माणूस जन्माला आल्यापासून तो आवाजाशी जोडला जातो. आवाज आहे, तर कुणाचं तरी अस्तित्व सोबत आहे हे समजून येतं. अगदी पहिला आवाज तो ऐकतो स्वतःच्याच रडण्याचा. मग त्याला ऐकू येते का? ते पहाण्यासाठी खुळखुळा सारखी खेळणी घरात आणली जातात. कुणी पाळण्याजवळ येऊन ते वाजवलं की, ते बाळ त्या दिशेला नजर वळवतं.
मग हळूहळू दात उगवतात. ‘आई, बाबा’ असे शब्द, घोकून त्याच्याकडून वदवून घेतले जाते. ‘एक घास चिऊचा..’ म्हणत आई खाऊ घालते. मग तिसऱ्या वर्षापासून बालवाडी सुरू होते. तिथं बाई ‘प्राण्यांचे आवाज’ काढून त्यांची ओळख करुन देतात.
पहिल्या इयत्तेत गेल्यापासून शाळा, शाळेची घंटा हे आवाज मनावर कोरले जातात. सकाळची प्रार्थना, १५ आॅगस्ट, २६ जानेवारीचं झेंडावंदन हे राष्ट्रगीताच्या सामूहिक आवाजानं लक्षात रहातं. शाळा भरल्याची, मधल्या सुट्टीची, शाळा सुटल्याची घंटा कान देऊन ऐकली जाते.
घरातील मोठ्यांचं रागावणं, हे त्यांच्या आवाजातूनच जाणवतं. पूर्वी रेडिओच्या कार्यक्रमाच्या आवाजावरुन किती वाजलेत ते कळायचं. सकाळी भक्तीगीत, दुपारी माजघरातल्या गप्पा, सायंकाळी मराठी भावगीते, रात्री नभोनाट्य असायचं. आता ती जागा टीव्ही ने घेतलीय.
सणवार देखील आवाजानेच कळायचे. दसरा म्हटलं की, शाखेचं संचलन बिगुलाच्या आवाजाने कळायचं. नागपंचमी असली की, नागोबाला दूध, ओरडणारे गल्ल्यांमध्ये फिरायचे. सूर्यग्रहण असलं की, ते सुटल्यावर ‘दे दान, सुटे गिराण’ म्हणत हिंडणारे दिसायचे. गणपतीचे दहाही दिवस कानावर गाण्यांचा भडिमार होत असे. विसर्जनाच्या दिवशी कर्कश्य आवाजात गणपतीला निरोप दिला जात असे. दिवाळी फटाक्यांच्या आवाजानेच साजरी होत होती. गोकुळ अष्टमीला चौकाचौकात दहीहंडीची मंडळं गाणी लावून आवाजात भर घालायची.
माध्यमिक शाळेत शिकताना पी टी च्या शिक्षकांच्या शिट्टीच्या आवाजावरुन कवायत होत असे. परीक्षेत पेपर लिहिताना शेवटची दहा मिनिटे राहिल्याची घंटा झाल्यावर पेपरमधील प्रश्र्न सोडवायचे राहिले असतील तर घाम फुटायचा. काॅलेजच्या परीक्षा अशाच व्हायच्या.
पूर्वी फोन असायचे, त्याची घंटी एकच प्रकारची होती. नंतर आवाज बदलत गेले. आता तर मोबाईलमध्ये प्रत्येक नंबरसाठी वेगळी ट्यून ठेवली जाते. कार्यक्रमात असताना मोबाईलचा गळा दाबून ठेवला जातो.
सनईचे सूर कानावर पडले की, मंगलसोहळ्याची जाणीव होते. सनई बरोबर चौघडा असेल तर जंगी समारंभ असल्याचे समजते. रस्त्यावर कुठे डोंबाऱ्याचा खेळ चालू असेल तर तो त्याच्या ताशाच्या आवाजावरून कळतो.
नाट्यगृहात गेल्यावर तिसऱ्या घंटेचा आवाज आल्याशिवाय पडदा उघडला जात नाही. पहिलीच घंटा झाली असेल तर बाहेरच टाईमपास केला जातो. मध्यंतराची घंटा वाजली की, घाईने जाऊन पहिल्यांदा वडापाववरती ताव मारला जातो, कारण नंतर गर्दी होते. पुन्हा तिसऱ्या घंटेची वाट पहात चहा घ्यायचा व पुढची सीट रिकामीच आहे, हे हेरुन तिच्यावर जाऊन बसायचं.
बसमध्ये बसल्यावर, मोबाईलवर चॅटिंग करण्यात गुंग असणाऱ्याला कंडक्टरने दिलेला घंटीचा आवाज न ऐकल्यास खजील होऊन पुढच्या स्टाॅपवर उतरावे लागते.
दवाखान्यात कुणा पेशंटला पहायला गेलं की, तिथली गंभीर शांतता ही शब्दांनाही हळू आवाजात बोलायला लावते. पूर्वी मोठी घड्याळं रात्रीच्या शांततेत मिनिट व सेकंद काट्यांचेही आवाज ऐकवायची.
प्रवासात असताना एखाद्या गावाचा मोठा थांबा आला की, रसाच्या गुऱ्हाळातील यंत्राला लावलेल्या घुंगरांचा तालबद्ध आवाज यायचा. एखाद्या खेडेगावात जाताना लांबवरुन डिझेलच्या पीठगिरणीचा ‘पुक पुक’ असा आवाज हमखास यायचा. संध्याकाळी गाई म्हशी डोंगरावरुन जोगवून आल्यावर त्यांच्या गळ्यातील घंटेचा, लोडण्याचा आवाज यायचा. पूर्वी बैलगाड्या असताना त्यात बसल्यावर बैलांच्या गळ्यातील घुंगरांचे पट्टे व गाडीच्या चाकाचा संमिश्र आवाज अजूनही कानात साठवलेला आहे.
आजही शहरात रस्त्याने जाताना अॅम्ब्युलन्सचा आवाज ऐकला की, काळजाचं पाणी पाणी होतं. कुणी तरी जन्ममृत्यूच्या सीमेवर असल्याचं जाणवतं. आगीच्या बंबाची घंटा ऐकली की, कुठेतरी आग लागल्याचं समजतं. रस्त्यावरील सिग्नल तोडल्यानंतर पोलीसांचे मारलेली शिट्टी थांबायला भाग पाडते.
तारूण्यात पाहिलेले चित्रपट त्यातील आवडत्या नायिकेच्या गाण्यांमुळे चिरकाल स्मरणात राहतात. पुन्हा कितीही वर्षांनी ते गाणं ऐकल्यानंतर ती नायिका वयोवृद्ध झालेली असली तरी, त्या वेळची चित्रपटातीलच डोळ्यासमोर येते.
अनेक पावसाळे निघून जातात. चाळीशी नंतर गोंगाट नकोसा वाटतो. पन्नाशी नंतर ऐकायला कमी येऊ लागतं. साठीनंतर एकच गोष्ट दोनदा विचारावी लागते. आयुष्यभर खूप काही ऐकून मेंदूची हार्डडिस्क पूर्ण भरलेली असते. आता त्यामध्ये जागा शिल्लक नसल्याने शांत बसावं लागतं. हाताशी रेडिओ असेल तर, त्यावर कधी जुनी गाणी लागली तर भूतकाळात फेरफटका मारल्याचा आनंद मिळतो.
ऐंशी ओलांडल्यावर ऐकायला येणं क्षीण होत जातं. तासंतास भूतकाळातील गोष्टी आठवत रहातात. कुणी पै-पाहुणे आले तर जाताना नमस्कार करतात. बोलायची खूप इच्छा असते, मात्र शब्द फुटत नाही. हातवारे आशीर्वाद देऊन पुन्हा मन, भूतकाळातच जाते.
कधी कंटाळा येऊन खिडकीतून रस्त्यावरील गंमत पाहताना कानावर अस्पष्ट ‘राम नाम सत्य है..’ चा आवाज पडल्यावर काळजात कळ उठते….
– सुरेश नावडकर २९-१-२१
मोबाईल ९७३००३४२८४
या रचनेचे सर्वाधिकार रचयिता © सुरेश नावडकर यांच्याकडेच आहे
Leave a Reply