मोहमयी ती आशा सुंदरी, मोहक ललना ।
मदालसा मदमस्त, मदनाची ती मंजिरी ।।
आत्म सुखाची, तीच गमे, जननी जगाची ।।धृ।।
असती सदैव, जन अवघे, असते परिपूर्तीसाठी ।।
धांवधाव नि धडपड, असते परिपूर्तीसाठी ।।
चालीतुनि खडतर, असावी ती अपुल्या गांठी ।
कसब अंगाचे, पूर्णपणे ते, पणा लाविती ।।
नसतां नशिबीं, खंत नसावी, नैराश्याची ।
आत्मसुखाची, तीच गमे, जननी जगाची ।।१।।
सकल जनांना, ती सत्वर, हवीहवीशी वाटे ।
परी प्राप्तीसाठी, असती मार्गी, अनंत कष्टे ।।
येऊं लागली हल्लीं, क्षणीं असे जरी वाटे ।
चुकेतुनि इवल्याशा, ती निसटुनि जाते ।।
नवजोमें लागते धरावी कांस यत्नांची ।
आत्मसुखाची, तीच गमे, जननी जगाची ।।२।।
आशेविण न जगे, कुणी प्राणीमात्र ।
आशाऽसक्ती, हे इथले, शांती सुखाचे सूत्र ।।
किरणांतुनि आशेच्या, गवसे सौख्याचा मंत्र ।
शृंखलेतुनि आशेच्या, झुलते जीवन तंत्र ।।
न उरतां आशा, तिथेच सरते, यात्रा जगींची ।
आत्म सुखाची, तीच गमे, जननी जगाची ।।३।।
यत्न हाची जाणावा, जगतां माजी भगवंत ।
मार्ग अथकश्रमांचा, सुचविती प्रज्ञावंत ।।
आंस पूर्तीस असावे, श्रम सातीस अखंड ।
कष्टांतुनीच होते आशापूर्ती, सत्य हे ज्वलंत ।।
पूर्तीतुनि, तयां लाभते, उंच भरारी आयुष्याची ।
आत्मसुखाची, तीच गमे, जननी जगाची ।।४।।
-गुरुदास / सुरेश नाईक
२३ डिसेंबर २०११, शुक्रवार
पुणे – ३०
-गुरुदास / सुरेश नाईक२३ डिसेंबर २०११, शुक्रवारपुणे – ३०
“सुमनांजली” या काव्यसंग्रहातून…
— सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास
Leave a Reply