जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग ८७ ; आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक ११
जे देवासाठी ते ते देहासाठी – भाग ४४
पानाला चुना लावून कात घातल्यावर त्यावर सुपारी टाकावी. सुपारी दोन प्रकारे वापरली जाते. ओली आणि सुकी. ओली सुपारी सवय असणाऱ्यांनीच खावी. नाहीतर गरगरल्यासारखे वाटते, म्हणजेच “लागते”. ओली सुपारी मद निर्माण करणारी आहे. पक्व सुपारी तशी “लागत” नाही. सुपारी जर वाळूत भाजून घेतली तर वात पित्त आणि कफ हे तिन्ही दोष शांत करणारी आहे. जर भाजली नसेल तरीदेखील कफ आणि पित्ताला कमी करणारी आहे.
नुसती सुपारी खाल्ली तर ती कदाचित लागेल. पण पानातून सावकाश चघळीत खाल्ली तर लागत नाही. नुसती खायची असल्यास प्रथम वास घ्यावा आणि नंतर काही खावी. त्यातही ती जर “लागली” तर त्यावर गाईचे दूध पिणे किंवा तूप खाल्ले की लगेचच उतारा पडतो, म्हणजे बरे वाटते.
सुपारीच्या पानापासून डिस्पोजेबल भांडी बनवतात. कोकणात पूर्वी अशी भांडी वापरली जायची. त्याला “पोवली” असा शब्द होता. विशेषतः पंगत वाढली असता, ( पंगत म्हणजे सामुदायिक भोजन) या भांड्यात चटणी, लोणचे, मीठ, लिंबू, असे पदार्थ वाढायला नेले जात असत. या पदार्थांना देखील या पानांचा औषधी स्पर्श व्हायचा !
सुपारी फोडायला अडकित्ता असायचा. अडकित्याने सुपारी फोडून तिच्या कातळ्या करणे हे तसे जोखमीचे काम. कधी या अडकित्यात अडकून बोटाचा तुकडा पडेल याचा नेम नसायचा. एका सुपारीचे आठ भाग करून त्यातील एक दोन भाग एकावेळी पानामधे वापरले जातात. अशी सुपारी चघळून खायची सवय असणाऱ्यांना नंतर अडकित्याची पण गरज लागत नाही, एवढे दात आणि दाढा मजबूत होतात.
विड्याच्या पानात सुपारी तर आहेच. पण देवाला जसा नारळ ठेवतात, तशी मानाची सुपारी सुद्धा देवाला ठेवली जाते. सुपारीसुद्धा सगुण रूपातील देवाच्या मूर्तीचे स्थान पटकावते. कधीतरी कार्यारंभक गणेश म्हणून, तर कधी कृष्ण बनून तर कधी सत्यनारायण बनून ही सुपारी देवाचे स्थान घेते. हा मान फळांचा राजा असलेल्या आंब्याला किंवा महाराजा बनलेल्या आवळा डाळींबाला कधीच मिळाला नाही. एवढंच काय जर एखाद्या धार्मिक कार्यात बाजूला सौभाग्यवती नसेल तर ही सुपारी कधीतरी सौभाग्यवतीदेखील बनते. हेच सुपारीचे माहात्म्य आणि वैशिष्ट्य देखील.
आयुर्वेदानुसार तुरट चवीची, विशाद आणि स्तंभन गुणाची सांगितलेली आहे. या गुणाची सुपारी रक्त, शुक्र या दोन धातुंवर थेट काम करते. यासाठी रक्तपित्त या व्याधीमधे, वारंवार होणाऱ्या मूत्रप्रवृत्तीमधे, रक्तदाब कमी करण्यासाठी, शुक्राचे स्तंभन करणे या महत्त्वाच्या रोगामधे सुपारीचा उपयोग होतो.
अनेक वातव्याधीमधे, किंवा कंबरदुखीमधे देखील वाळूत भाजलेली सुपारी गुणकारी असल्याने बाळंतपणामधे “बाळंतीणीची सुपारी” म्हणून तिला बिब्बा, बडिशेप, लवंग इतर पदार्थाबरोबर मानाचे स्थान आहे.
कोणत्याही ओल्या किंवा वाहाणाऱ्या जखमेतील पूय पाणी कमी करण्यासाठी, जखमा धुण्यासाठी डेटाॅलप्रमाणे सुपारीचा काढा वापरता येतो. जसे अशुद्ध जखमेतील सूक्ष्म कृमी दूर करण्यासाठी वापरतात, तसे पोटातील मोठे कृमी ठार मारून बाहेर काढण्यात सुपारी एक नंबर ! अगदी नावे घेऊन सांगायचे तर पोटातील गंडूपद कृमी, स्फितकृमींचा कर्दनकाळ म्हणजे ही सुपारी.
तोंड येणे, तोंडाला दुर्गंधी जाणवणे, हिरड्यांच्या आजारामधे, तोंडाची चव जाणे इ. अनेक मुखरोगामधे सुपारी हे चांगले औषध आहे. उत्तम पाचक असल्यामुळे जेवणानंतर चघळावी.
पण आजकाल सांगितले जाते, “सुपारी खाऊच नका.” बरोबर सांगितले जाते, जी खायची नसते ती सेंटेड सुपारी. ज्याला चमन, सॅक्रीन आदि रासायनिक फ्लेवर्स लावलेले असतात, ती सुगंधी सुपारी नकोच. अजिबात खाऊ नये.
या सर्व गुणांचा विचार करून देवपूजेमधे या सुपारीला देवाएवढेच मानाचे स्थान आहे, कारण ती या हाडामांसाच्या देहालाही आपल्याप्रमाणे सुपारीसारखेच कठीण बनवते.
काय मग ? आहात का तयार ? ही चिकनी सुपारी पानातून खायला ? घेताय सुपारी, सुपारी खाण्याची !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
07.07.2017
Leave a Reply