तुझा ऑफिस मधला तो शेवटचा दिवस होता
हात खांद्यापर्यंत वर उचलत आणि हालवत
तू माझ्याकडे पहिलं, हसलीस
आणि हळू आवाजात म्हणालीस
“बाय”
मीही तुझ्याकडे पहिलं
हात खांद्यापर्यंत वर उचलत
आणि आतल्या आवाजात म्हणालो
“बाय”
मी पूर्णपणे व्यक्त होऊ शकलो नाही
चूक माझीच होती
नंतर बर्याहच दिवसाने बस थांब्यावर
तू अचानक भेटलीस
तू अगदी फुललेल्या चेहर्याथने
हासत माझ्याकडे पाहिलस
आपली भेट झाल्याचा उत्साह
तुझ्या चेहरायवर साफ दिसत होता
मलाही तू भेटल्याचा तेव्हढाच
आनंद झाला होता
मीही भयंकर उत्साहित होतो… ‘मनात’
मी फार वेळ लावतोय हे पाहून
तूच म्हणालीस
कॉफी प्यायला जायचं?
मी पूर्णपणे व्यक्त होऊ शकलो नाही
चूक माझीच होती
तू मला तुझा फोन नंबर दिलास
मग आपल नेहमीच
भेटणं होऊ लागलं
त्याच हॉटेलात आपण भेटायचो
तू मला बरेच प्रश्न विचारायचिस
मी तुला एकच प्रश्न विचारायचो
काय घेणार?
कधी डोसा कधी उत्तपा खायचो
शेवटी ‘बाय’ म्हणत निघून यायचो
मी पूर्णपणे व्यक्त होऊ शकलो नाही
चूक माझीच होती
शेवटी एकदा
तू तुझ्या होणार्या नवर्या् बरोबर आलीस
त्याच हॉटेल मध्ये भेटलो
त्याच्याशी माझी ओळख करून दिलीस
मला त्याचा हेवा वाटत राहिला
आणि तू मला विचारलस
काय घेणार?
मागण्यासारख आता काहीच नव्हतं
मी पूर्णपणे व्यक्त होऊ शकलो नाही
चूक माझीच होती
जीवनात आपआपल्या वाटेवर
आपण आता फार पुढे निघून आलोत
मी सभ्यतेच्या मर्यादा पळणारा आणि
जपणारा माणूस आहे, त्यामुळे
मी आता ही
पूर्णपणे व्यक्त होऊ शकत नाही
चूक…..माझीच आहे
— विनायक आनिखिंडी, पुणे
मो ९९२२९७०३१७