नवीन लेखन...

‘आवाजा’चा जादूगार

१९४४ सालातील गोष्ट आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी देशातील प्रत्येक तरुण धडपडत होता. ब्रिटीशांना हूसकावून लावण्यासाठी व जेरीस आणण्यासाठी काॅलेजमध्ये शिकणारे अनेक विद्यार्थीही या चळवळीत सामील होते.
कोल्हापूरमधील राजाराम काॅलेजच्या शास्त्र शाखेतील शेवटच्या वर्षात शिकणारा मंगेश देखील आपल्या परीने स्वातंत्र्य मिळावे म्हणून प्रयोगशाळेत रासायनिक बाॅम्ब तयार करण्यासाठी अहोरात्र झटत होता. शेवटी त्याने तो बाॅम्ब तयार करण्यात यश मिळविलेच.
त्या रासायनिक बाॅम्बचा वापर करुन त्याने आपल्या सहकाऱ्यांसह ब्रिटीशांच्या विरोधात स्फोट घडवून आणले. परिणामी त्यांना पोलीसांनी पकडले व तुरुंगात टाकले. मंगेशला चार वर्षांचा कारावास भोगावा लागला.
जेव्हा बाहेर आला, तेव्हा तो गुन्हेगार ठरल्यामुळे त्याला काॅलेजने पदवी देण्याचे नाकारले. त्याच्या काकांनी म्हणजेच, संगीतकार वसंत देसाईंनी मंगेशला व्ही. शांताराम बापूंच्या राजकमल कलामंदिरमध्ये ध्वनीमुद्रण विभागात पोटापाण्यासाठी लावून टाकले.
हाच मंगेश देसाई पुढे १९८५ पर्यंत ‘पुनर्ध्वनीमुद्रक’ म्हणून विविध भाषांतील, हजारों चित्रपटांचे पुनर्ध्वनीमुद्रणाचे काम करीत राहिला.
‘राजकमल’मध्ये ध्वनीमुद्रण विभागाचे प्रमुख, बी. एम. टाटा यांच्या शिफारशीनुसार १९५१ साली मंगेश देसाई ध्वनीमुद्रक, एम. के. परमार यांचे सहाय्यक म्हणून रुजू झाले. १४ वर्षांच्या अथक परिश्रम व सचोटीच्या जोरावर १९६५ साली मंगेश, प्रमुख ध्वनी मुद्रक व ध्वनी मिश्रण विभागाचे प्रमुख झाले.
व्ही. शांताराम बापूंच्या ‘जल बिन मछली, नृत्य बिन बिजली’ या चित्रपटाचे सर्वप्रथम स्टिरीओ पद्धतीचे पुनर्ध्वनीमुद्रण मंगेश देसाई यांनी स्वतःच्या कौशल्यावर केले.
१९७० ते १९८४ या कालावधीत सत्यजित रे, मृणाल सेन यांच्यासारखी चित्रपट सृष्टीतील दिग्गज मंडळी मंगेश देसाईंकडे येऊन आपले पुनर्ध्वनीमुद्रणाचे काम करुन घेत असत.
आंतरराष्ट्रीय पातळीवरील श्रेष्ठ ध्वनीमुद्रकांच्या यादीमध्ये, अमेरिकेतील न्यूयाॅर्क टाईम्सने जाहीर केलेल्या जगातील १० ध्वनीमुद्रकांमध्ये मंगेश देसाई हे अग्रक्रमावर होते.
पुनर्ध्वनीमुद्रणाच्या तंत्रज्ञानावर मंगेश देसाई यांची जी हुकूमत होती त्याला तोड नाही. त्यांचे त्याबाबतीत घडलेले काही किस्से.
‘चानी’ या व्ही. शांताराम बापूंच्या चित्रपटासाठी, पाण्यात बुडणाऱ्या माणसाचा ‘परफेक्ट’ साऊंड हवा होता. मंगेशने हजारों रुपयांचा किंमती माईक, अक्षरशः पाण्यात बुडवला. साऊंड इफेक्ट तर ‘परफेक्ट’ मिळाला, मात्र किंमती माईकचं नुकसान केल्याबद्दल, त्याला कोणीही जाब विचारला नाही.
‘पाकिझा’ चित्रपटातील एका गाण्याआधी रेल्वे इंजिनाच्या कर्कश शिट्टीचा वापर, एखाद्या स्त्रीच्या किंकाळी सारखा अडतीस सेकंदासाठी केलेला आहे. चित्रपटाचे संगीतकार नौशाद हे ट्रायल पाहून, तणतणत मंगेश देसाईकडे आले व ‘साले, साऊंड मिक्सींग करनेवाले, मेरे गाने का सत्यानास किया तुने xxxx’ असे आवाज चढवून भांडू लागले. मंगेशने देखील त्यांना वरच्या पट्टीतच उत्तर दिले, ‘थिएटर में देखना और बुरा लगे तो इधर वापस मत आना xxxx’ ‘पाकिझा’ चित्रपटाचा ‘प्रिमिअर शो’ पाहून नौशाद, मंगेश देसाईला भेटायला आले व अक्षरशः त्याला लोटांगण घातले. कारण मंगेशनं आपलं काम, चोखच केलं होतं.
‘शोले’ चित्रपटातील बंदुका व पिस्तुलाच्या आवाजांचे पुनर्ध्वनीमुद्रण रमेश सिप्पी यांनी लंडनला जाऊन केलेलं होतं. ते ऐकल्यावर मंगेश भडकले व रमेश सिप्पीला म्हणाले, ‘ये सब बकवास है, लंडन जाओ और फिर सही करके लाओ’ रमेश सिप्पी गांगरुन गेले. एवढ्या मोठ्या खर्चावर त्यांनी पाणी सोडले. मंगेशने त्याच्या पद्धतीने संपूर्ण पुनर्ध्वनीमुद्रण केले.
१९७५ साली देशात, चित्रपटाचे सहा ते आठ ट्रॅकचे मिक्सींग होत असे. मंगेश ने ‘शोले’ चित्रपटासाठी तब्बल बावीस ट्रॅकचे मिक्सींग केले. त्याचा परिणाम पडद्यावर कोट्यावधी रसिकांनी ‘ऐकलेला’ व अनुभवलेला आहे.
‘शोले’मधील सर्वात हायलाईट आवाज आहे, तो नाणं उडवल्यानंतर ते जमिनीवर पडेपर्यंतचं त्याचं गुंजन आणि पडल्यावर त्याचं ‘टिंग टण टिडींग’ पण असं घरंगळत जाणं. ही करामत मंगेशनं स्वतःचं कौशल्य पणाला लावून केलेली आहे.
झालं असं की, लंडनहून करुन आणलेला आवाज त्या नाण्याला सूट होत नव्हता. मंगेशने नट आणि बोल्टमध्ये जी वायसर म्हणून चकती वापरतात, ती बोटाने उडवून पडेपर्यंतचा तो साऊंड फाॅलो करुन, रेकाॅर्डिंग केला. त्याचा इफेक्ट मी पुण्यातील नटराज थिएटरमध्ये अनुभवलेला आहे.
असे हे मंगेश देसाई सकाळी नऊ वाजता कामाला लागायचे ते रात्री नऊपर्यंत तहानभूक विसरून मग्न असायचे. दुपारी त्यांच्या आवडीचे खास जेवण ठराविक हाॅटेलमधून यायचं. त्यामध्ये आठवड्याचे ठरवून दिलेले पदार्थ त्या त्या वारी असायचेच. सूप मात्र रोजच असायचं.
१९८५ पर्यंतच्या सर्व भाषेतील चित्रपटांच्या श्रेयनामावलीमध्ये ‘पुनर्ध्वनीमुद्रण – मंगेश देसाई’ हे नाव सातत्याने झळकत असे. एकूण कारकिर्दीत मंगेश देसाई यांनी ३,५०० हून अधिक चित्रपटांना पुनर्ध्वनीमुद्रणाचा साज चढवला. एक शास्त्र शाखेचा क्रांतिकारी, चित्रपटसृष्टीतील तंत्रज्ञांमधील हिरो नव्हे तर ‘हिरा’ ठरला!
मंगेश देसाई यांच्या या सर्व आठवणी सुप्रसिद्ध सिनेकलादिग्दर्शक, सुबोध गुरुजी यांनी मला सांगितल्या. त्या मी शब्दबद्ध केल्या.
— सुरेश नावडकर. 
मोबाईल: ९७३००३४२८४
२९-१-२२.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 407 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..