नवीन लेखन...

‘दीर्घायु’चे रहस्य…आयुर्वेद !!

Ayurveda - The Secret of Long Life

कोणाही थोरामोठ्यांना वाकून नमस्कार केला की; ‘शतायुषी व्हा’ असे आशीर्वाद कानावर पडत असतात. दीर्घायुची आस नसलेला मनुष्य विरळाच. आपल्याकडे चार युगे सांगितली असून प्रत्येक युगात १/४ आयुर्मानाचा ऱ्हास होतो असे आयुर्वेद सांगतो. हा ह्रास होत होत; कलियुगात १०० वर्षे ही सरासरी आयुर्मानाची परिभाषा आहे. मात्र प्रत्यक्षात आपल्या देशात काय परिस्थिती आहे?

भारत सरकारच्या जनगणना विभागाने जाहीर केलेल्या अभ्यासानुसार सरासरी ६० वर्षे हे आम्हा भारतीयांचे आयुर्मान आहे. राज्यवार अभ्यासल्यास हे आयुर्मान केरळ या राज्यात सर्वाधिक म्हणजे सरासरी ७४.९ वर्षे इतके आहे. केरळ; ज्याला God’s own country असंही म्हटलं जातं….हे राज्य आयुर्मानाच्या आणि एकंदरीत आरोग्याच्या बाबतीत आजवर कायम आघाडीवर राहिलं आहे. यामागची कारणंदेखील महत्वाची आहेत. शिक्षणाचे अधिक प्रमाण, दरडोई उत्पन्न उत्तम असणे आणि चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा ही काही प्रमुख कारणं. मात्र या सगळ्यांच्या पलिकडे असलेले आणि हे सर्वकाही व्यापून उरलेले आणखी एक महत्वाचे कारण आहे. ते म्हणजे ‘आयुर्वेद’.

 आयुर्वेदाच्या क्षेत्रात पंचकर्म हा शब्द ऐकला-वाचला की दुसरा जो शब्द लगेच आपल्या मनात येतो तो म्हणजे केरळ! केरळाने छोट्या छोट्या गोष्टींत आयुर्वेद जपला आहे. भगवान परशुरामांनी निर्माण केलेली गौरवशाली अष्टवैद्य परंपरा जपली ती याच राज्याने. आपल्याकडे ‘आजीबाईचा बटवा’ असतो तसाच केरळात ‘उट्टमूली’ असतात. उट्टमूलीमध्ये एखाद्या रोगावरील एक किंवा फारतर दोन वनस्पतींचे मिश्रण वापरण्याची पद्धत आहे. आपल्याकडचा ‘आजीबाईचा बटवा’ हा आज भरकटत जाऊन जणूकाही घरगुती औषधे म्हणजेच आयुर्वेद अशा पायरीवर जाऊन पोहचला आहे. उट्टमूलीमध्ये मात्र आयुर्वेदातील सिद्धांतांवर आधारित एकल द्रव्य चिकित्साच प्रामुख्याने दिसते. सहस्रयोग वा चिकित्सामंजिरी यांसारखे वैशिष्ट्यपूर्ण आयुर्वेदीय ग्रन्थ जन्मले ते याच देवभूमीत. संस्कृत भाषेव्यतिरिक्त अन्य कुठल्या भाषेतील ग्रन्थ असूनही अत्यंत अभ्यासपूर्ण असल्याने आयुर्वेदाच्या महत्वाच्या संहिता/ निघण्टु ग्रंथांच्या मांदियाळीत या मल्याळम् ग्रंथांना आदराचे स्थान आहे. असे अन्य उदाहरण विरळाच.

दैनंदिन आयुष्यातही केरळाने आयुर्वेद आजही जपलाय. कळरीपायट्टपासून ते अगदी रोजच्या खाण्यासोबत घेतल्या जाणाऱ्या ‘चुक्कु वेल्लम्’ किंवा ‘पथीमुकम् वेल्लम्’ पर्यंत मल्याळी बांधव आयुर्वेद ‘जगत’ असतात. (या दोन्हीवर स्वतंत्रपणे लिहीनच; तूर्त वेल्लम् म्हणजे पाणी; आणि हे दोन्ही प्रकार म्हणजे आयुर्वेदीय औषधींनी सिद्ध केलेले पाणी इतकेच लक्षात ठेवलेत तरी पुरे. असे पाणी केरळात जेवणासह घेण्याची प्रथा आहे.)

सुश्रुतसंहितेत स्पष्टपणे म्हटले आहे;

‘आयुरस्मिन् विद्यते, अनेन वाऽऽयुर्विन्दन्ति इत्यायुर्वेदः।’ (वेदोत्पत्त्यध्याये।)

अर्थात्; ज्यात आयु आहे किंवा ज्यामुळे आयुर्प्राप्ती होते तो म्हणजे आयुर्वेद. केरळ हे त्याचं जितं जागतं उदाहरण आहे. आम्ही वैद्यगण आमच्या ग्रंथाबाबत ‘पोथीनिष्ठ’ आहोत असे काहीजण कुत्सितपणे म्हणत असतात. हो; आम्ही पोथीनिष्ठच आहोत. कारण; त्या ग्रंथांतील शब्दन् शब्द आम्हाला प्रत्यक्षात अवतरलेले सतत दिसतात. हा सूर्य हा जयद्रथ!!

© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५

 

https://gharoghariaayurvedblog.wordpress.com/2016/10/30/आयुष्मान-केरळ/

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..