्यामुळे, अशा प्रत्येक गंधाच्या रेणूचा मेंदूवर होणारा परिणाम वेगवेगळा असावा. आर्तिन अर्शामिआन आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा आता पुढचा अभ्यास असेल तो, एखादा विशिष्ट गंध निर्माण करणारे रेणू मेंदूवर कोणता विशिष्ट परिणाम घडवून आणतात, यावरचा.

आता जाता जाता पुनः पहिल्या प्रश्नाकडे… जास्तीत जास्त लोकांना आवडणारा गंध कोणता? या दहा गंधांत जास्तीत जास्त आवडता गंध म्हणून पहिला क्रमांक पटकावला तो व्हॅनिलिननं. व्हॅनिलिन म्हणजे आइस्क्रीम किंवा तत्सम पदार्थांद्वारे आपल्याशी जवळची ओळख असणाऱ्या व्हॅनिलातलं संयुग. एकमेकांपासून अतिदूर आणि वेगवेगळ्या परिस्थितीत राहात असूनही, अनेकांनी व्हॅनिलिनच्या वासाला पहिली पसंती दिल्याचं दिसून आलं. किंबहुना या संशोधनात भाग घेणाऱ्या बऱ्याच जणांनी व्हॅनिलिनचा म्हणजे व्हॅनिलाचा वास या अगोदर कधी घेतलाही नसेल. तरीही व्हॅनिलिनचा वास बहुतेकांना आवडला. व्हॅनिलिननंतरचा क्रमांक होता इथिल ब्युटिरेटचा – म्हणजे ताज्या फळांच्या गोडसर वासाचा. त्यानंतर तिसरा क्रमांक लागला तो लिनालूलचा म्हणजे फुलांसारख्या वासाचा. या जवळपास सर्वमान्य असणाऱ्या गंधक्रमात सर्वांत शेवटच्या क्रमांकावर राहिलं ते, आंबलेल्या पदार्थांना येणाऱ्या घामट वासाचं आयसोव्हॅलिरिक आम्ल!

चित्रवाणीः 

–डॉ. राजीव चिटणीस.

छायाचित्र सौजन्य: pixabay.com Sunil Elias/Wikimedia

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..