नवीन लेखन...

आयुर्वेदिक (?) Detox water

आयुर्वेदाच्या नावाखाली काहीतरी फ़ंडे खपवण्याचे एकेक नवीन पीक येत असते. खरीप असो व रब्बी; कोणत्याही हंगामात अशी पिकं उगवतात. अर्थात ही पिकं जास्त काळ टिकत नसली तरी आयुर्वेदाचे नाव पुढे करून लोकांचा बुद्धिभेद करण्यात मात्र बऱ्यापैकी यशस्वी होत असतात. अशापैकीच एक फॅड म्हणजे Detox water

Detox water म्हणजे काय?

काही भाज्या आणि फळांचे तुकडे करून ते थंड पाण्यात बुडवून त्याचा स्वाद आल्यावर तयार झालेले पाणी म्हणजे Detox water. याकरता पाण्याच्या जारमध्ये फळांचे तुकडे वापरतात किंवा त्यासाठी विशेष infuser bottles देखील सर्वत्र उपलब्ध असलेल्या दिसतात. या पाण्यात हे तुकडे घातल्यावर पाणी फ्रिजमध्ये थंड करून घेण्यावर भर असतो. शिवाय एका वेळी तयार केलेल्या तुकड्यांवरच दोन-तीन वेळा नव्याने पाणीदेखील भरण्यात येते.

Detox water मागील पोकळ दावे आणि तथ्य!!

१. Detox water ही आयुर्वेदीय संकल्पना आहे.

प्रत्यक्षात ही थेट आयुर्वेदीय संकल्पना नाही. फारतर मन्थ वा हिम यांसारख्या आयुर्वेदीय संकल्पनांचे हे भ्रष्ट रूप आहे असे एकवेळ म्हणता येईल. मात्र या दोन्ही संकल्पना फार वेगळ्या प्रकारे आणि वेगळ्या अवस्थांत वापरल्या जातात. (कशा ते आपण पुढे पाहू)

२. Detox water घेतल्यास जेवण्याची गरज नाही!

आपल्याला आश्चर्य वाटेल; पण Detox water चं मार्केटिंग आहाराला पर्याय म्हणून केलं जात आहे. वजन कमी करायचं असल्यास न जेवता फक्त Detox water प्या अशी जाहिरात केली जात असून त्याने वजन कमी होईल इथपासून ते एकंदरीतच आरोग्य उत्तम राहील अशा प्रकारे गैरसमज पसरवून जणू काही माणसाला जगण्यासाठी जेवणाची काहीच आवश्यकता नाही असे घातक चित्र उभे केले जात आहे.

३. Detox water घेतल्याने वजन कमी होते.

प्रत्यक्षात याला काही शास्त्राधार नाही. या विधानाची पुष्टी करणारी संशोधनेदेखील नाहीत. इतक्या मोठ्या प्रमाणात आणि तेही फ्रीजमधील थंडगार पाणी पिऊन वजन कमी होणे तर सोडाच; उलट वाढू शकते.

Detox water ही पूर्णपणे त्याज्य संकल्पना आहे का?

नक्कीच नाही. मात्र त्याच्या वापराचे क्षेत्र नीट ठरवायला हवे. याआधी वर्णन केल्याप्रमाणे या संकल्पनेला ‘आयुर्वेदीय’ म्हणायचे असल्यास मन्थ वा हिम यांच्यासारखे उन्हाळा, ऑक्टोबर महिन्यातील गरमी यांसारख्या उष्ण काळात आणि पित्ताशी संबंधित व्याधी असल्यास वैद्यांच्या सल्ल्याने Detox water चा वापर करता येईल. मात्र याकरता फ्रिजमधले पाणी न वापरता माठातले पाणी वापरावे. मातीच्या माठात वाळ्याची जुडी घातलेले Detox water हे आमच्याकडे पूर्वीपासून गावा गावात पिण्यासाठी वापरले जात आहे! शिवाय कोणत्याही परिस्थितीत असे पाणी हा आहाराचा ऐवज होऊ शकत नाही हेदेखील लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

ही पथ्ये न पाळता आयुर्वेदाच्या नावाखाली फोफावू पाहत असलेल्या प्रकारांना बळी पडू नका.

© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)

आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते

।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली

संपर्क: ०२५१-२८६३८३५

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..