आयुर्वेद समजून घेताना
विशाल आयुर्वेद समजून घ्यायला, वृत्तीचा दिलदारपणा, चातकाची तहान, मनाचे मोठेपण, देवावर श्रद्धा, गुरूंवर विश्वास, भिकाऱ्याजवळचा निर्लज्जपणा आणि भावना टिपणारे तरूणीचे ह्रदय हवे. हे गुण नसल्यास ते आत्मसात करावे लागतील.तरच आयुर्वेद म्हणजे काय ते समजायला लागेल. कायद्यावर बोट ठेवून आणि महाविद्यालयात शिकून तीन तासात पेपर लिहून, पाच वर्षानी हातात उत्तीर्ण असे प्रशस्तीपत्र मिळाले तरी, आयुर्वेद समजतोच असे नाही.
अभ्यासासाठी ग्रंथकारांनी याचे तीन भाग केलेत. शारीरिक आणि मानसिक आणि आध्यात्मिक. जसा रोग तसे त्याचे कारण. जसे कारण तसे औषधी उपाय योजना करणे, म्हणजे चिकित्सा करणे. रोग जर. शारीरिक कारणामुळे झाला असेल, तर उपाय देखील शरीरावर हवा, तिथे आश्वासन देऊन किंवा मानस चिकित्सा करून फरक पडणार नाही. जसे, पायात काटा गेलाय तर उपाय त्याच पायावर, तिथेच, करायला हवा, ज्या पायात काटा घुसलाय. इथे मंत्र म्हणून काटा बाहेर येणार नाही.
पायात काटा गेलाय असे सारखे वाटत रहाणे, तपासण्या केल्या तरी त्यात काहीही व्रण किंवा काटा न दिसणे अशा लक्षणामधे मानसोपचारच उपयोगी पडणारा असतो जो, शंका या रोगाचे समाधान करतो.
आणि सतत एकाच पायात, एकाच ठिकाणी, एकाच कारणानी, वारंवार काटा टोचणे आणि व्रण बरा न होणे, आणि याची सकृतदर्शनी कोणतेही कारणे लक्षात न येणे, यासारखी लक्षणे ही रोगाचे मुळ आत्मदोषापर्यंत नेऊन पोचवतात.
भुवया उंचावून बघण्याची गरज नाही. हो. हा आत्मदोष जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा मान्य केला आहे. आज अंधश्रद्धा निर्मूलनसारख्या काही संघटनांच्या विरोधामुळे व्हावे तसे संशोधन या विषयावर होत नाही, ही खंत जरूर आहे. असे होऊ नये, आमचे शास्त्र लेबल बदलून, भाषा बदलून, ‘त्यांना’ ( म्हणजे पाश्चात्य लोकांना ) हवे तसे अर्थ काढून, आम्हालाच शिकावे लागणार आहे. वेदांचे पण तेच झाले आहे. मॅक्समुल्लरला समजलेला भारताचा इतिहास आज आम्हाला शिकावा लागत आहे. जो अतिशय चुकीचे अर्थ शिकवतो.
शुद्धिकरण मुळापासूनच भारतीय मानसिकतेचा, भावनांचा विचार करून व्हायला हवे. केवळ शब्दाला प्रतिशब्द देणे म्हणजे वेदांचे प्रतिसंस्करण नव्हे. हे आयुर्वेद शिकताना लक्षात घ्यायला हवे.
ही मानसिकता झाल्यावरच आयुर्वेदाचा श्रीगणेशा आरंभ होईल.
आयुर्वेद समजून घ्यायला ती विशिष्ट दृष्टी हवी. जसं भगवान श्रीकृष्णांचे विराट रूप बघण्यासाठी अर्जुनाची सामान्य दृष्टी बदलून, वेगळी विशाल दृष्टी होणे आवश्यक होते, तसे आहे. भगवंत गीतेमधे हेच सांगत आहेत. मोक्ष समजून घ्यायला, कर्तेपण लयाला जायला, मी कोण हे शोधताना ती वेगळी विशाल दृष्टी आवश्यक आहे.
भगवंताची कृपा झाल्यावर संजयाला आणि अर्जुनाला ती दृष्टी प्राप्त झाली. आपण सारे अर्जुन आहोत, या भावनेने जर भगवंताकडे ती दृष्टी मागितली तर तो निश्चितच ती दृष्टी देतो. फक्त भाव अर्जुनाचा हवा.
……..आणि भक्तीदेखील !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
13.02.2017
Leave a Reply