कॅन्सर; नाव घेताच धडकी भरवणारा रोग. जगभरात या रोगावरील उपचारांसाठी कोट्यवधी रुपयांची उलाढाल चालते. विशेष म्हणजे आशिया आणि त्यातही भारतात या रोगाने अन्य देशांच्या तुलनेत अगदी नजीकच्या काळापर्यंत जोर धरलेला नव्हता. पचनसंस्थेचे कॅन्सर तर आपल्याकडे आजही तुलनेत नगण्य आहेत. डीन ऑर्निश सारखे जगप्रसिद्ध आहारतज्ज्ञ याचे श्रेय आयुर्वेद आणि भारतीय पाकशास्त्राला देतात. खरंच आयुर्वेद या दुर्धर रोगाच्या उपचारांत वा त्याला आळा घालण्यात किंवा त्याला रोखण्यात काही भूमिका बजावतो का?
आपल्याला आश्चर्य वाटेल पण कॅन्सरच्या क्षेत्रातील तुलनेत ताजे मात्र परिणामकारक संशोधन हे आयुर्वेदीय सिद्धांतांवर आधारलेले आहे! या नव्या दालनाला Immunotherapy असे म्हणतात. या संशोधनातर्गत वापरण्यात आलेल्या औषधांना आता अमेरिकेत एफडीए चे प्रमाणपत्र मिळून त्यांचा उपचारांत वापरदेखील होऊ लागला आहे.
Immunotherapy म्हणजे काय?
थोड्क्यात सांगायचे झाल्यास; या प्रकारात रोगावर थेट औषध न देता आपल्या शरीरातील पेशींना कॅन्सरच्या पेशी ओळखण्यासाठी तयार करण्यावर भर दिला जातो. आपल्या रक्तातील टी सेल्सना कॅन्सरच्या प्रोटीन्स आवरणाचे रूप बदलणाऱ्या पेशींना ओळखण्यास इंजेक्शनमार्फत काही औषधे देऊन प्रशिक्षित केले जाते. या संशोधनाने कॅन्सरच्या उपचारांत एक संपूर्ण नवा आयाम निर्माण केला असून हेच या उपचारांचे भविष्य असू शकते असे मतही जागतिक पातळीवरील कित्येक मान्यवर कॅन्सर उपचार तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
आयुर्वेद काय सांगतो?
आपल्यापैकी कित्येकांना हे माहिती नसेल; पण रोगप्रतिकार शक्ती अथवा ‘व्याधीक्षमत्व’ हा शब्द जगाला सर्वप्रथम आयुर्वेदाने सांगितला आहे. पुन्हा त्याचेही दोन उपप्रकार आणि त्यांचे वर्णन आयुर्वेदात आलेले आहे. रोगावर थेट हल्ला न करता शरीराची एकंदरीत परिस्थिती अशा प्रकारे सुधारणे की जेणेकरून तो रोग शरीरात घर करूच शकू नये असा आयुर्वेदाचा दृष्टिकोन असतो. आयुर्वेदात ‘स्वभावोपरम वाद’ या शीर्षकाखाली हा विषय सविस्तरपणे मांडण्यात आला आहे.
आता आपल्या लक्षात आले असेल की नेमका हाच आयुर्वेदीय सिद्धांत वापरून सध्या आधुनिक वैद्यकाची वाटचाल सुरु असून; त्यांना याविषयी मोठा आधार वाटू लागला आहे. कॅन्सरचे रुग्ण आयुर्वेदीय पद्धतीने हाताळणारे शासकीय मान्यताप्राप्त व अनुभवसंपन्न वैद्यगण याच सिद्धांताच्या आधारे उपचार करत असतात. (या क्षेत्रात आयुर्वेदाच्या नावाखाली भलत्याच लोकांकडून केली जाणारी लूटमार समोर असल्यानेच ‘शासकीय मान्यताप्राप्त व अनुभवसंपन्न’ हे शब्द निवडले आहेत.) अर्थात; रोगाची अवस्था लक्षात घेऊन आणि क्वचित काही अपवाद वगळता बहुतांशी आधुनिक वैद्यकाच्या जोडीने हे उपचार दिले जातात. मात्र या संशोधनाने आयुर्वेदीय विचारसरणीला नव्याने बळकटी दिली आहे.
अर्थात; लगेच आयत्या बिळावर नागोबा बनायचेदेखील कारण नाही. कारण हा सिद्धांत आणि संकल्पना आयुर्वेदाची असली तरी ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आधुनिक शास्त्रातील तज्ज्ञांनी अहोरात्र मेहनत घेतली आहे याकडे मुळीच दुर्लक्ष करता येणार नाही. जोवर सध्या आयुर्वेदात सुरु असलेल्या संशोधनांच्या आधुनिक वैद्यकाच्या ओंजळीने पाणी पिण्याच्या परिस्थितीत आपदतलमस्तक बदल होऊन आयुर्वेदीय परिभाषा व सिद्धांतानुसार रिसर्च प्रोटोकॉल तयार होत नाही किंवा या संशोधनांची क्षमता कित्येक पटीने अधिक वाढत नाही तोवर या क्षेत्रात सध्याच्या युगात अधिकारवाणीने भाष्य करण्याचा संपूर्ण अधिकार आम्हाला नसेल. अर्थातच; हे एकट्या- दुकट्याचे काम नसून त्याकरता शासकीय पातळीवरूनच बदल करावा लागेल. अन्यथा तिथेही अमेरिका वा जर्मनीसारखे आयुर्वेदाचे महत्व जाणणारे देश आहेच. आज या दोन्ही देशांत आयुर्वेदावर मुबलक संशोधने सुरु आहेत. आमच्या देशात मात्र एक वर्ग आयुर्वेद म्हणजे भंपकपणा हा मूर्ख समज (जाणूनबुजून) कवटाळून बसला आहे तर दुसरा वर्ग आयुर्वेद हा अमक्या- ढमक्या पण्यजीवी व्यक्तींमुळेच सर्व लोकांपर्यंत कसा पोहचला या मिथ्या स्वप्नरंजनात दंग आहे. प्राप्त परिस्थितीत उद्या या देशांतील ‘वैद्य’ आपल्या हिंदुस्थानात येऊन ‘अष्टांगहृदय’ वा ‘चरकसंहिता’ शिकवू लागले तर आश्चर्य वाटून घेऊ नका!!
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
Leave a Reply