नवीन लेखन...

अवचित…

भरून आलंच होतं , पडणार हे वाटलंच होतं पण पुण्यांतला मे मधला पाऊस एखाद्या सिग्नल प्रमाणे पडतो फार फार तर मोठ्या चौकातल्या १८० सेकंदाच्या सिग्नल प्रमाणे ; त्यामुळे आडोशाला थांबलेले निघण्याची तयारी करण्यासाठीच थांबलेले असतात. पण आजचा नूर वेगळाच होता. तयारी तब्येतीत कोसळण्याची होती. पावसाची पहिली सर ओसरली की नंतर तो कसा पडतो ह्यावर तो किती वेळाचा आहे हे साधारण कळतं. आजचा खेळी मोठी असणार हे स्पष्टच होतं. अगदी जूनच्या ३० किंवा जुलैच्या २३ ला पडावा तसा मुरलेला पाऊस होता. कडाडणं थोडं कमीच पण लयीला ठेहराव होता.

शरणागती पत्करून समीर आणि कैवल्यने बाईक बाजूला घेतली आणि बंद शटरच्या पायऱ्यांवर येऊन डोकं आणि हात पुसले. पुंडलिकही सायकल लावून पायरीवर येऊन बसला. रोहन जिमहुन घरी जात होता तोही शटरजवळ डफल ब्याग टाकून बसला. पाव बाटली पाणी गटागटा पिऊन रिकामी केली आणि पडणाऱ्या पाण्याकडे “याचा मला काय फायदा ?” अशा आविर्भावाने कटाक्ष टाकला.

समीर-कैवल्यच्या दिवसभराच्या मीटिंग्स  सुदैवाने पार पडल्या  होत्या आणि जूनच्या अंकाला अपेक्षित जाहिरातदारांशी गाठीभेटी होऊन त्यातून समाधानकारक असे निष्पन्न झाले होते त्यामुळे आजची संध्याकाळ तशी शांतच असणार होती.

पावसाचा जोर पाहून ,”आपल्याला  मिळालेली  आडोशाची जागा चांगली आहे म्हणून बरं ! “. असे उद्गार कैवल्यने काढले आणि दोघंही पायऱ्यांवर बसले.

कैवल्यने कॅन्डी क्रशायाला सुरुवात केली. त्यातल्या आवाजाने पुंडलिकने त्याचाकडे पाहिलं आणि रबर बँडने  एकत्र धरून ठेवलेला ,अतिजीर्ण झालेला मोबाईल   खिशातून बाहेर काढला. त्याचीही कामे आज लवकर आटोपली होती. कुरिअर मुक्कामी पोचती करून, मुलांची गाईड-पुस्तके घेऊन ,सायकलचे पेडल बदलून तो आता घरी निघाला होता.

शटरसमोरच रस्त्यापलीकडे ABN बँकेची शाखा होती. पायरीवरच्या सिक्युरिटी  डेस्कवर सखाराम बसला होता. खिदळण्याचा आवाज ऐकून त्याने वर पाहिलं. गौरी , समिरा ,रेश्मा ABN बँकेच्या पायऱ्यांवर धावत-पळत पोहोचल्या होत्या. त्यांच्या लगबगीतून त्यांची उडालेली तारांबळ सखाला जाणवली. “पाउस लय लागलाय…”, सखानं रस्त्याकडे पहात तिघींना उद्देशून म्हटलं. ब्यागा बँकेच्या बाहेरील काचेला लावून ठेवत गौरी – समिराने स्कार्फ काढला आणि केस मोकळे केले. भिजल्याने असह्य झाले होते त्यामुळे त्या लगेचच सखासाठी लावलेल्या Standing Fan समोर उभ्या राहिल्या.  रेश्माने ब्याग उघडून Tab आणि Laptop चेक करून पुढच्या कप्प्यातल्या प्लास्टिक ब्यागेत गुंडाळून परत ठेवले.

पावसाचा जोर कायमच किंबहुना वाढतंच होता. वाळलेली झावळी बँकेच्या कार पार्कींग मधील प्लास्टिक शेडवर पडली, सखा ती बघायला गेला.

समीर “जिंदगीss..कैसी ये पहेली हाएss…” गुणगुणत असतानाच  सेल्फ़ि घ्यायला ओलेत्या उभ्या राहिलेल्या गौरी-समिरा त्याला दिसल्या आणि त्याने “ये रात भिगी – भिगी…ये मस्त हवांएss…” या गाण्याला सुरुवात केली. रेश्माला ऒढुन आणून गौरीने सेल्फ़ि घेतला आणि त्यानंतर ४- ५ पोझेस देऊन स्वतःचे फोटो काढुन घेतले.

लास्ट सेमचा अभ्यास, प्रोजेक्ट सबमिशन्स आणि पुढच्या इंटरव्यूजची तयारी यात पार गुंतलेल्या तिघी या अवचित पावसाने वेळापत्रक विसरल्या होत्या. बाहेर पडून कामाला जाणं शक्यच नव्हतं त्यामुळे त्यांनी राहिलेली कामं उद्यावर टाकली आणि निश्चिंत झाल्या. उडणारे तुषार आणि मधेच टपकणाऱ्या पागोळयांमुळे ड्रेस ओले झाले होते. एकीकडे असह्य पण मे च्या पहिल्या आठवड्यात हजेरी लावल्याने आल्हाददायक अशी मनस्थिती झाली होती. शेवटी न राहून समिरा बँकेच्या बाईक पार्कींगमध्ये ; जिथे जरासे पाणी आता साचू लागले होते, त्यात जाऊन उभी राहिली आणि हात फैलावून तिने वर पाहत एक गिरकी घेतली. गौरी – रेश्माच्या चेहऱ्यांवरचं आश्चर्य सरून हसू उमटतं न उमटतं तोच समिराने ओंजळीने  त्यांच्यावर पाणी उडवले. दोघींनीही धावत येउन तिथे गिरक्या घेतल्या आणि मनसोक्त भिजत राहिल्या.

समीरने फेसबुक wallवरून ४-५ वेळा खालीवर केले. पोस्ट्स, फोटोज्, शेअर्स, स्टेटसेस काहीच नवीन नव्हते. whatsapp ग्रुप्स मधील अपडेट्स मात्र आज पहायच्या राहून गेल्या होत्या. ‘मॉडर्न कॉलेज १९९७ बेच’ चा सब्जेक्ट “HBD सुमंत नार्वेकर” असा ओझरता पाहिला आणि एकदम सेकंड ईअर च्या आंतर महाविद्यालयीन एकांकीकेतला सुमंत डोळ्यांसमोर उभा राहिला. मग अजूनही काही आठवणी जाग्या झाल्या. ह्या आठवणींच्या चल्लचित्रपटामुळे समीरला सुमंतशी बोलावेसे वाटले. पटकन ग्रुपमधून नंबर शोधून फोन केला. हलो,Mr. Sumant Narvekar ? (सुमंत एका MNC मध्ये मोठ्या पदावर आहे हे समीरला LinkeIn वरून कळलेच होते.) Yes..Speaking….Hi Sumant…I am Sameer !…Sameer Deshmukh…!!

Reference जोडायला सुमंतला एक क्षण लागला पण त्यानंतर तो उडालाच. कॉलेजच्या मित्राशी तो तब्बल १८ वर्षांनी बोलत होता. सुमंतलाही  बऱ्याचशा गोष्टी क्षणात आठवल्या. त्यानंतर कॉलेज ग्रुपमधील सगळ्यांबद्दल गप्पा झाल्या. कोण कुठे असतात , काय काय करतात… एकेकजणाबद्दल बोलताना त्यांना बऱ्याचशा गोष्टी आठवल्या आणि कॉलेजच्या आठवणींचा अल्बम चाळला गेला. नक्की भेटू… असं म्हणून समीरने फोन ठेवला पण अंगावरचा शहारा अजून तसाच होता. पावसाच्या पाण्याबरोबरच आठवणींच्या गुलाब पाण्याने त्याला अजूनच फ्रेश वाटू लागलं.

पुंडलिकच्या फोनमध्ये सकाळचा missed call अजून तसाच होता. विलासने, त्याच्या मामेभावाने ४ वेळा फोन केला होता. पुंडलिकने call केला. विलास वाटच बघत होता. त्याला फवारणी यंत्राचा स्पेअर पार्ट काही केल्या मिळत नव्हता आणि पुण्यात तो खात्रीशीर मिळेल अशी जागा त्याला कळली होती. त्याने पुंडलिकला ते काम सोपवले आणि मामाच्या औषधाच्या गोळ्या आणायलाही सांगितले.

रोहनला सर्फिंग करताना Battery Low चा मेसेज आला. तो फोन बंद करणार इतक्यात त्याला बहिणीने सांगितलेले काम आठवले. घाईने त्याने App उघडले आणि बहिणीच्या पुस्तकाचे shopping केले.

आता तास – सव्वा तासानंतर  पावसाचा जोर जरा कमी झाला होता. मंडळींनी निघायचा निर्णय घेतला आणि एकेक करून सगळे जण निघाले. बँकेसमोरून  मुलींनीही निघण्याची तयारी सुरु केली होती.

एकूणच अवचित पावसाने सगळ्यांची गैरसोय झालीच होती पण त्यामुळे त्यांना आप्तांसाठी अमुल्य असा वेळही मिळाला होता. टपटप पडणाऱ्या आणि भिजवणाऱ्या पागोळ्यांवर आता कुणाचाच राग उरला नव्हता. दाटलेल्या ढगांतही सर्वांना मोकळेपणा जाणवत होता.

Rohit

2 Comments on अवचित…

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..