नवीन लेखन...

उपलब्ध पाणी हे कोकण विकासाला सहाय्यक ठरू शकेल काय?

आपल्याजवळ काय नाही याची चिंता करत बसण्यापेक्षा आपल्याजवळ काय आहे, त्याचा आपण आपल्या विकासाठी कसा वापर करू शकतो हे उचित ठरणार नाही का? एक पर्यटनस्थळ निर्माण करणे म्हणजे किमान 100 लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे होय. हा झाला प्रत्यक्ष रोजगार. यापेक्षाही अप्रत्यक्ष रोजगार तर अमाप असतो.

 

कोकणाच्या आर्थिक प्रगतीचा अभ्यास करण्याआधी कोकणाची काही खास वैशिष्ट्ये अभ्यासणे आवश्यक ठरेल.

(1) सह्याद्रीचे डोंगर आणि अरबी समुद्र यांच्यामध्ये निर्माण झालेल्या चिंचोळ्या पट्टीत कोकण बद्ध झाले आहे. ते पालघर, ठाणे,  मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात विभाजित झाले आहे. या चिंचोळ्या पट्टीची रुंदी फक्त 40 ते 50 किलोमीटर एवढीच आहे. पण खास वैशिष्ट्य म्हणजे या चिंचोळ्या पट्टीचेही तीन भाग पडतात. डोंगराचा अत्यंत उतार, मध्य उतार आणि सपाट  जमीन असे ते तीन भाग होत. पर्यावरणाच्या दृष्टीने सहा जिल्हे आणि तीन भाग असे एकूण अठरा भाग पडतात. नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे हे पंधरा भाग पर्यावरणशास्त्राच्या दृष्टिकोनातून एकमेकापेक्षा पूर्ण अलग आहेत. त्यामुळे या संबंधात कोणताही विचार करताना एखादे तत्त्व सर्वांना एकत्र लावणे शक्य होत नाही. समुद्रसपाटीपासून डोंगरमाथ्यापर्यंतचा उतार हा जवळपास 1000 मीटरचा आहे.

(2) पूर्ण कोकणाचे क्षेत्रफळ 30394 चौरस किलोमाटर आहे. उत्तरेपासून थेट दक्षिणेपर्यंत एकूण 720 किलोमीटरचा हा प्रदेश आहे. रुंदीचा उल्लेख वर आलेलाच आहे. ती 40 ते 50 किलोमीटर इतकी आहे. भूगर्भ मात्र विविध भागात विविध स्वरूपाचा आहे. काही भागात लाव्हा रसापासून तयार झालेले कठीण खडक आहेत तर काही ठिकाणी लॅटेराइट मातीचे, गाळाच्या मातीचे तर नद्यांच्या  मुखापाशी रेतीचे जास्त प्रमाण आढळते. दापोलीपासून वरच्या भागात लाव्हा रसापासून बनलेल्या खडकांचा  भूगर्भ आहे तर त्यांचे खाली जांभ्या खडकांचा भाग जास्त आहे. जमिनीत पाणी मुरण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाचे वैशिष्ट्य वेगवेगळे आहे.

(3) कोकणात एकूण मोठ्या 22 नद्या वाहतात. सर्वांचा उगम सह्याद्रीच्या रांगांमधून होतो आणि त्या सर्व अरबी समुद्राला मिळतात. सर्व नद्या डोंगराळ प्रदेशातून वाहात असल्यामुळे त्यांची खोली जास्त आहे. पण भारताच्या उत्तरेकडे वाहात असलेल्या नद्यांना जसे विशाल खोरे लाभले आहे तसे इथे आढळून येत नाही. 1000 मीटर उंचीवरून वेगाने येणारे पाणी तितक्याच वेगाने समुद्रात जाते, त्यामुळे भूजल पातळीला त्याचा कोणताही लाभ मिळत नाही. कोकणाची संपूर्ण रुंदीच 40-50 किलोमीटरची असल्यामुळे साहाजिकच नद्यांची लांबीही अत्यंत कमी आहे. नदी जेव्हा समुद्राला मिळते तिथे जो त्रिभुज प्रदेश तयार होतो तोही प्रत्येक ठिकाणी छोटा आढळतो. पावसाचे सर्व पाणी वेगाने वाहून जात असल्यामुळे जवळपास सर्वच नद्या उन्हाळ्यात कोरड्या पडतात. काही नद्यांच्या डोहात मात्र पाणी आढळते. तेही आता उत्तरोत्तर कमी होत आहे. पडणाऱ्या पावसाच्या जवळपास 99 टक्के पाणी वाहून समुद्राला मिळते. ‘दैव देते आणि कर्म नेते’ ही म्हण इथे तंतोतंत लागू पडते.

(4) पावसाचे पाणी वेगाने वाहून जात असल्यामुळे ते भूजल पातळी वाढविण्यास उपयुक्त ठरत नाही याचा उल्लेख आधी आलेलाच आहे. भूजलाच्या पातळीत मोसमाप्रमाणे खूपच चढउतार आढळतात. पावसाळ्यात ओसंडून वाहात असलेल्या विहिरी उन्हाळ्यात चक्क कोरड्या पडतात. त्यांना बारमाही पाणी नसल्यामुळे त्याचा शेतीवर विपरीत परिणाम जाणवतो. बारमाही शेती त्यामुळे शक्य होत नाही. ही एक मोठीच मर्यादा समजायला हवी. खरीप हंगामात सपाट जमिनीवर तांदळाचे पीक प्रामुख्याने घेतले जाते. तर अति उतारावर नाचणी व बाजरी ही पिके घेतली जातात. फळबागांवर जास्त लक्ष दिले जाते. आंबा, काजू, नारळ, सुपारी, आवळा, अननस, चिकू ही फळपिके प्रामुख्याने घेतली जातात. रब्बी हंगामात प्रामुख्याने दालवर्गीय पिके घेतली जातात. जमिनीतील ओल आणि दव यांचे भरवशावर ही पिके येतात. जमिनीचा हलका पोत आणि जास्त तापमान यामुळे मसालावर्गीय पिके, कॉफी. चहा, रबर यासारखी पिके घेता येत नाहीत. यात आता पुन्हा हवामान बदलाचे संकट उभे ठाकले आहे. अवेळी येणाऱ्या पावसाने फळबागांना येणारा बार कमी झाला आहे. गळती खूपच वाढली आहे. त्यामुळे फळबाग उद्योग संकटात सापडला आहे. येथील शेतकरी कष्टाळू आहे पण निर्माण झालेल्या शेतमालाला योग्य किंमत मिळत नसल्यामुळे त्याचे सर्व प्रयत्न विफल होतात. वाहतुकीचा योग्य विकास न झाल्यामुळे मुंबईसारखी बाजारपेठ उशाशी असून सुद्धा तिचा लाभ घेता येत नाही.

(5) स्थलांतर हा कोकणाला लागलेला मोठा शाप आहे असे म्हणावे लागेल. लोकसंख्येचा कार्यशील हिस्सा हा मुंबईकडे जातो आणि वयस्कर लोक व महिला यांचे प्रमाण सर्वत्र जास्त आढळते. काम करायला मजूर अभावानेच आढळतात. मी कोकणात एका ठिकाणी भाषणानिमित्त गेलो असताना सर्वसाधारण मजुरी 500 ते 600 रुपये आहे असे कळले. याशिवाय कामावर आल्याबरोबर पेज, दुपारचे जेवण, दुपारचा चहा हाही दिला जातो. शिवाय काम संपल्यावर ताबडतोब रोखीने मजुरी द्यावी लागते. आणि मी कामावर आलो म्हणजे तुमच्यावर उपकार केले आहेत हा भाव चेहेऱ्यावर बघावा लागतो. स्थानिक मजूर उपलब्ध नसल्यामुळे परप्रांतातून मजूर येतात. त्यात नेपाळी मजुरांचा भरणा जास्त आढळतो.

(6) शेतजमिनीची स्थिती तर फारच गंभीर असलेली दिसते. कुटुंबातील सदस्य नोकरीनिमित्त जरी बाहेरगावी जात असले तरी ते गावातील जमिनीवरील आपला हक्क सोडत नाहीत. त्याच्या मुळे एकेका सातबारावर जमिनीचा तुकडा छोटा असला तरीही 40-50 नाव असतात. यावरून मला ‘मुळशी पॅटर्न’ या सिनेमाची आठवण आली. शेवटी तो गोळी मारणारा मुलगा म्हणतो, ‘मी तो चाळीसावा सही करणारा.’ कुटुंबातील जो माणूस शेती सांभाळतो त्याला शेतीशिवाय हा सर्व लवाजमा सांभाळावा लागतो व शेती कसण्यातील त्याचा हुरूप संपुष्टात येतो. यामुळे दीर्घकालीन विकास होणे सर्वथैव अशक्य होते. त्यामुळे शेतीत दीर्घकालीन सुधारणा अभावानेच आढळतात.

(7) कोकणात मंदिरांची संख्या भरपूर आहे. जवळपास सर्वच मंदिरांच्या परिसरात तलाव आहेत. हे तलाव पिण्याच्या पाण्याची गरज भागवतात. त्याचबरोबर बरेचसे तलाव सिंचनाच्या कामासाठी वापरले जातात. या तलावांद्वारे भूजल पुनर्भरणही होते. विकासाचे वारे लागल्यावर कोकणात सरकारने बरीच धरणे बांधण्याचा प्रयत्न केला. पण हा सर्व आतबट्ट्याचा व्यवहार ठरला. बरीचशी धरणे 6000 कोटी पेक्षा जास्त खर्च होऊनही अपूर्णावस्थेत आहेत. त्यांच्या क्षमतपैकी फक्त 20 ते 25 टक्के पाणीच फक्त अडविण्यात आले आहे. त्यापेक्षाही दुर्दैवाची बाब म्हणजे होणारा वापर फक्त 1 टक्का आहे ही लाजीरवाणी बाब आहे. होणारी जलविद्युत निर्मीतीही उंटाच्या मुखातील मोहरीएवढी आहे. या धरणांचा लाभ तर झाला नाहीच, पण त्यामुळे लोकांचे विस्थापन, त्यांच्या जीवन पद्धतीत बदल, पूजन होत असलेल्या स्थळांचे उच्चाटन, जंगलकटाई, जंगली जनांवरांच्या निवासांचा नाश, हत्ती, वाघ, मासे आणि वनगायी यांच्या मुक्त विहाराला अडथळे, पैशाचा वारेमाप अपहार या संकटांना तोंड द्यावे लागले. बहुतांश प्रकल्पांनी पर्यावरणीय नियमांची पायमल्लीही केलेली आढळते.

या परिस्थितीवर उपाय काय?

परिस्थिती भयावह आहे. संकटे अनेक आहेत पण त्यावर उपाय शोधणे यातच पुरुषार्थ आहे. सर्वात मोठा बदल अपेक्षित आहे तो लोकांच्या मानसिकतेत. तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सर्व प्रयत्न व्यर्थ ठरतील. व्यवस्थापन शास्त्रात स्वॉट अ‍ॅनॅलिलिस (SWOT = Strength, Weaknesses, Opportunities And Threats) नावाचा एक अभ्यास आहे. माझी शक्तिस्थाने कोणती आहेत, माझ्यात काय कमतरता आहे, माझ्यासमोर कोणत्या संधी आहेत आणि त्या प्राप्त करण्यात कोणत्या अडचणी आहेत हा अभ्यास जसा व्यक्तीसाठी महत्त्वाचा आहे तसा तो प्रदेशालाही लागू होतो. तो होत नाही हेच कोकणाचे खरे दुःख आहे. आपली ताकद कशात आहे हे सर्वप्रथम जाणून घेण्याची गरज आहे. आपली ताकद आहे, सृष्टिसौंदर्य, 720 किलोमीटरचा लाभलेला समुद्र किनारा, शांतता आणि लोकांचा असलेला मनमिळावू स्वभाव, डोंगरराजीतील विविध स्वरूपाच्या वनसंपत्ती. या सर्वांचा वापर करून कृषी पर्यटन विकास केला तर कोकणाचे स्वित्झरलँड झाल्याशिवाय राहणार नाही.

हा प्रदेश जगाचे एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ म्हणून ओळखला जातो. आपल्याजवळ काय नाही याची चिंता करत बसण्यापेक्षा आपल्याजवळ काय आहे, त्याचा आपण आपल्या विकासाठी कसा वापर करू शकतो हे उचित ठरणार नाही का? एक पर्यटनस्थळ निर्माण करणे म्हणजे किमान 100 लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे होय. हा झाला प्रत्यक्ष रोजगार. यापेक्षाही अप्रत्यक्ष रोजगार तर अमाप असतो. आपल्या प्रदेशात पिकलेले धान्य, भाजीपाला, फळफळावळे यांना घरातच मिळालेला मोठा बाजार दुर्लक्षून चालणार नाही. मुंबई, पुणे येथील प्रत्येक नागरिक नवनवीन पर्यटनस्थळांच्या शोधात असतो. त्याला शांतता हवी असते. चविष्ट जेवण हवे असते. महाबळेश्वर, माथेरान, अलिबाग ही स्थळे आता पाहून झाली आहेत. प्रत्येक पर्यटक जिथे जातो तिथल्या स्थानिक निर्माण झालेल्या वस्तू खरेदी करत असतो. त्यामुळे स्थानिक हस्तकलांनाही प्रोत्साहन मिळते.

एका पर्यटनस्थळामध्ये कोणकोणत्या सोयी असाव्या हा तर खास अभ्यासाचा विषय आहे. त्यांची यादी तयार केली तर कागद कमी पडतील पण यादी संपणार नाही. ‘एक नवीन सोय अ‍ॅड करा आणि नवीन शंभर पर्यटक मिळवा’ अशी परिस्थिती आहे. राहता राहिला कामगारांचा प्रश्न. आज देशात इतकी बेकारी आहे की असंख्य कामगार मिळवता येतील. मध्यंतरी मला वर्तमानपत्रातील एक बातमी वाचून तर आश्चर्याचा धक्काच बसला. ‘कोकणात एका गावात छटपूजा मोठ्या प्रमाणात साजरी झाली’ ही ती बातमी होती. छटपूजा हा परप्रांतीयांचा सण आहे. तो आपल्या प्रदेशात एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा होतो याचा अर्थ असा की, एवढ्या मोठ्या प्रमाणात परप्रांतीय आपल्या प्रदेशात वास्तव्यास आहेत. आपण पर्यटन व्यवसाय सुरू केला तर हा लोंढा आणखी वाढेल व आपल्याला कामगार कमी पडणार नाहीत याची खात्री बाळगा. पाणी जशी आपली वाट शोधून घेते, तसा रोजगारही आपली वाट शोधून घेत असतो.

आता तुम्ही म्हणाल, ‘या योजनेत पाण्याचा कुठे संबंध आला.’ प्रत्येक पर्यटनस्थळाला अमाप पाणी लागत असते. पाण्याशी निगडित अनेक खेळ आहेत ते आपल्या पर्यटनस्थळापाशी सुरू केले जाऊ शकतात. पाणी फक्त शेतीलाच आणि कारखान्यांनाच लागते या भ्रमात कोणीही राहू नये. पर्यटनस्थळात चांगल्या बागा उभ्या करणे, पाणी खेळवणे, कारंजी उभारणे, पाण्याचे खेळ सुरू करणे यासाठीही पाण्याचा वापर होतो हे विसरून चालणार नाही.

आणखी एका महत्त्वाच्या मुद्याकडेे मी आपले लक्ष आकर्षित करू इच्छितो. पर्यटन विकास हा महिला उद्योजकांसाठी एक सुवर्ण संधी आहे. प्रत्येक पर्यटन केंद्रात भोजन व्यवस्था हा केंद्रबिंदू असतो. भोजन जितके स्वादिष्ट तितके पर्यटनस्थळ अधिक पॉप्युलर होते. शिवाय महिला बचत गटात तयार झालेले पदार्थ आणि वस्तू यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होते ती गोष्ट वेगळीच. आज समाजात महिलांचा रोजगार हा प्रश्न दुर्लक्षित आहे. त्याला या प्रकल्पामुळे भरपूर गती मिळेल.

शेतीचा प्रश्न विचारात घेतला तर कोकणातील शेतीला फक्त संरक्षित पाण्याची गरज आहे असे म्हणता येईल. ते मिळवण्यासाठी मोठी धरणे कामाची नाहीत तर जलयुक्त शिवार योजनाही ही गरज भागवू शकतात. फक्त या योजनेचे नियोजन योग्य झाले पाहिजे. उसाला भरपूर पाणी लागते आणि इथे तर भरपूर पाणी आहे. इतके असून सुद्धा हे पीक इथे घेतले जात नाही याचे प्रमुख कारण म्हणजे या ठिकाणी पाहिजे तेवढा उतारा मिळत नाही. केळी हे पीक कोकणात आदर्श पीक आहे. त्यासाठी बारमाही पाणी उपलब्ध केले तर या पिकावर लक्ष केंद्रित केले जाऊ शकते. मोठे कारखाने, मोठ्या उद्योग संस्था यांच्या जंजाळात न फसता आपली क्षमता काय आहे हे पाहून पाय पसरले तर ते निश्चितच स्वागतार्ह ठरेल.

डॉ. दत्ता देशकर

(व्यास क्रिएशन्स च्या कोंकण प्रतिभा दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..