आवरणे कसले, कधी
सावरणे कोठे, कधी
विनाकारणे लागे समाधी
न सुटे व्याधी मनातुनी!!
अर्थ–
माणूस कितीही मोठा असला, प्रसिद्ध असला, कर्माने उंची गाठलेला असला तरी तो स्वतःला अधीर क्षणी, संकट काळी, अतीव दुःखाच्या क्षणी, अत्यंत आनंदाच्या वेळी आवरू शकेलंच असे नाही. त्यासाठी मनाच्या सय्यमीपणाचा कस लागतो. अत्यंत सुखं आणि अतीव दुःखं जो आतल्या आत व्यक्त करू शकला तो या जगात कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो. रागात बोलताना शब्दांना घातलेला आवर, अघोरी शब्द किंवा अन्यान सहन करून त्यातून आलेल्या द्वेषाला, क्रोधाला आवर घालताना लागलेला कस हा सहजपणे येत नाही त्यासाठी मनाच्या स्वीकारते पणाची ताकद प्रचंड वाढवावी लागते.
आवरणे बरोबर सावरणे हेही तेवढेच महत्वाचे. मग त्यात स्वतःला सावरणे, दुसऱ्याला सावरणे, परिस्थिती सावरणे, कोणाचे बोलणे सावरणे, दुःखाचे लोट ज्या स्थितीत येतात त्यात स्वतःला सावरणे तसेच आपल्या माणसांना सावरणे हे सुद्धा सोपे नाही पण यापलीकडे ही काही वेळा समोरच्या व्यक्तीला तोल जातोय ती व्यक्ती स्वतःला आवरू शकत नाहीये तेव्हा त्या परिस्थितीत स्वतःला आवर घालून सावरणे हे कर्मकठीण काम होय.
मग यातूनच जणू मी साक्षात्कारी बाबाच अथवा मी मनाच्या स्थिर अवस्थेला काबूत आणलेला योगीच जणू वगैरे सांगणारे आतून किती कलुषित असतात हे सांगायला नकोच. नको त्या ठिकाणी, नको त्या वयात, नको त्या वेळी चुकीची तपश्चर्या, चुकीच्या गोष्टीचा त्याग, अथवा समाधी घेऊन झोपलेल्या व्यक्तीला त्याच्या मूळ आत्मिक दोषापासून मुक्ती कधीच मिळत नाही. त्यासाठी त्याग नावाच्या उंच कड्यातून मुक्ती रसाच्या कोसळणाऱ्या खोल दरीतल्या धबधब्यात उडी मारावी लागते. आणि ते कलयुगातल्या माणसाला शक्य नाही.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply