संध्याकाळची साडेसात, आठ ची वेळ. आज शाळेत एकही ऑफ पीरियड नव्हता. त्यामुळे घरी आल्यावर खरतर, डोकं जाम कलकलत होतं. पण सासर्यांना रोज रात्री चारी ठाव स्वयंपाक लागत असल्याने, भराभर पोळ्या करत होते, आणि फोन वाजला. पोळी भाजणे सुरू ठेवून, डोकावून फोन मध्ये पाहिले, तर नीता फोन करत होती. मनात आले, “आता ही का फोन करत असेल?” पण मग ठरवले, जेवणे झाल्यावर निवांतपणे बोलूया. म्हणून नऊ नंतर फोन केला, तर म्हणाली, “अगं! आपल्या बहिणींचं गेट टुगेदर येत्या रविवारी दुपारी, शुभदा कडे करायचे ठरले आहे, तेव्हा तू यायचे आहेस.” खूप आनंदाने तिला येते म्हटले आणि कधी एकदा रविवार येतो, असे झाले.
घरातील सगळ्यांची जेवण्या खाण्याची सोय करून अकरा वाजता, शुभदा कडे पोहोचले. आम्ही मावस, मामे अशा आठ बहिणी जमलो होतो. हास्याचे गडगडाट, आणि संवादाच्या फैरी झडत होत्या. त्यात शुभाच्या हातची कडक कॉफी, गप्पांना रंगत आणत होती. लहानपणीचे किस्से, कुणा कुणाची फजिती आठवून, पुनः पुनः हसत होतो. त्याच नादात, खेळी मेळीत जेवणे झाली. आणि शुभा मला म्हणाली, “विभाताई तुला मी गॅलरीत फुलवलेली बाग दाखवते”. म्हणून आम्ही दोघी बेडरूमच्या गॅलरीत आलो. शुभाने खूप मेहेनत घेऊन त्या येवढ्याशा जागेत सुद्धा अनंत, पारिजातक यांची छान निगा घेतली होती. फुलांनी डवरलेली ती गॅलरी बघून आणि अनंताच्या सुवासाने मन प्रसन्न झाले.
तेवढयात हॉल मधून भांडणाचे आवाज येऊ लागले, म्हणून आम्ही दोघी पटकन तिथे आलो, आणि बघतो तर काय? नीता आणि वीणाची खडाजंगी जुंपली होती, आणि बाकीच्या त्यांना आवरण्याचा निष्फळ प्रयत्न करत होत्या. झाले होते असे की, बेताची बुद्धिमत्ता असलेल्या नीताची, वीणाकडून विनाकारण मस्करी केली गेली आणि त्याची कुस्करी झाली. ते शब्द तिच्या मनाला झोंबल्याने, वाद सुरू होऊन, भांडण विकोपास गेले. आता वीणाने कितीही वेळा क्षमा मागितली, तरी नीताने सर्व विसरून तिला माफ केले, तरच त्यांच्यातले संबंध सुधारले असते. झाल्या प्रकारामुळे, एक चांगले जमून आलेले गेट टुगेदर फिसकटले.
घरी परतताना मनात आले, खरंच! आयुष्यात झालेल्या अशा अपमान, अवहेलना, दुःखद घटनांना, जोपर्यंत आपण जाणीवपूर्वक डिलीट करत नाही, तोवर आपले पुढचे आयुष्य आपल्याला सुखाने जगता येत नाही. कुठली गोष्ट किती धरून ठेवायची? हे शेवटी आपल्या हातात असते. नीता आणि वीणाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, दोघींनीही झाली गोष्ट डिलीट करून, एकमेकींना आणि स्वतःला सुद्धा, माफ केले पाहिजे. कारण कधी कधी, आपण केलेल्या शाब्दिक, कायिक, मानसिक चुकांचा आपण फक्त पश्चात्ताप करत बसलो, तर त्याची बोच आयुष्यभर मनाला वेदना देत रहाते. अशा वेळी मोठ्या माणसांचे धीर देणारे शब्द आठवायचे, “चुका माणसांच्या हातूनच होतात”. तेव्हा लवकर त्यांचा सल मनातून डिलीट करून, पुढे मार्गक्रमणा करायची. त्रास देणारे असे प्रसंग, इतकेच काय! तर अशा काही व्यक्तींना सुद्धा, आयुष्यातून डिलीट करून अदृश्य केले, की पुढचा प्रवास सुखाचा होतो.
आजकालच्या नवीन तंत्रज्ञानात, व्हॉट्स ॲप ने सुद्धा, आपली ही सोय पाहिली आहे ☺️ चॅट करताना उगाच किंवा चुकून नको ते टाईप झाले आणि असे वाटले की डिलीट करावे, तर छानपैकी “डिलीट फॉर ऑल” चा पर्याय देऊन ठेवलेला आहे. तेव्हा कुणालाही न दुखवता तो वापरायचा आणि
शांताबाई शेळके यांचे गाणे गुणगुणायचे,
“जीवनगाणे गातच रहावे
झाले गेले विसरुनि जावे, पुढे पुढे चालावे…
जीवनगाणे गातच रहावे !”
सौ. अमृता विजय शेंडे.
amu.shende4@gmail.com
– सौ. अमृता विजय शेंडे.
Leave a Reply