जहाजावरून घरी जायचं कन्फर्म झाले की साईन ऑफ पेपर वर्क सुरू होते. रीलिवर नसेल तर खूपच कमी वेळा विदाऊट रिलिवर साईन ऑफ केले जाते. साईन ऑफ म्हणजे प्रत्येक खलाशासाठी आणि अधिकाऱ्यांसाठी सर्वात आनंदाचा योग असतो. जहाजावर प्रत्येक वेळी प्रत्येक जण पहिलं पाऊल टाकता क्षणी आपला साईन ऑफ होऊन घरी कधी जाऊ याचा विचार करायला सुरुवात करतो. मग एक एक दिवस आणि एक एक क्षण मोजायला सुरुवात होते. कोणी कॅलेंडर वर रोज त्या त्या तारखेवर काट मारतो. तर कोणी एकमेकांना माझ्या अमुक एक बिर्याणी संपल्या आणि तमुक एक शिल्लक आहेत असे बोलून साईन ऑफ साठी किती दिवस, आठवडे किंवा महिने शिल्लक आहेत ते समजावत असतो. जहाजावर प्रत्येक संडेला बिर्याणी असल्याने कोणाला जहाज जॉईन करून एक महिना झाला असेल तर तो माझ्या चार बिर्याण्या खाऊन झाल्यात असे सांगतो. ज्याचे साईन ऑफ पुढील आठवड्यात आहे तो मोठ्या अभिमानाने माझी फक्त एकच बिर्याणी खायची बाकी आहे असे सांगतो. जर काही अपरिहार्य कारणामुळे साईन ऑफ कँसल झाला तर मात्र हाच अभिमान गळून पडतो आणि खिन्न व उदास मनाने अजून काही बिर्याणी खाव्या लागतील असे हिरमुसले होऊन सांगण्याची दुर्दैवी वेळ येते. साईन ऑफ असेल त्या दिवशी किंवा एक दिवस अगोदर साईन ऑफ चे पेपर वर्क केले जाते. प्रत्येक जण जहाजावरील कागदपत्रे स्वतः च्या ताब्यात घेतात. सीडीसी म्हणजेच प्रत्येक खलाशी किंवा अधिकाऱ्याचे जहाजावर काम करण्याचे ओळखपत्र ज्यावर प्रत्येक जहाजाचे डिटेल्स आणि जॉईन आणि साईन ऑफ केल्याच्या तारखांची नोंद करून कॅप्टनची सही व शिक्के घेतले जातात. पगाराचा संपूर्ण हिशोब केला जाऊन पासपोर्ट, सीडीसी व अन्य काही मूळ कागदपत्रे प्रत्येकाला परत केली जातात.
जहाजावर असताना घरी जाण्यापूर्वीच प्रत्येक ऑफ साईनर कडून ॲव्हलेबिलीटी कार्ड भरून घेतले जाते. ॲव्हलेबिलीटी कार्डवर मोबाईल नंबर अल्टरनेट मोबाईल नंबर आणि पुन्हा कधी जॉईन करणार म्हणजेच पुन्हा किती दिवसात किंवा महिन्यात ॲव्हलेबल आहात हे कंपनीला लेखी कळवावे लागते. घरी जायच्या पहिलेच पुन्हा घरून जहाजावर कधी जॉईन होणार हे लिहून देताना. साईन ऑफ आणि घरी जायच्या आनंदावर या ॲव्हलेबिलीटी कार्ड मुळे विरजण पडल्यासारखं होऊन जातं. जो खलाशी किंवा अधिकारी ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत असतो त्याला ॲव्हलेबिलीटी कार्ड मुळे घरी जाण्यापूर्वीच पुन्हा जहाजावर परत येण्याचे दडपण आलेले असते. ॲव्हलेबिलीटी कार्ड दिले म्हणजे त्याचं तारखेला जहाजावर जावे लागते असे नाही. कधी कधी कंपनी कडून लवकर जॉईन व्हायला सांगितले जाते किंवा उशिरा सुद्धा पाठवले जाते. पण असे जरी असले तरी ॲव्हलेबिलीटी कार्ड भरून दिल्याने प्रत्येकावर एक मानसिक दडपण असतेच. घरी असताना जसजसं ॲव्हलेबिलीटी डेट जवळ येते तसतसं प्रत्येकाची घाई उडते. अरे माझे हे काम बाकी आहे. अरे मला ह्याला भेटायला जायचय. अरे या वेळी नाही करता येणार किंवा अगोदर का नाही केले या विचारांनी सुट्टीचे उरलेले दिवस पण संपायला लागतात. कोणी मित्र किंवा नातेवाईक प्रत्यक्ष भेटल्यावर किंवा फोनवर बोलताना जसं विचारतात की काय मग केव्हा आलास? आणि मग लगेच दुसरा प्रश्न विचारतात , मग आता पुन्हा कधी जाणार? अशा प्रश्नांनी जेवढं डोकं फिरतं तेवढं डोकं ॲव्हलेबिलीटी कार्ड भरताना फिरलेले असतं.
ॲव्हलेबिलीटी दिलेली तारीख यायच्या पहिले जहाजावर असताना पाहिलेली स्वप्ने, आखून ठेवलेली कामे आणि घरी आल्यावर अजून नवी निघालेली कामे तसेच जिवाभावाच्या लोकांच्या भेटीगाठी उरकायच्या असतात. जहाजावर दिवस आणि वेळ जाता जात नाही आणि घरी आल्यावर दिवस पुरवता पुरत नाहीत आणि वेळ थांबता थांबत नाही.
हल्ली मोबाईल आणि फेसबुक तसेच व्हिडिओ कॉल मुळे प्रत्यक्ष कोणाकडे जाऊन भेटणे आणि बोलणे फार कमी झाले आहे. तस पाहिलं तर मोबाईल आणि सोशल नेटवर्किंग मुळे जहाजावर असताना सोशली ॲटॅच्ड असणे वेगळे आणि घरी असताना प्रत्यक्ष कोणाकडे भेटायला जाता न येणे हे सुद्धा तितकच खरं.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर
कोन,भिवंडी, ठाणे.
Leave a Reply