नवीन लेखन...

आयुष्याची प्रश्नपत्रिका…

आपल्या प्रत्येकाचे आयुष्य म्हणजे शेवटच्या क्षणापर्यन्त सोडवायची एक प्रश्नपत्रिका असते.या प्रश्नपत्रिकेसाठी अमुक एक विशिष्ठ असा विषय नसतो वा कसल्याही स्वरूपाचा अभ्यासक्रम आखलेला नसतो.प्रत्येकाची प्रश्नपत्रिका जरी वेगवेगळी असली तरी काही असे प्रश्न असतात कि ते एकमेकांच्या मदतीने सोडवावे लागतात..आणि तशी आपल्याला मोकळीकही दिलेली असते..काही काळाची मर्यादा घालून.आपण तेवढ्या निर्धारित वेळेत सोबत्यांच्या साथीने त्या प्रश्नांना सामोरे जायचे असते.काही प्रश्नांसाठी आपल्यापुढे कुणाची बौद्धिक मदत ..तर कुणाची शारिरीक मदत ..आर्थिक..भावनिक घ्यावी लागते..असे पर्याय निवडण्याला प्रत्येकाला संधी मिळत असते.आपले पर्याय आपणच निवडायचे असतात आणि ते निवडताना आपण ही जी मदत घेत असतो तिचे योगदान हे केवळ आपल्याला उत्तरांच्या उद्दिष्ठाप्रत न्यावयासाठी आहे हे विसरायचे नाही..हे पर्याय आपली उत्तरे करण्याचा कधीच यत्न नसावा..कारण एकतर तशी मुभा आपल्याला नसते..आणि कुणी अट्टाहासाने जर तसा दांडगावा केला तर ती उत्तरपत्रिका त्याच्या नावाची समजली जात नाही.आणि आयुष्याची प्रश्नपत्रिका सोडविण्यास सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ठ ठामपणे प्रत्येकाने स्वत:ला बजावायची ती ही कि आपली प्रश्नपत्रिका आपली आपण प्रामाणिकपणे सोडवायची..आपल्यावर कुणाची देखरेख आहे किंवा नाही याचा कानोसा घेण्यात अनमोल वेळ वाया न घालविता प्रश्न सोडवीत रहायचे..आपली उत्तरे कुणा दुसऱ्याच्या हाती कधीही परीक्षणासाठी ..मूल्यांकनासाठी अजिबात सोपवायची नाहीत..आपला गृहपाठ इतका जोमदार असायला हवा की आपणच आपल्या उत्तरांचे परीक्षण..मुल्यांकन करावयास सिद्ध असायला हवे..आणि कुठे काही चुकीचे वा अपुरे उत्तर आढळल्यास आपणच पुन्हा नव्याने ते लिहायला शिकले पाहिजे…आपण रोज झोपताना आपल्या उत्तरांबद्दल समाधानी नि संतुष्ठ असणं आणि आपल्या नजरेनं आपल्याला जोखताना ताठ मानेने वावरणं ही आपली जगण्याकडे पहाण्याची दृष्ठी असली पाहिजे.
आणखी एक गोष्ठ ठाम ध्यानात ठेवायची ती ही कि या प्रश्नपत्रिकेत येणारे सारेच्या सारे प्रश्न सोडविणे अनिर्वार्य असते..वेळकाढूपणा करून प्रश्नांना बगल देता येत नाही..टाळता तर अजिबात येत नाही.आणि आपापली प्रश्नपत्रिका आटोपल्यानंतर आपल्याला उगाचच कुणासाठी रेंगाळता येत नाही..प्रत्येक प्रश्नाला असणारे गुण आपणाला कधीच दिसत नाहीत..आणि त्याही पुढे एकच प्रश्न जरी आजूबाजूच्या सहकाऱ्याच्या प्रश्नपत्रिकेत दिसला तरी प्रत्येकाच्या प्रश्नपत्रिकेत त्याला असणारे गुण कधीच समान नसतात..तेव्हा आपली उत्तरे लिहताना शेजारी_पाजारी बघणे म्हणजे केवळ वेळेचा अपव्यय ठरतो.

या प्रश्नपत्रिकेत बरोबर लिहलेल्या उत्तरांना भरघोस गुण असतात..आणि त्या गुणांची सावली आयुष्यभर आपल्याला आणि आपल्या सोबतीला येणाऱ्या तथाकथित अपयशी म्हणून उल्लेख होणाऱ्या सगळ्या सोबत्यांना लाभत असते..आणि आपल्या चुकलेल्या उत्तरांना पुन्हा पुन्हा नव्याने लिहायची संधी प्रत्येकाला मिळत असते..आपण एकच करायचे असते कि कुठलाही मानपान ..आढेवेढे न घेता..यतकिंचितही अपराधीपणा न मानता..न्यूनगंड न जोपासता प्रसन्न मनाने चुकलेली उत्तरे लिहित जावे..आणि ही अशी उत्तरे सवयीने लिहिण्याचा नियम नसावा..तर ती सहजतेने लिहिली जावीत..एकदा आपल्याला आपल्या चुकलेल्या उत्तरांना समजावून ..सांभाळून घ्यायला जमू लागले की मग आपल्यामध्ये दुसऱ्याच्या चुकलेल्या उत्तरांची खिल्ली उडविण्याची वृत्ती मूळ धरणार नाही..
आता इथला प्रत्येकजण ज्याची त्याची प्रश्नपत्रिका पूर्ण लिहूनच बाहेर पडत असला तरी बहुतांशी लोक ही परीक्षा देताना परीक्षेचा उद्देश..प्रयोजन..आपल्याला परीक्षेस बसण्याची मिळालेली संधी..आपल्याला परीक्षा देण्यासाठी कराव्या लागणाऱ्या अभ्यासासाठी जन्मजात मिळालेली विचार..भावना हि आयुधे ..आपली काबिलीयत..हुनर..ईश्वरी अनुग्रह..अभिषेक या सगळ्याकडे पाठ फिरवून बसत उत्तरे लिहित असतात..आयुष्याचे जगणे सार्थकी होणे म्हणजे संपूर्ण प्रश्नपत्रिका लिहून झाल्यावर मिळणारा कौल नसतो…आणि सत्य हे की असा कौल स्वत:च्या डोळ्यांनी पाहायचे भाग्य कुणालाही लाभलेले नाही..वा लाभत नसते..तर जगण्याचे सार्थक ..कुणी त्यास मोक्ष म्हणतात .. तो हा कि उत्तरे लिहताना प्रत्येक प्रश्नाशी आपला जुडलेला भाव..त्याच्याशी झालेला समागम आणि शेवटी उत्तर लिहून झाल्यावर अलवार..अवचित ..अनावधानाने ओठातून निसटणारी शीळ..बस्स याशिवाय आयुष्यात काहीही मिळवायचे नसते..हा प्रत्येक टप्प्यावर आपले नाव घेत ..शोधत शोधत आलेला आनंद जेव्हा आपण भेटल्यावर गळ्यात गळा घालून बिलगतो नि आपल्या खांद्यावर त्याचे आनंदाश्रू ओघळतात ..हा क्षण म्हणजे स्वर्गसुख नव्हे तर साक्षात इन्द्रपदच होय…आपल्यावर होत असलेल्या आसवांच्या अभिषेकात भिजून चिंब होताना आसवांच्या लहान_मोठ्या वर्गवारीकडे अजिबात ध्यान देऊ नये..कुणी आपल्याला तसे करण्यास भरीस पडत असला तरी त्याकडे कानाडोळा करावा..आनंदाचे मूल्य झोपडीपासून राजवाड्यापर्यंत वस्तुमानासारखे एकच असते..आपण आपल्या परीने ज्या गुरुत्वाकर्षणाचा चष्मा लावून त्या आनंदाकडे बघत असतो त्यानुसार आनंदाचे वजन बदलत असते..वस्तुमान नाही..हे जगण्याचे प्रमेय ही आपली आयुष्याची स्टेटस लाईन असावी.

आता हे कागदावरचं प्रश्नपत्रिका सोडविण्याचे मार्गदर्शन कितीही सोप्पं..नि सहजशक्य वाटत असलं तरी प्रत्यक्ष प्रश्न समोर उभे ठाकल्यावर उत्तरे डोळ्याच्या आवाक्यात दिसत असली तरी कागदावर उतरवताना हात कापू लागतात…या अनुभवातून आपल बेडा यशस्वी बाहेर पाडावयाचा असेल तर आपणच आपल्या पाठीशी ठामपणे उभे रहायचा सराव अभ्यासाने अंगी बाळगून असावे. आपल्या प्रश्नपत्रिकेतील अवघड ..कठीण..प्रश्नांना सहजतेने स्वीकारावे .आपल्या बुद्धीवर ..चातुर्यावर ..क्षमतेवर आपण पूर्णपणे विश्वास ठेवायला हवा.किंबहुना त्याकडे बघूनच आपल्या प्रश्नपत्रिकेत अवघड ..कठीण प्रश्न आलेत या बद्दल खुशाल रहावे. आपल्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न ज्या ईश्वरी संकेतानुसार आलेले आहेत तोच ईश्वरी अंश आपल्यात आहे हे का जर जाणलं तर आपल्याला कृतार्थ जीवन जगणे सुलभ होऊन जाते..आणि शेवटी ज्यांचा ईश्वरावर..नियतीवर विश्वास..श्रद्धा नाही त्यांच्यासाठी..त्यानाही प्रश्नपत्रिका लागू आहे ..सर्व प्रश्न अनिर्वार्य आहेत..भले त्यांना त्यांच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्ना _मागील ईश्वरी संकेत कबूल नसेल तरी निसर्गाचे नियम साऱ्या सृष्टीला बंधनकारक आहेत ..सहजीवनाचे जगणे मान्य केल्यावर एकमेकाच्या उन्हा_सावलीत इच्छा असो वा नसो विसावा घ्यावाच लागणार हे ही त्यांना नाकारता येणार नाही..आता या साऱ्या नियमबद्ध नैसर्गिक सृष्टीतील श्वास_उ:श्वास यालाच कुणी ईश्वर म्हणू लागतो..आता याला मानणे आणि न मानणे याचा काही प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांच्या स्वरूपावर परिणाम होत नसतो..मात्र उत्तरे लिहताना असणारी अदब मात्र जरूर बेमिसाल असते तिचा रंग आणि नूर काहीसा आगळा असतो..

रजनीकान्त

Avatar
About रजनीकान्त महादेव शेंबडे 11 Articles
रजनीकान्त महादेव शेंबडे..वास्तव्य कराड…अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून महावितरण इस्लाम्पूर विभागीय कार्यालयात कार्यरत.. लेखन कविता…ललित…स्फुट ..
Contact: Facebook

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..